प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
राजांचा अनुक्रम.- शिशुनाग हा मगध घराण्याचा संस्थापक होता असें पुराणांत स्पष्ट रीतीनें सांगितलें आहे. परंतु बौद्ध आणि जैन ग्रंथांत शिशुनाग, काकवर्ण वगैरे ह्या घराण्यांतील बिंबिसारानंतरचे राजे आहेत अशी माहिती सांपडते. आतांपर्यंत अवलोकन केलेल्या ग्रंथाशिवाय इतर बौद्ध व जैन ग्रंथांचें अवलोकन केल्यानें ह्या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल लावतां येईल. हेमचंद्र यानें आधाराकरितां घेतलेल्या दंतकथेवरून असे लक्षांत येतें कीं, बिंबिसार हा प्रसेनजिताच्या नंतर जन्मला. तिबेटी बखरींत बिंबिसार हा मगध देशाच्या महापद्म राजाचा मुलगा होता असें दिलें आहे. ह्यावरून पौराणिक माहितीवर भरंवसा ठेवण्यास हरकत नाहीं असें दिसतें.
शिशुनाग हा यादींत पहिला येतो आणि त्याच्यानंतर काकवर्ण अथवा कालाशोक येतो असें महावंश व पुराणें ह्या दोहोंतहि दिलेलें आहे. यानंतर दोन पिढ्या मागून बिंबिसार झाला. बौद्ध आणि जैन ग्रंथांप्रमाणें ह्या पिढ्या महापद्म आणि प्रसेनजित् ह्यांच्या होत. परंतु पुराणांप्रमाणें क्षेत्रवर्मा आणि क्षत्रजित् हे या जागीं येतात. पुराणांतील सर्व नांवें समानार्थीच आहेत. तेव्हां बौद्धांनीं व जैनांनीं दिलेलीं व पुराणांत दिलेलीं राजांचीं नांवें एकच आहेत असें समजण्यास हरकत नाहीं. ह्या दंतकथांवरून महापद्म हा बिंबिसाराचा बाप आणि प्रसेनजित् ह्याचा मुलगा होता असें समजतें.
बिम्बिसार आणि अजातशत्रु ह्यांचा अनुक्रम सर्व ग्रंथांतून एकसारखा असल्यामुळें त्यांच्याविषयीं कांहींच प्रश्न उपस्थित होत नाहीं. वायु पुराणांतील कांहीं हस्तलेखांत अजातशत्रु हा बिंबिसार याचा आजा होता असें दाखविलें आहे. पण अजातशत्रु हा बिंबिसार ह्याचा मुलगा आहे ही गोष्ट प्रसिद्ध असल्यामुळें, वरील हकीकत उघडपणें चुकीची दिसते. बौद्धांच्या लेखांप्रमाणें उदय हा अजातशत्रूच्या नंतर झाला. पुराणांमध्यें अजातशत्रु आणि उदय ह्या दोहोंच्या मध्यें हर्षक अथवा दर्शक हा एक पुरुष जास्त दाखविला आहे. परंतु असें असते तर बौद्धांच्या लेखांत बिंबिसार, अजातशत्रु आणि उदय ह्यांचें इतकें वर्णन दिलेलें असतां त्यांनीं दर्शक ह्याचा उल्लेख देखील करूं नये असें झालें नसतें. दर्शक हा उदय ह्याच्या मागाहून झाला असें ठरविल्यानें ही भानगड मिटते.
ह्यानंतरच्या पुराणांप्रमाणें क्रम नंदिवर्धन व त्यानंतर महानंदी असा आहे. आणि बौद्ध ग्रंथांप्रमाणें नंदिवर्धन आणि महामुंड अथवा मुंड असा आहे. त्यानंतर महापद्म आणि सुमाल्य अथवा सहल्य हे येतात. ह्यांचा विष्णु आणि भागवत ह्या पुराणांनीं दुस-याच एका घराण्यांत समावेश केलेला आहे. महावंशामध्यें कालाशोक, त्याचे दहा पुत्र आणि त्यांचे नऊ वंशज इतक्यांचीं नांवें दिलेलीं आहेत. परंतु सबळ पुरावा नसल्यामुळें हीं नांवें गाळण्यास हरकत नाहीं. ह्यानंतर नंद येतात. सर्व दंतकथांप्रमाणें चंद्रगुप्त नंदांच्या नंतर लगेच गादीवर आला. म्हणून शेवटला नंद आणि चंद्रगुप्त ह्यांच्यामध्यें चाणक्य ह्याची शंभर वर्षांची कारकीर्द झाली ही पुराणांतील माहिती चुकीची आहे. ह्या चुकीचें कारण पुराणांतील माहितीची तारिखवार नोंद नाहीं हेंच बहुतकरून होय.