प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

विष्णूच्या परमेश्वरपदप्राप्‍तीचा इतिहास - विष्णु ही वैदिक काळची देवता आहे. ॠग्वेदांत या देवतेस उद्देशून अशीं फारच थोडीं सूक्तें आहेत, एवढ्यावरून या देवतेचें महत्त्व कमी होतें असें म्हणतां येत नाहीं (वेदविद्या, पृष्ठ ३१३ पहा). लांब लांब पावलें टाकून तीन पदांनीं तो सर्व विश्व आक्रमितो, अशा प्रकारचें त्याचें वर्णन अंतःकरणपूर्वक (भावपूर्वक) केलेलें आढळतें.

द्वे इदस्य क्रमणे स्वर्दृशोऽभिख्याय मर्त्यो भुरण्यति ।
तृतीयमस्य नकिरा दधर्षति वयश्रन पतयन्तः पतत्रिणः ॥
                               (ॠ. १ १५५,५)
तद्विष्णोः परमं पद सदा पश्यन्ति सूरयः दिवीव चक्षुराततं
                               (ॠ. १. २२, २०)
विष्णोः परमे पदे मध्व उत्सः यत्र देवयवो मदन्ति
                           (ॠ. १. १५४, ५)
इन्द्रस्य युज्यः सखा ।         (ॠ. १. २२, १९)

वगैरे विष्णूचें वर्णन ॠग्वेदांत आलें आहे. ॠग्वेदकालीं जरी विष्णूस इतकें महत्त्व नव्हतें तरी ब्राह्मणकालापासून ते वाढूं लागले, व महाभारतकालीं व पुराणकालीं तर त्यास परमेश्वरपदच प्राप्त झालें. विष्णूचा हा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला त्यास कारण त्याचें जें सर्वांच्या दृष्टिपथाच्या बाहेर असणारे परमपद त्याविषयीं वाटणारी पूज्यबुद्धि होय. ब्राह्मणकालीं अग्नीस देवांत शेवटचें व विष्णूस सर्वांत वरचें स्थान दिलें जात असे (ऐ. ब्रा १.१). वैभव, कीर्ति व अन्न यांची प्राप्ति होण्याकरितां देवांनीं यज्ञसत्र आरंभल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत व तैत्तिरीय आरण्यकांत एक गोष्ट आहे. जो आपल्या कर्तृत्वानें सर्वांत आधीं यज्ञ संपवील त्यास सर्वांत श्रेष्ठ पद द्यावयाचें असें त्यांनीं आपणांस ठरविलें होतें. विष्णूनें सर्वांच्या आधीं यज्ञ संपविल्यामुळें त्यास श्रेष्ठ पद मिळालें. अर्थात् ही गोष्ट लिहिली जाण्यापूर्वींच विष्णूस सदर पद प्राप्त झालें होतें, व याच्या समर्थनार्थ म्हणून मागाहून ही गोष्ट रचण्यांत आली. सदर ब्राह्मणांत (१. २,५) वामनरूपी विष्णूचीहि गोष्ट आली आहे. यज्ञप्रसंगीं एकदां देव दैत्य यांमध्यें जागेसंबंधानें भांडण लागलें तेव्हां वामनाच्या आकाराएवढी जागा देवांस देण्याचें दैत्यांनीं कबूल केलें. त्याप्रमाणें विष्णूस जमिनीवर निजविण्यांत आलें. हळू हळू त्याचा आकार इतका वाढला कीं, त्यानें सर्व पृथ्वी व्यापून टाकली. या ठिकाणीं विष्णूच्या अंगीं एक अद्भूत शक्ति (मोठें होण्याची) जोडली आहे. तरी त्यास परमेश्वराचें स्वरूप प्राप्त झालें होतें असें म्हणतां येत नाहीं. सर्व विश्वाचें पोषण करणारें अन्न हें भगवान् विष्णूचें स्वरूप आहे असें मैत्रायणीय उपनिषदांत म्हटले आहे (विश्वभृत् तनूर्भगवतो विष्णोर्यादिदमन्नम् - ६. १३). कठोपनिषदांत जीवात्म्याच्या प्रगतीची प्रवासाशीं तुलना केली आहे; या प्रवासाचें शेवटचें ठिकाण विष्णूचें परम पद होय असें म्हटलें आहे (सोऽध्वनः पारमाप्रोति तद्विष्णोः परमं पदम् ३.९). या स्थानाप्रत जाणें म्हणजेच मोक्ष होय. येथें परमपद याचा मोक्षपद या अर्थी उपयोग केला गेला असल्यामुळें या काळीं विष्णूस सर्वांत श्रेष्ठ पद मिळालें असावें. कांहीं काळानंतर गृहदेवतांतहि विष्णूस स्थान मिळालें. विवाहविधींतील सप्तपदींत वधू जेव्हां पाऊल पुढें टाकते, तेव्हां वर तिला म्हणतो कीं, विष्णु तुला मार्ग दाखवो किंवा तुजबरोबर असो (विष्णुस्त्वामुन्नयतु). आपस्तंब, हिरण्यकेशि व पारस्कर गृह्यसूत्रांत सदर मंत्र आढळतो, पण आश्वलायन गृह्यसूत्रांत तो आढळत नाहीं.