प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
साम्राज्याचा आरंभ - बिंबिसार.- गिरिव्रज येथील राजांच्या कारकीर्दीत होणारी नव्या पंथाची आणि मगध येथील राज्याची वाढ बिंबिसार राजाच्या कारकीर्दींत पूर्णतवास आली. जैन ग्रंथांत त्याला श्रेणिक आणि बौद्ध ग्रंथांत त्याला वैश्य असें म्हटलें आहे. त्यानें वैशाली येथील राजकन्येशीं लग्न केलें. जैन ग्रंथांत तिला चेल्लना हें नांव आहे. ती वैशाली येथील चेतक राजाची कन्या होती. बौद्ध ग्रंथांत तिला वासवी असें दुसरें नांव आहे. वैशाली हें व्यापाराचें मोठें केंद्र होतें; व त्यामुळें मगध देशाच्या व्यापाराचीहि साहजिकपणेंच वाढ झालीं असावीं.
वैशाली देशांतील राजकन्येशीं झालेला लग्नसंबंध राजकीय व व्यापारी दृष्ट्या फार महत्त्वाचा होता. वैशाली हें एका अति बलाढ्य लिच्छवी संघाचें ठाणें होतें. बिंबिसाराचा आपल्या सास-याशीं व या संघाशीं स्नेहसंबंध असल्यामुळें त्याच्या ईशान्य सरहद्दीवर नेहमीं शांतता असे. बिंबिसार ह्यानें कोशलच्या राजकन्येशीं लग्न करून त्या देशाशीं मैत्री संपादन केली. ह्या लग्नामुळें त्याला बराच प्रांतहि आंदण मिळाला. ह्याप्रमाणें बिंबिसार ह्यानें पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील बंदोबस्त केल्यावर अनंग देशाकडे आपला मोर्चा फिरविला. ह्या मोहिमेंत पंचाल देशाच्या नागराजानें बिंबिसार ह्याला मदत केली. ह्या मोहिमेची सविस्तर हकीकत सांडत नाहीं; पण एवढें सिद्ध होतें कीं, मगध देशाच्या राज्यांत अनंग देशहि येत होता. मगध देशाचा ह्याप्रमाणें विस्तार व महत्त्व वाढल्यावर बिंबिसार ह्यानें गिरव्रज येथील आपली राजधानी सोडून देऊन राजगृह ही मोठी राजधानी बांधली.
ह्या वेळच्या धार्मिक चळवळीहि बिंबिसार ह्याच्या कारकीर्दीत पूर्णत्वास आल्या. वासुदेवानें पश्चिमेकडील शूरसेनांमध्यें प्रचलित केलेल्या वासुदेवधर्माचाहि येथें प्रसार झाला. ह्याचप्रमाणें बौद्धपंथाचाहि येथें प्रसार झाला होता. बहारच्या जैन दंतकथेंत बिंबिसार हा जैनभक्त होता असें आहे. ह्याच वेळीं निरनिराळ्या इतर धर्मपंथांचीहि स्थापना झाली. त्यांपैकीं मुख्य म्हटला म्हणजे आजीविकांच गोशाल ह्यानें स्थापिलेला पंथ होय.