प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
वासुदेव व विष्णु यांचें अभिन्नत्व - महाभारतकालीं विष्णूस पुरुषपरमेश्वराचें स्थान प्राप्त झालें होतें; आणि वासुदेव व विष्णु हे दोघे एकच मानले जात असत. भीष्मपर्वांत ६५-६६ अध्यायांत पुरुषपरमेश्वरास नारायण व विष्णु या दोन नांवांनीं संबोधिलें आहे आणि हे सर्व व वासुदेव एकच असें म्हटलें आहे.
अश्वमेधपर्वांतील अनुगीतेंत कृष्ण द्वारकेस परत येत असतांना त्यास भृगुवंशांतील उत्तंक नांवाचा ॠषि भेटतो, व त्या दोघांत थोडासा संवाद होऊन त्या ॠषीच्या विनंतीवरून कृष्ण त्यास आपलें विराट स्वरूप दाखवितो. ह्या स्वरूपास वैष्णवरूप म्हटले आहे. भगवद्गीतेंत अर्जुनासहि विराट स्वरूप दाखविलेलें आहे, पण त्या ठिकाणी वैष्णवरूप हें नांव आढळत नाहीं. यावरून अनुगीता व भगवद्गीता यांच्यामधील काळांत वासुदेव-कृष्ण व विष्णु हे दोघे एकच ही गोष्ट ठरून गेलेली दिसत. शांतिपर्व अ. ४३ या ठिकाणीं युधिष्ठिरानें कृष्णाची स्तुति केली आहे तेथेंहि कृष्ण व विष्णु एक असेंच म्हटलें आहे. महाभारतकालीं विष्णूस पुरुषपरमेश्वर समजत, तथापि नारायण व वासुदेव-कृष्ण हीं नांवेंच फार करून आढळून येतात.
वासुदेव-कृष्णास देव समजत नव्हते अशाबद्दल पुराव्यादाखल महाभारतांत बरीच स्थळें दाखविता येतील. अनुगीतेंतील वर उल्लेख केलेला उत्तंक ॠषि कृष्णास जणूं काय एक सन्मान्य व्यक्ति समजून शाप देण्यास उद्युक्त झाला होता; पण कृष्णानें आपलें विराट स्वरूप दाखविण्याचें कबूल केल्यावर त्यानें शाप दिला नाहीं. इतर ब-याच ठिकाणींहि कृष्णाचें देवपण नाकबूल केलेलें आहे. संजय व भीष्म हे मात्र सदेदित कृष्ण देव आहे ही गोष्ट मनावर ठसविण्याचा जेव्हां तेव्हां कसून प्रयत्न करीत. सारांश, या काळीं सात्वत लोक हे वासुदेवधर्म पाळीत असून त्याचा प्रसार हळू हळू देशांतील इतर लोकांत होत चालला होता असें महाभारतांतील सदर स्थळांवरून दिसून येतें. पौराणिक काळीं वासुदेव-धर्माचा प्रसार होण्याचें थांबलें; पण विष्णु ही वैदिक काळची देवता मध्यवर्ती कल्पून तिजपासून निघालेला, नारायण या विश्वव्यापी देवापासून निघालेला व वासुदेव या ऐतिहासिक व्यक्तीपासून निघालेला, अशा तीन उपासनासंप्रदायांचे प्रवाह जणूं काय एकांत एक मिसळून त्यांपासून पुढील काळांतील वैष्णवसंप्रदाय बनला. या उपासनासंप्रदायाचा एक चवथाहि प्रवाह आहे. अर्वाचीन काळीं वैष्णव पंथांतील कांहीं शाखांत त्यास अतिशय महत्त्व प्राप्त झालें आहे. तेव्हां आतां या चवथ्या मताकडे वळूं.