प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

प्राकृत इतिहासाचें संस्कृतमध्यें रूपांतर.- राजघराण्यांचा इतिहास देणें हा पुराणांचा विषय असल्यामुळें भविष्यपुराणांत त्याचें नांव सार्थ करण्याकरितां त्याच्यामागून जीं घराणीं झाली त्यांचा निर्देश करणें भाग होतें. यामुळें पूर्वीं जो प्राकृतामध्यें लिहिलेला श्लोकबद्ध इतिहास होता त्याचें संस्कृतमध्यें रूपांतर करून तो त्यांत अंतर्भूत करण्यांत आला.

पूर्वींचे लेख प्राकृत श्लोकांमध्यें असल्यामुळें रूपांतर करतांना प्राकृत शब्दांच्या ऐवजीं संस्कृत शब्द ठेवणें व भूतकाळाच्या जागीं भविष्यकाळ करणें एवढाच फरफार करण्याची अवश्यकता होती. या क्रियेंत हें रूपांतर अशुद्ध झालें व कोठें कोठें व्याकरणाचा दोष किंवा वृत्तभंगहि झाला. याच चुका पुढें मत्स्यादि ज्या पुराणांनीं भविष्यावरून मजकूर घेतला त्यांतहि शिरल्या.