प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
राजांचा अनुक्रम.- शिशुनाग हा मगध घराण्याचा संस्थापक होता असें पुराणांत स्पष्ट रीतीनें सांगितलें आहे. परंतु बौद्ध आणि जैन ग्रंथांत शिशुनाग, काकवर्ण वगैरे ह्या घराण्यांतील बिंबिसारानंतरचे राजे आहेत अशी माहिती सांपडते. आतांपर्यंत अवलोकन केलेल्या ग्रंथाशिवाय इतर बौद्ध व जैन ग्रंथांचें अवलोकन केल्यानें ह्या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल लावतां येईल. हेमचंद्र यानें आधाराकरितां घेतलेल्या दंतकथेवरून असे लक्षांत येतें कीं, बिंबिसार हा प्रसेनजिताच्या नंतर जन्मला. तिबेटी बखरींत बिंबिसार हा मगध देशाच्या महापद्म राजाचा मुलगा होता असें दिलें आहे. ह्यावरून पौराणिक माहितीवर भरंवसा ठेवण्यास हरकत नाहीं असें दिसतें.
शिशुनाग हा यादींत पहिला येतो आणि त्याच्यानंतर काकवर्ण अथवा कालाशोक येतो असें महावंश व पुराणें ह्या दोहोंतहि दिलेलें आहे. यानंतर दोन पिढ्या मागून बिंबिसार झाला. बौद्ध आणि जैन ग्रंथांप्रमाणें ह्या पिढ्या महापद्म आणि प्रसेनजित् ह्यांच्या होत. परंतु पुराणांप्रमाणें क्षेत्रवर्मा आणि क्षत्रजित् हे या जागीं येतात. पुराणांतील सर्व नांवें समानार्थीच आहेत. तेव्हां बौद्धांनीं व जैनांनीं दिलेलीं व पुराणांत दिलेलीं राजांचीं नांवें एकच आहेत असें समजण्यास हरकत नाहीं. ह्या दंतकथांवरून महापद्म हा बिंबिसाराचा बाप आणि प्रसेनजित् ह्याचा मुलगा होता असें समजतें.
बिम्बिसार आणि अजातशत्रु ह्यांचा अनुक्रम सर्व ग्रंथांतून एकसारखा असल्यामुळें त्यांच्याविषयीं कांहींच प्रश्न उपस्थित होत नाहीं. वायु पुराणांतील कांहीं हस्तलेखांत अजातशत्रु हा बिंबिसार याचा आजा होता असें दाखविलें आहे. पण अजातशत्रु हा बिंबिसार ह्याचा मुलगा आहे ही गोष्ट प्रसिद्ध असल्यामुळें, वरील हकीकत उघडपणें चुकीची दिसते. बौद्धांच्या लेखांप्रमाणें उदय हा अजातशत्रूच्या नंतर झाला. पुराणांमध्यें अजातशत्रु आणि उदय ह्या दोहोंच्या मध्यें हर्षक अथवा दर्शक हा एक पुरुष जास्त दाखविला आहे. परंतु असें असते तर बौद्धांच्या लेखांत बिंबिसार, अजातशत्रु आणि उदय ह्यांचें इतकें वर्णन दिलेलें असतां त्यांनीं दर्शक ह्याचा उल्लेख देखील करूं नये असें झालें नसतें. दर्शक हा उदय ह्याच्या मागाहून झाला असें ठरविल्यानें ही भानगड मिटते.
ह्यानंतरच्या पुराणांप्रमाणें क्रम नंदिवर्धन व त्यानंतर महानंदी असा आहे. आणि बौद्ध ग्रंथांप्रमाणें नंदिवर्धन आणि महामुंड अथवा मुंड असा आहे. त्यानंतर महापद्म आणि सुमाल्य अथवा सहल्य हे येतात. ह्यांचा विष्णु आणि भागवत ह्या पुराणांनीं दुस-याच एका घराण्यांत समावेश केलेला आहे. महावंशामध्यें कालाशोक, त्याचे दहा पुत्र आणि त्यांचे नऊ वंशज इतक्यांचीं नांवें दिलेलीं आहेत. परंतु सबळ पुरावा नसल्यामुळें हीं नांवें गाळण्यास हरकत नाहीं. ह्यानंतर नंद येतात. सर्व दंतकथांप्रमाणें चंद्रगुप्त नंदांच्या नंतर लगेच गादीवर आला. म्हणून शेवटला नंद आणि चंद्रगुप्त ह्यांच्यामध्यें चाणक्य ह्याची शंभर वर्षांची कारकीर्द झाली ही पुराणांतील माहिती चुकीची आहे. ह्या चुकीचें कारण पुराणांतील माहितीची तारिखवार नोंद नाहीं हेंच बहुतकरून होय.
सनावळी.- हें सर्व घराणें ३६० अथवा ३६२ वर्षें होतें असें पुराणांत दिलें आहे. नंतर महापद्म आणि त्याचे पुत्र यांच्या कारकीर्दीला शंभर वर्षें देऊन चाणक्याच्या कारकीर्दीला आणखी शंभर वर्षें दिलीं आहेत. जैनांनीं नंद घराण्याची कारकीर्द १५५ वर्षांची दिलेली आहे. परंतु ही कारकीर्द दोन पिढ्या होती असें पुराणें म्हणतात.
बुद्धाच्या निर्वाणापासून तों चंद्रगुप्ताच्या राज्यारोहणापर्यंतच्या कालासंबंधांत महावंश, हेमचंद्र आणि पुराणें ह्या तिन्हींमधील माहितीचा मेळ जमतो. पुराणांत नऊ नंदांच्या कारकीर्दीला १०० वर्षें लाविलेलीं असून कौटिल्यासहि तितकीच वर्षें दिलेलीं आहेत. म्हणजे पहिल्या नंदापासून तों पहिल्या मौर्यापर्यंत एकंदर २०० वर्षें धरलेलीं आहेत. वेंकटेश्वर अय्यर यांच्या मतें नंदांची कारकीर्द दोनशें वर्षें होती ही पौराणिक माहिती चुकीची नाहीं, पण ती दोन पिढ्या होती हें म्हणणें चुकीचें आहे. कारण महापद्म हा नंदवंशांतील पहिला पुरुष आहे, परंतु तो नंदिवर्मा याच्या नंतरचा नसून बिंबिसार ह्याचा बाप होय. ह्याप्रमाणें नऊ नंद हे शैशुनाग घराण्यांतील शेवटले नऊ राजपुरुष होत.
आतां शैशुनाग घराणें केव्हां गादीवर आलें हें ठरवूं. बुद्धनिर्वाणाचा काळ ख्रि. पू. ४७७ आणि ४८७ यांच्या दरम्यान आहे हें बहुतेक ठरलेलेंच आहे. बौद्ध ग्रंथांप्रमाणें ही गोष्ट अजातशत्रूच्या कारकीर्दींच्या आठव्या वर्षीं घडली. पुढें पुराणांप्रमाणें बिंबिसार ह्याची २८ वर्षें कारकीर्द झाली. बिंबिसार ह्याच्या पूर्वीं चार पिढ्या झाल्या. त्यांतील प्रत्येक पिढी बावीस वर्षें होती असें समजूं. ह्याप्रमाणें ४७७ पासून मागें मोजत गेलें असतां असें दिसून येईल कीं, ख्रि. पू. ६०० मध्यें शैशुनाग घराण्याची स्थापना झाली असली पाहिजे. [व्ही. स्मिथच्या मतें ती ६४२ मध्यें झाली असावी.]
आतां ह्या घराण्यांती प्रत्येक राजानें किती वर्षें राज्य केलें हें ठरवावयाचें आहे. शिशुनाग पुराणांप्रमाणें ४० आणि महावंशाप्रमाणें १८ वर्षें गादीवर होता. मगध जिंकण्यापूर्वीं तो काशीचा राजा होता; व म्हणून वेंकटेश्वर अय्यर यांच्या मतें त्याच्या कारकीर्दींस अठरा वर्षेंच रास्त दिसतात.
काकवर्ण हा ३६ वर्षें राज्य करीत होता; पण मत्स्यपुराणाच्या कांहीं प्रतींत २६ वर्षें दिलेलीं आहेत, आणि तीं बौद्धांनीं दिलेल्या माहितीशीं जुळतात म्हणून स्वीकार करण्यास हरकत नाहीं.
क्षेत्रवर्मा ह्याची कारकीर्द पुराणांत ३६ वर्षें आहे. परंतु वायु आणि ब्रह्माण्ड पुराणांच्या हस्तलेखांत २० वर्षें दिलेलीं सांपडतात.
क्षत्रौजस् उर्फ महापद्म ह्याच्या कारकीर्दीचीं मत्स्यपुराणांत २४ वर्षें दिलेलीं आहेत.
बिंबिसार उर्फ श्रेणिक ह्याची सर्वानुमतें २८ वर्षांची कारकीर्द होती (फक्त महावंशांत मात्र ती ५२ वर्षांची दिली आहे).
अजातशत्रूकरितां वायु पुराणांत २५, मत्स्य पुराणांत २७, ब्रह्माण्ड पुराणांत ३५ आणि बौद्ध ग्रंथांत ३२ अशी वर्षें दिलेलीं आहेत. बौद्धांनां ह्याची विशेष माहिती होती म्हणून त्यांनीं दिलेलीं वर्षें खरीं समजण्यास हरकत नाहीं.
उदय ह्याची कारकीर्द बौद्ध ग्रंथांप्रमाणें १६ वर्षें होती व त्याला जैन दंतकथेचा आधार आहे.
दर्शक हा २४ वर्षें राज्य करीत होता, ह्या गोष्टीला महावंशाचा आधार सांपडतो.
नंदिवर्धन ह्याची कारकीर्द २२ वर्षें धरण्यास हरकत नाहीं.
महानंदी हा बौद्धांच्या कालाशोक राजाचा समकालीन असून त्यानें देखील त्याच्याप्रमाणें २८ वर्षें राज्य केलें.
महापद्म हा २८ वर्षें होता असें वायु पुराणांत दिलें आहे.
सहल्य ह्याच्या कारकीर्दीचीं मत्स्यपुराणांत १२ वर्षें दिलेलीं असून त्याला महापद्म ह्याचे आठ पुत्र जिंकण्यास आणखी १२ वर्षें लागलीं असेंहि दिलें आहे. त्याच्या कारकीर्दीस वायुपुराणांत १६ वर्षें आणि महावंशांत २२ वर्षें दिलेलीं आहेत.
नंद.- पुराणांपैकीं विष्णुपुराणांत महापद्म ह्याला नंद हें नांव दिलें आहे; त्याचप्रमाणें भागवतांत महापद्म ह्याचें नांव आलें आहे. पण मत्स्य, वायु आणि ब्रह्माण्ड पुराणांत नंदाचा नामनिर्देशहि केलेला नाहीं. बौद्ध लेखांतून नंद घराण्याची मुळींच माहिती दिलेली नाहीं, परंतु शेवटले नऊ राजे बिंबिसार ज्या घराण्यांतील होता त्या घराण्यांतलेच होते असें दिलेलें आहे. शिशुनाग ह्याला दहा भाऊ होते आणि त्यांनीं त्याच्यानंतर राज्य केलें असें दीपवंशांत सांगितलें आहे. नंद आणि शैशुनाग हे निरनिराळे नव्हते असें दिव्यावदानांत दिलें आहे. नंद हे उदय ह्याच्या नंतरचे नऊ राजपुरुष असून, त्यांच्या नऊ पिढ्या झाल्या असें जैन दंतकथेंत सांगितलें आहे. ह्या दंतकथेशीं पुराणांची देखील एकवाक्यता आहे. वरील गोष्टींवरून इतकें सिद्ध होतें कीं, नंद हे शैशुनाग घराण्यांतील शेवटले राजे होते. शकावलींतील माहितीवरून देखील हीच गोष्ट सिद्ध होते. जैनांनीं नंदांची कारकीर्द १५५ वर्षे दिलेली आहे. महावीर ह्याच्या निर्वाणानंतर १५५ वर्षांनीं चंद्रगुप्त हा गादीवर आला असें हेमचंद्र म्हणतो; आणि महावीर आणि बिंबिसार हे समकालीन होते, म्हणून बिंबिसारापासून पुढें झालेल्या राजांनां नंद घराण्यांतील राजे म्हणण्यास हरकत नाहीं. ह्याप्रमाणें शैशुनागांसंबंधी आणि नंदांसंबंधीं उपलब्ध असलेल्या माहितींत थोडाबहुत घोटाळाच आहे. परंतु नऊ नंदांची कथा इतकी प्रसिद्ध आहे कीं, ती बहुतेक प्रत्येक दंतकथेंत आली आहे. म्हणून असें वाटतें कीं, नंद नांवाचे नऊ राजे खरोखरच झाले असावे, आणि म्हणूनच 'नवनंदाः' असें नांव पडलेलें आहे. हे कालाशोक अथवा काकवर्ण ह्याच्या नंतर झालेल्या राजाचे पुत्र होते असें महावंशांत सांगितलें आहे. म्हणजे बिंबिसार ह्याच्या बापापर्यंत माहिती मिळाली. ह्यालाच बौद्ध लोक महापद्म असें म्हणत असत. त्याच मागून आठ राजे झाले. पुराणांप्रमाणें महापद्म हा नऊ नंदांपैकीं पहिला होय. आतां क्षेत्रवर्म्याचा मुलगा महापद्म ह्याचे ते पुत्र होते असें म्हणण्याऐवजीं वंशज अथवा उत्तराधिकारी होते असें म्हटल्यानें बौद्ध आणि पौराणिक हकीकतींचा मेळ बसतो.
नंद घराण्यांतील शेवटला पुरुष.- ए. व्ही. स्मिथ म्हणतो कीं, महापद्म हा महानंदी ह्याच्या राणीला न्हाव्यापासून झाला. परंतु बौद्ध आणि जैन ग्रंथांतून ह्या गोष्टीचा कोठेंहि उल्लेख नाहीं. मेरुतुंग ह्याचें तो न्हावीण गणिकेपासून झाला असें म्हणणें आहे. ग्रीक लेखकांनीं गंगारडींच्या राजासंबंधीं जो इतिहास दिला आहे त्याचाच स्मिथ यानें आधार घेतला असावा असें दिसतें. राजाला शूद्र गणिकेपासून पुत्र झाला असा पुराणांत उल्लेख आहे. चम्पाची एक ब्राह्मण स्त्री एका मौर्य राजाकडे न्हाविणीचें काम करीत होती, आणि पुढें त्यानें तिच्याशीं लग्न लाविलें व तिच्यापासून त्याला अशोक हा मुलगा झाला असें दिव्यावदानांत दिलें आहे.
ह्याप्रमाणें नंदाचा किंवा जनपदकल्याणीचा कसा तरी हलकीं कामें करणा-या लोकांशीं किंवा हलक्या कुळाशीं संबंध जोडलेला सांपडतो.
नंदांच्या नंतर चंद्रगुप्त गादीवर आला. मुद्राराक्षस नाटकांत चंद्रगुप्त मौय हा नंदांच्याच घराण्यांतला होता असें आहे. महावंशाप्रमाणें तो कपिलवस्तूच्या शाक्य वंशांतील होता. त्याचा बाप मयूरपुरचा अथवा दिल्लीचा शेवटला राजा होता असें अत्थकथांमध्यें दिले आहे. जातिविकांतील माहिती अशी आहे कीं, तो न्हावी आणि शूद्र स्त्री किंवा न्हावी आणि दासी ह्यापासून झाला असावा. शब्दकल्पद्रुमांत तो उच्च कुलांतील नव्हता असें म्हटलें आहे. बौद्ध दंतकथेंत मौर्य हे पिप्पलवणचे (फाहिआन, २४) राजे होते असें आहे. जैनांच्या कल्पसूत्रांत त्यांचें काश्यप गोत्रांतील स्थविर मौर्यपुत्र असें वर्णन केलें आहे.