प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
पुराणांतील इतिहासरचना तिस-या व चौथ्या शतकांतील असावी.- असें मानण्याला दोन प्रकारचे पुरावे आहेत; (१) ग्रंथाचा विषय व (२) पाठांतील विशेष. वंशावळीचा इतिहास दोन ठिकाणीं संपलेला दिसतो. यांपैकीं पहिलें ठिकाण म्हणजे आंध्र व इतर स्थानिक राज्यें यांच्या पाडावानंतरचा काल होय. म्हणजे हा इतिहास ३ -या शतकाच्या मध्यापर्यंत आलेला आहे. मत्स्यपुराणामध्यें इतकाच इतिहास आहे.
वायु, ब्रह्मांड, विष्णु आणि भागवत यांमध्यें गुप्तांच्या उदयकालापर्यंत इतिहास सांगितला आहे; व गुप्तांच्या अंमलाखालीं म्हणून जे देश सांगितले आहेत ते सर्व देश किंवा तो मुलूख पहिल्या चंद्रगुप्ताच्या मरणकालीं म्हणजे इ. स. ३३५ मध्यें त्यांच्या ताब्यांत होता. या इतिहासामध्यें समुद्रगुप्ताच्या स्वारीची किंवा त्यानंतरची कांहींच हकीकत नाहीं; समुद्रगुप्त हा चंद्रगुप्ताचा मुलगा व वारस होता, व त्यानें आपल्या मोहिमेला आरंभ राज्यारोहण झाल्याबरोबरच केला होता. जर हा इतिहास यानंतर लिहिलेला असता तर समुद्रगुप्ताच्या स्वा-यांची हकीकत त्यांत आली असती. अर्थात् गुप्तराज्याचा आरंभ व समुद्रगुप्ताच्या स्वा-या यांमधील कालापर्यंतचा - म्हणजे सरासरी इ. स. ३३५ पर्यंतचा - हा इतिहास असावा.
यावरून असें दिसते कीं, हा कविताबद्ध इतिहास (जो मत्स्य पुराणामध्यें सांपडतो तो) ३ -या शतकाच्या मध्याच्या सुमारास एकत्रित केला गेला असावा, व नंतर ३३५ पूर्वीं त्याला गुप्तराज्यापर्यंतची हकीकत जोडली गेली असावी. ही वाढविलेली हकीकतच वायु व ब्रह्माण्ड पुराणांत सविस्तर आणि विष्णु व भागवत पुराणांत सारांशरूपानें दिलेली आहे. आतां ज्या अर्थीं मत्स्य, वायु व ब्रह्माण्ड या सर्व पुराणांनीं आपली माहिती भविष्यपुराणांतूनच घेतली होती त्या अर्थी भविष्यपुराणामधील आरंभींचा इतिहास ख्रि. श. च्या ३ -या शतकाच्या मध्याच्या सुमारास लिहिलेला असावा, व पुढील भविष्यात्मक इतिहास नंतर ३३५ पूर्वीं घातला गेला असावा.
कुरुयुद्धांतानंतरच्या सूतवाङ्मयाच्या एकीकरणानंतर आणि आंध्रांच्या अंतानंतरच्या एकीकरणापूर्वीं मगधराज सेनाजितच्या कारकीर्दींत आणखी एक एकत्रीकरण झालें असावें.
एका (-वायु, जोन्स या) हस्तलिखितामध्यें सर्व इतिहास आहे. पण ती प्रत मत्स्याला पाठ आणि वायूच्या इतर प्रतींतील पाठ यांच्यामधील आहे. याचें स्पष्टीकरण पुढीलप्रमाणें करतां येईल. मत्स्यानें भविष्यामध्यें तिस-या शतकापर्यंत असलेला अपुरा इतिहास घेतला; व वाचूनें गुप्तराज्याच्या हकीकतीपर्यंतचा इतिहास ताबडतोब घेतला. ई-वायु प्रतीचा हाच पाठ होय. यानंतर पुन्हां एकदां लगेच भविष्याची तपासणी होऊन सुधारणा झाली असावी. हा सुधारलेला इतिहास वायूनें जो घेतला तोच इतर वायु प्रतींचा पाठ असावा. भविष्यपुराण प्रथम तपासणीच्या वेळीं लिहिलेलें होतें, हें वायूच्या सर्व हस्तलिखितांमध्यें आलेल्या 'पठित' या शब्दावरून सिद्ध होतें.
हें जर स्पष्टीकरण बरोबर असेल तर मत्स्यपाठ हा वायु आणि ब्रह्माण्ड यांच्यापेक्षां जुना असला पाहिजे; आणि ई-वायु ही वायूची अगदीं प्रथम प्रत होय. या सर्व पाठांच्या भाषाशैलीवरूनहि हेंच सिद्ध होतें.
मत्स्य, वायु व ब्रह्माण्ड या सर्वांमध्यें 'कलियुगांतील दुःस्थिति', राजपरंपरा व ज्योतिष यांविषयीं गोष्टींचा इतिहास आहे. परंतु यासंबंधीं वायु व ब्रह्माण्ड यांच्या पाठांमध्यें मत्स्य पाठापेक्षां ३२ ओळी जास्त आहेत, व ई-वायु या प्रतीमध्यें सुद्धां हा अधिक इतिहास आहे. अर्थात् तो प्रथम तपासणीच्या वेळेलाच जोडला गेला असला पाहिजे.
राजपरंपरा व ज्योतिष यासंबंधीं मात्र बहुतेकांचा एक मेळ दिसतो (२७०० वर्षांचें सप्तर्षि चक्र तेव्हां ज्ञात होतेंसें दिसतें).