प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
राजांचीं नांवें आणि अनुक्रम.- निरनिराळ्या पुराणांत दिलेल्या बारा राजांचीं नांवें बहुतेक सारखींच आहेत. दीपवंशांत देखील बिंबिसार, अजातशत्रु, उदय आणि शिशुनाग हीं नांवें आहेत. त्यांतील नागदशक हें पुराणांतील दर्शक किंवा हर्षक ह्या नांवाप्रमाणेंच आहे. महावंशामधील कालाशोक हें नांव काकवर्ण ह्या अर्थाचेंच आहे. महावंशामध्यें नंदिवर्धन आणि सहालिन (साहल्य अथवा सुमाल्य) अशीं आणखी दोन नांवें सांपडतात, परंतु त्यांनां दुसरीकडे कोठेंहि आधार सांपडत नाहीं. महापद्म आणि महामंडल अथवा उग्रसेन ही नांवें समानार्थी आहेत. सदरहू ग्रंथांप्रमाणें पाहतां पौराणिक यादींत महानंदी आणि दिव्यावदान आणि महावंश ह्यांमध्यें मुण्ड अशीं दोन विलक्षण नांवें सांपडतात.
दर्शक हा ऐतिहासिक पुरुष नव्हता असें महावंशांत दिलें आहे. पण त्याच्या अस्तित्वाबद्दल निरनिराळे आधार सांपडतात. भास कवीच्या स्वप्नवासवदत्ता नाटकांत ह्याला मगधदेशचा महाराजा म्हटलें आहे. हा उदयन वत्सराज ह्याचा शालक होता. ह्या माहितीस दिव्यावदान ग्रंथानें पुष्टि दिलेली आहे. शिवाय बाणाच्या हर्षचरित काव्यांत ह्याला भासाप्रमाणेंच महासेन म्हटलें आहे. दर्शक हा अजातशत्रु, प्रद्योत आणि बुद्ध ह्यांच्यानंतर दोन पिढ्यांनीं झाला, म्हणजे तो उदयानंतर जन्मला. बुद्धनिर्वाणानंतर दर्शक हा ४६ वर्षांनीं गादीवर आला असा देखील दीपवंशांत आधार सांपडतो.