प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
सूतवृत्तें प्राकृतांत असावींत.- मत्स्य, वायु व ब्रह्माण्ड यांमधील संस्कृतमध्यें दिलेली हकीकत पूर्वी प्राकृत श्लोकांमध्यें असली पाहिजे, याविषयीं पुष्कळ प्रमाणें आहेत. उदाहरणार्थ, संस्कृत पाठांमध्यें ब-याच ठिकाणीं वृत्तभंग झालेला आहे; कांहीं प्राकृत शब्द जसेचे तसेच ठेवून दिलेले आढळतात, व त्याचप्रमाणें अनियमित संधीचींहि उदाहरणे दृष्टोत्पत्तीस येतात. विष्णु व भागवत यांमध्यें सुद्धां जेथें जेथें पूर्वींचे श्लोक आहेत तेथें तेथें हाच प्रकार आढळतो.
जुने श्लोक व प्राकृत शब्दांचे नमुने यांवरून पाहतां असे दिसतें कीं, पूर्वींची प्राकृत संस्कृत भाषेपासून फारशी निराळी नव्हती. पार्गिटरे साहेबांच्या मते हिंदुस्थानामध्यें लेखनकला अजमासें ख्रि. पू. ७०० च्या सुमारास अस्तित्वांत आली असावी, व त्याच वेळीं तिचा सरकारी कागदपत्रांत व तवारिखी लिहिण्याच्या कामींहि उपयोग होऊं लागला असावा. या सरकारी नोकरांनीं लिहून ठेवलेली मूळ हकीकत संस्कृतपेक्षां प्राकृतमध्येंच असणें अधिक संभवनीय दिसतें. या इतिहाससामुग्रींतूनच भाट, चारण, कवी वगैरे लोकांनीं आपलीं काव्यें केलीं असावींत. मगध देश हा त्या वेळीं मुख्य असल्यामुळें सर्व इतिहास पुष्कळसा मगधालाच अनुलक्षून आहे. यावरून असें म्हणण्यास हरकत नाहीं कीं, पूर्वीचें श्लोक मागधीमध्येंच रचले गेले असावेत. किंवा ज्या अर्थीं तो इतिहास हिंदुस्थानामध्येंच लिहून प्रसिद्ध झाला होता, व ज्या अर्थीं भागवतांतील निदान एक तरी श्लोक आज पालींत उपलब्ध आहे, त्या अर्थीं हे श्लोक प्रथम किंवा नंतर तरी पालीमध्येंच लिहिले असावेत.