प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

उदयन व प्रद्योत.- कौशाम्बी व अवंती येथील राजघराणीं अशाच सोयरिकीनें एकमेकांशीं निगडित झालीं होती. अवंतीची राजकन्या वसुलदत्ता (वासवदत्ता) व कौशांबीचा राजा उदयन यांची विवाहकथा धम्मपदाच्या २१-२३ या श्लोकांवरील टीकेंत मोठी मजेदार दिलेली आहे. ती हकीकत अशी : प्रद्योतानें (अवंतीच्या राजानें) मजपेक्षां वैभवानें श्रेष्ठ कोण असा प्रश्न एकदां आपल्या दरबा-यांस केला असतां, त्याला स्पष्ट सांगण्यांत आलें कीं, कौशाम्बी नगरीचा राजा उदयन हा तुजपेक्षां श्रेष्ठ आहे. तेव्हां प्रद्योतानें उदयनावर स्वारी करण्याचें ठरविलें. तें पाहून दरबारी लोकांनीं पुढें दिल्याप्रमाणें सल्ला दिली : 'उघडाउघडीं हल्ला करण्यांत अर्थ नाहीं; कारण उदयनाचें सामर्थ्य फार मोठें आहे. तेव्हां दगाफटका करून उदयनास कैद करावें हें चांगलें. उदयनाला सुंदर सुंदर हत्तींची शिकार करणें आवडतें, तेव्हां असा एखादा प्रसंग साधलेला बरा.' त्यावरून त्या राजानें एक लांकडाचा हत्ती तयार करवून त्याला उत्तम रंग वगैरे देऊन त्याच्या भोंवतीं साठ पाहरेकरी ठेविले; व जवळपास अशा त-हेचा सुंदर हत्ती सांपडण्यासारखा आहे अशी बातमी उदयनाच्या कानावर जाण्याची तजवीज केली. उदयन ह्या आमिषानें फसला व प्रद्योताच्या लोकांनीं त्याला कैद केलें. परंतु उदयनाला गजवशीकरणाची विद्या माहीत असल्यामुळें प्रद्योतानें त्याला जीवनदान व स्वातंत्र्य देऊं करून ती विद्या मला शिकव असें म्हटलें. उदयनानें उत्तर केलें कीं, तूं गुरु म्हणून मला नमस्कार करशील तर तुला ती विद्या शिकवितों. प्रद्योत म्हणाला : 'तुला, आणि नमस्कार ! हें तर कालत्रयींहि होणार नाहीं.' हें ऐकून उदयनानें विद्या सांगण्याचें नाकबूल केलें. पहिल्यानें प्रद्योताचा विचार उदयनास ठार करावें असा होता; पण उपर्युक्त विद्या त्यास एकट्यासच माहीत असल्यानें त्यानें जरासें नमतें घेतलें. त्यानें उदयनास विचारिलें: 'माझ्याखेरीज दुस-या कोणीं तुला नमस्कार केला तर त्याला तूं ही विद्या शिकविशील काय ?' उदयनानें होय म्हणून उत्तर दिलें. तेव्हां राजकन्येला पडद्याआड बसवावें व पडद्याच्या बाहेरून उदयनानें ही विद्या तिला सांगावी असें ठरलें. तुला एका कुब्जेला विद्या शिकवावी लागेल असें उदयनाला सांगण्यांत आलें होतें, व तुला एक खुजा मनुष्य विद्या शिकवील असें राजकन्येला सांगण्यांत आलें होतें. परंतु एक दिवस खरा प्रकार उघडकीस आला; आणि उदयन आणि ती राजकन्या हे दोघे प्रद्योत शिकारीस गेला असतां हत्तीवर बसून पळून गेले. उदयन आपल्या राज्यांत गेल्यावर त्यानें वासुलदत्तेला राज्ञीपदावर बसविलें. अशी ही गोष्ट आहे. ही गोष्ट पुढें भास कवीच्या एका नाटकाचा विषय झाली आहे.

या गोष्टींत ऐतिहासिक सत्य किती आहे हें निश्चयानें जरी सांगतां न आलें, तरी प्रद्योत व उदयन हे समकालीन राजे होते व त्यांच्यांत सोयरीकहि झाली होती एवढें यावरून स्पष्ट होतें.

या उदयनाच्या संबंधानें आणखीहि बरीच माहिती मिळते. पिण्डोल नांवाच्या एका बौद्धपंथानुयायी माणसाशीं अनेक वेळां वादविवाद झाल्यामुळें मनावर परिणाम होऊन उदयनानें बौद्ध संप्रदायाचा अंगीकार केला. उदयनाच्या बापाचें नांव परंतप होतें. त्याला बोधि नांवाचा एक मुलगा होता. या बोधीचें नांव एका सुत्तंताला दिलें आहे.