प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
प्रागैतिहासिक मगध.- (मगंद व मगध यांवरील वैदिक माहितीसाठीं विभाग ३ पहा.) अथर्व आणि यजुः या वेदांमध्यें मगध आणि तेथील लोकांविषयीं जो उललेख आला आहे त्यावरून असें दिसतें कीं, त्या वेळीं तेथें श्रौत संस्कृतीचा प्रसार झाला नव्हता. प्राचीन सूत्रांवरून येथें अयाजक ब्राह्मणांची वस्ती होती असें दिसतें. मगध देशाचें राज्य महाभारतांतील युद्धापूर्वींचें आहे अशी माहिती पुराणांत आहे. पुराणांत आणि हरिवंशांत बृहद्रथ हा मगध देशाच्या प्राचीनतम घराण्याचा संस्थापक होता असें दिलें आहे. तो उपरिचर वसु ह्याचा पुत्र होता. आणि उपरिचर वसु हा चेदि येथील राजा होता असें हरिवंशांत म्हटलें आहे. बृहद्रथ ह्याला वायुपुराणांत महारथ असें दुसरें नांव आहे.
बृहद्रथापासून महाभारतीय युद्धापर्यंत तीन, आणि तेथून पुढें गौतमबुद्धापर्यंत तेवीस पिढ्या झाल्या. बृहद्रथाच्या घराण्यांत ३२ राजपुत्र झाले असें पुराणांत दिलें आहे. परंतु सहदेवानंतर वास्तविक तेवीसच राजांचीं नांवें वायुपुराणांत दिलेलीं आहेत [ब्रह्माण्डपुराणांत २२, भागवतांत २१, विष्णुपुराणांत २१ व मत्स्यांत २२ आहेत]. ह्यांत आणखी बृहस्थ वंशांतील नांवें घातल्यास म्हणजे सहदेवाशिवाय बृहद्रथाच्या दुस-या पुत्राचे सात पुत्र मिळविल्यास ३० होतात. पुढें ह्यांत जरासंध व सहदेव हीं दोन नांवें मिळविलीं म्हणजे एकंदर ३२ होतात. हे सर्व बृहद्रथाच्या वंशांतील होते असा पुराणांतील आधार आहे. ह्यांपैकीं २३ जणांनीं बृहद्रथानंतर मगध देशांत राज्य केलें.
शेवटल्या बृहद्रथा [बार्हद्रथा] नंतर अवंतीचा चंडप्रद्योत किंवा त्याचा बाप गादीवर आला अशी पौराणिक माहिती आहे. ह्यावरून असें वाटतें कीं, बृहद्रथ घराणें गौतमबुद्धाच्या वेळेपर्यंत होतें. पण मध्यंतरीं शिशुनाग ह्यानें मगध देशाची गादी बळकाविली. गिरिव्रज येथील राजांकडून बृहद्रथ घराण्याचा पूर्णपणें नाश होईपर्यंत त्या घराण्यांतील राजे मगध देशाचे मांडलिक होते असें म्हणण्यास हरकत नाहीं.