प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

निरनिराळ्या पुराणांच्या माहितींतील भिन्नपणाचीं कारणें.- मत्स्य, वायु व ब्रह्माण्ड यांचा मूलाधार ग्रंथ जरी एकच होता, तरी हल्लींची हस्तलिखितें बरींच अशुद्धिपूर्ण आहेत. त्या अशुद्धी बहुतेक नकला करणारांच्या चुकीमुळें किंवा लिहिलेलीं पानें गहाळ झाल्यामुळें उद्भवल्या आहेत; व कांहीं नवीन गोष्टीहि ग्रंथसुधारणा करतांना घुसडल्या गेल्या आहेत. परंतु, जनमेजय व ब्राह्मण यांच्यामधील भांडणाच्या गोष्टीशिवाय पार्गिटेरच्या मतें धडधडीत खोटेपणा केलेला कोठेंहि दिसत नाहीं.

तेव्हां साधारणपणें पाहतां प्रस्तुत पाठांमध्यें व मूळ ग्रंथामध्यें विशेष फरक पडलेला नाहीं असें म्हणावयास हरकत नाहीं. परंतु कांहीं कांहीं भाग मात्र अजीबात नष्ट झालेले आहेत. एखाद्या पुराणामध्यें असा एखादा श्लोक आढळतो कीं, तो इतर कोणत्याहि पुराणामध्यें सांपडत नाहीं. उदा. शालिशूकासंबंधीं श्लोक फक्त ई-वायूमध्येंच आहे; किंवा भागवताच्या एकाच प्रतींत फक्त सुशर्म्यासंबंधीं श्लोक आढळतो. असे क्वचित् आढळणारे भाग सुद्धां वस्तुतः पूर्वपरंपरेचे अवशेषच आहेत.