प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.
प्रकरण १४ वें.
अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना.
यज्ञसंस्थेचा इतिहास समजावयास दैवतेतिहास जितका महत्त्वाचा आहे तितकाच अतींद्रिय सृष्टीसंबंधानें लोकांच्या असलेल्या कल्पना समजणें महत्त्वाचें आहे. परमार्थविषयक निरनिराळ्या कल्पनांचे प्रकार जसजसे असतील त्याप्रमाणें तो परमार्थ साध्य करून घेण्याचे मार्ग उत्पन्न होतील. स्वर्ग म्हणजे काय याची कलपना निश्चित नसली तरी पारलौकिक इष्टगतीसाठीं मनुष्य कांहीं तरी करतोच. तो जें कांहीं करतो त्यावरून त्याच्या परलोकाविषयींच्या कल्पना आपणांस अंशें करून ज्ञात होतात. कधीं कधीं पारलौकिक स्थितिविषयीं स्पष्ट उल्लेखहि सांपडतात. यासाठीं वेदकालच्या परलोकासंबंधाच्या व मनुष्य मृत झाल्यानंतर त्याचें काय होतें यासंबंधाच्या कल्पना आपणांस गोळा करणें अवश्य होतें.