प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

पुराणांचें स्वरूप व भिन्न पाठ.- मत्स्य, वायु व ब्रह्मांड यांच्या पाठांमध्यें विलक्षण सारखेपणा दिसून येतो; यावरून ते सर्व एकाच ग्रंथावरून घेतले असावेत असें दिसतें.

विष्णु आणि भागवत हींसुद्धां बरींचशीं सारखी आहेत. त्या दोन्हींमध्यें मुख्य फरक एवढाच आहे कीं, भागवत हें कविताबद्ध आहे आणि विष्णु हें पुष्कळसें गद्यांत आहे. हीं दोन्ही पुराणें मत्स्य, वायु व ब्रह्मांड यांसारखीं विस्तृतशः लिहिलेली नाहींत. त्यामुळें फक्त नांवें व कधीं कधीं नातें दाखविणारे शब्द यांपलीकडे त्या दोन्हींमध्यें विशेष अशी हकीकत क्वचितच आढळते. परंतु, त्यांच्यामध्यें व वरील तीनहि पुराणांमध्यें सुद्धां बराचसा सारखेपणा दिसून येतो. त्यामुळें यांचा व त्यांचा मूळ आधार जवळ जवळ एकच होता असें म्हणण्यास हरकत नाहीं.

गरुडामध्यें फक्त पौरव, ऐक्ष्वाकु व बार्हद्रथ हीं घराणी सांगितलीं आहेत, व त्यांमध्यें नांवांपलीकडे कांहींच नाहीं.

भविष्यपुराणाची पूर्वींच्या घराण्यांसंबंधीं माहिती असलेली अशी फक्त वेंकटेश्वर प्रतच आहे. परंतु तिच्यांतील माहितीसुद्धां अशुद्ध व निरुपयोगी आहे. दुस-या प्रतींमध्यें पूर्वींच्या ब-याच गोष्टी गाळल्या आहेत; व कांहीं अगदीं अलीकडच्या सांगितल्या गेल्या आहेत.