प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
मूळ आधारग्रंथ, भविष्यपुराण.- भविष्यपुराण हाच आपला आधारग्रंथ आहे, असें मत्स्य व वायु या पुराणांमध्यें सांगितलें आहे (तान् सर्वान् कीर्तयिष्यामि भविष्ये कथितान् नृपान्). मत्स्य, वायु व ब्रह्मांड यांमध्यें 'भविष्य' हा शब्द ५३ दां आला आहे, व त्या शब्दाचा 'पुढील' किंवा 'पुढें होणारें' असा अर्थ न घेतां 'भविष्यपुराण' असाच अर्थ घ्यावा लागतो.
भविष्य हा इतर पुराणांचा मूळ आधारग्रंथ आहे, पण त्याच्या प्रती ज्या सध्यां मिळतात किंवा ऐकिवांत आहेत त्या अशुद्ध व निरुपयोगी आहेत.