प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
सात्वत लोक व त्यांचा धर्म - आदिपर्वांत वृष्णींनां उद्देशून वासुदेव म्हणतो कीं जे सात्वत आहेत ते लोभी आहेत असें पार्थ कधींहि समजत नाहीं. वासुदेव (महाभारत आदिपर्व २१८. १२), कृतवर्मा (आदि. २११. ३१), सात्यकि (द्रोण. ९७. ३६), जनार्दन (उद्योग. ७०.७) या सर्वांस सात्वत म्हटलें आहे. भीष्मपर्वांतील ६६ व्या अध्यायाच्या शेवटीं शेवटीं भीष्म म्हणतात:- ''अशा प्रकारचा सनातन, अज्ञेय, दयाळु व कृपाळु असा जो देव त्यास वासुदेव म्हणतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्व त्याची भक्तीनें उपासना करतात. द्वापारयुगाच्या शेवटीं व कलियुगाच्या आरंभी संकर्षणानें सात्वत विधीप्रमाणें त्याची स्तुति केली.'' विष्णुपुराणाच्या तिस-या खण्डाच्या १२ व्या अध्यायांत यादव व वृष्णि या कुलांची वंशावळ दिली आहे. तींत अंशाचा मुलगा सत्वत व त्याचे वंशज ते सात्वत असे सांगितलें आहे. परब्रह्मास भगवत् व वासुदेव म्हणणारे व त्याची विशिष्ट रीतीनें पूजा करणारे ते सात्वत असें भागवतांत म्हटलें आहे. तेथें अंधक व वृष्णि या यादव कुलांबरोबरच सात्वत कुलाचा उल्लेख केला आहे, व वासुदेवास सात्वतर्षभ म्हटले आहे (१.१४, २५; ३. १, २९; १०.५८, ४२; व ११. २७,५). पाणिनीच्या अष्टाध्यायींतील ४. १, ११४ यावरील पतञ्जलीच्या महाभाष्यांत वासुदेवाचे व बलदेवाचे पुत्र या अर्थीं वृष्णि नांवावरून आलेले वासुदेव व बळदेव हे दोन शब्द दिले आहेत. यावरील काशिकाटीकेंतहि वासुदेव व आनिरुद्ध अशी दोन उदाहरणें दिलीं आहेत. तेथें अनिरुद्ध म्हणजे अनिरूद्धाचा मुलगा असा अर्थ आहे. तेव्हां वासुदेव हा वसुदेवाचा मुलगा असा अर्थ न घेतां वासुदेवाचा मुलगा असाच अर्थ घेतला पाहिजे. त्याच टीकेंत दुस-या एका ठिकाणीं ''सिनि-वासुदेवाः'' व ''संकर्षणवासुदेवौ'' अशीं दोन उदाहरणें दिलीं आहेत [अष्टाध्यायी ६.२, ३४ वरील काशिका टीका]. पहिल्यांत वासुदेव हा शब्द समुदायवाचक म्हणजे वासुदेवाचेच पुत्र या अर्थानें व दुस-यांत वासुदेव कृष्ण या अर्थानें योजला आहे.
या सर्व विवेचनावरून असें दिसून येईल कीं, सात्वत हें वृष्णिकुलाचें दुसरें नांव असून वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध हे त्या कुळांतील पुरुष होत; व वासुदेवासच परब्रह्मा समजून त्याची उपासना ज्यांत सांगितली आहे, असा सात्वतांचा स्वतंत्र उपासनामार्ग होता. येणेंप्रमाणें वरील विवेचन नारायणीय आख्यानास पुष्टिदायकच आहे.