प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.

हिंदुस्थानांतील भांडवल.- हिंदुस्थानांतील भांडवर आतां पूर्वींप्रमाणें लपून न राहतां नवीन नवीन धंद्यांत गुंतूं लागलें आहे. भांडवलवाल्यांमध्यें परस्परांशीं सहकार्य करण्याची व मोठमोठे धंदे उभारण्याची प्रवृत्ति दिसूं लागली आहे, नवीन नवीन खाणीचें काम करणार्‍या कंपन्या, बँका, विमा उतरणार्‍या वगैरे कंपन्या स्थापन होत आहेत. यांपैकीं कांहीं कंपन्यांची स्थिति आशाजनक नाहीं ही गोष्टी खरी आहे. परवां निघालेल्या बँकांच्या दिवाळ्यांवरून कांहीं बँका सट्टेबाज व लबाड लोकांनीं चालविल्या होत्या ही गोष्ट दिसून येते. कदाचित् कांहीं नवीन विमाकंपन्याहि बुडाल्याचें आपणांस ऐकूं येईल. परंतु अशा तर्‍हेची कोणतीहि नवीन गोष्ट सुरूं होण्याच्या वेळीं कांहीं चांगल्या लोकांबरोबर कांहीं धूर्त लोकांनीं आपला तळीराम गार करून घ्यावा हें साहजिकच आहे. हिंदुस्थानांतील भांडवल दडून बसतें अशाबद्दल फारच ओरड करण्यांत येते. यासंबंधांत हें कबूल केलें पाहिजे कीं, हिंदुस्थानांतील धनिक वर्गानें नवीन कारखान्यांमध्यें आपला पैसा एकदम गुंतविला नाहीं ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांनां तसें कचरण्यास कांहीं सबळ कारणें होतीं हें विसरतां कामा नये. रेल्वेसंबंधींच्या चुकीच्या धोरणाचाहि हिंदुस्थानांतील उद्योगधंद्यांच्या प्रगतीवर बराच विघातक परिणाम झाला आहे. जर प्रथमतः हिंदुस्थानांतील शहाराशहारांच्या दरम्यान रेल्वे बांधली असती तर या शहरांचा एकमेकांत व्यापार वाढून त्यांच्या गरजांनुरूप उत्पादनक्षेत्रें निश्चित झालीं असतीं, लहान लहान धंदे करणारे मोठ्या प्रमाणावर धंदा करूं लागले असते, आणि हातांनीं काम करणार्‍या वर्गांतूनच कारखानदार वर्ग निघाला असता. परंतु हिंदुस्थानचे निरनिराळे प्रांत एकमेकांस जोडण्यापूर्वीं ते परभारें परकीय देशांशीं जोडले गेले. याप्रमाणें हिंदुस्थान आम्हांकरिता मोकळा केला न जातां परकीयांकरितांच मोकळा केला गेल्यामुळें येथील उत्पादक धंदे पार बुडाले. सामान्यतः कारखानदारांचा वर्ग धंदा करणार्‍या लोकांमधून उत्पन्न झाला पाहिजे. परंतु हिंदुस्थानामध्यें या साहजिक प्रवृत्तिची वाढ होऊं न दिल्यामुळें असा वर्ग जो उत्पन्न व्हावयाचा तो व्यापार, शेतकी किंवा उच्च धंदे करणार्‍या अथवा सावकारी करून जबर व्याजानें पैसे मिळविणार्‍या धनिक लोकांमधूनच निघत आहे. हे सर्व वर्ग कोणताहि कारखाना चालविण्याच्या कामीं केव्हांहि पूर्णपणें वाकबगार नसतात. असल्या भांडवलवाल्यांनां कारखाने चालविण्याकरितां जबर पगार देऊन यूरोपमधून व्यवस्थापक आणावे लागतात व सर्वस्वीं त्यांच्यावर अवलंबून रहावें लागतें. अशा तर्‍हेचा कारखाना चालवावयाचा झाल्यास तो फारच मोठ्या प्रमाणावर उभारावा लागतो. अशा तर्‍हेचे मोठामोठाले कारखाने आपल्या देशांत थोडेफार आहेत. आपणांमध्यें वाण आहे ती लहान लहान कारखान्यांची आहे. असल्या कारखान्यांची संख्या फारच थोडी आहे व जे थोडे लहान कारखाने आहेत ते फारच अल्प प्रमाणावर असून यांत्रिक शक्तीचा उपयोग त्यांत करीत नाहींत.

हिंदुस्थानांतील रोकडीचें मोठ्या प्रमाणावर एकीकरण होणें व मोठ्या एकत्र झालेल्या रकमांनीं मोठमोठे व्यवहार होणें या गोष्टी आतां झाल्या पाहिजेत. मुंबई, मद्रास व बंगाल या तीन बँकांचें एकीकरण होऊन आतां इंपीरियल बँक स्थापन झाली आहे. या मोठ्या पेढीच्या ताब्यांत हिंदुस्थानच सरकारची रोकड रहाणार आणि या संस्थेच्या पेढ्या सर्व राष्ट्रभर पसरणार. आतां प्रश्न एवढाच कीं, या मोठ्या बँकांकडून यूरोपियन व्यापार्‍यांस जसें उत्तेजन मिळतें तसें हिंदू व्यापार्‍यांस मिळेल कीं नाहीं? या बँका आपल्या रकमांचा उपयोग व्यापार्‍यांस करूं देतांना बराच पंक्तिप्रपंच करतात अशी ओरड चोहोंकडे ऐकूं येते. पुष्कळ नवीन बँका याच कारणामुळें निघाल्या आहेत. यूरोपियन कंत्राटदारांनां रकमा सहज मिळतात व हिंदुस्थानी कंत्राटदारांस मिळत नाहींत असेंहि ऐकण्यांत येतें. याचें कारण केवळ हिंदुस्थानी लोकांस दिलेल्या पैशाला अधिक धोका आहे हें आहे कीं केवळ पंक्तिप्रपंच आहे याचें पृथक्करण करणें कठिण आहे. ओळख असणें, विश्वास वाटणें या गोष्टींची जातिविषयक प्रश्नाशीं बरीच गुंतागुंत झालेली असते. ज्याशीं अधिक परिचय त्याविषयीं विश्वास अधिक वाटतो आणि ज्याचा त्याचा परिचय स्वजातींतच असतो. या व अशासारख्या कारणांमुळें जोंपर्यंत पैशावर सत्ता यूरोपियन अधिकार्‍यांची राहील तोंपर्यंत त्यांजकडून हिंदूंस कमी मदत आणि पाश्चात्त्यास अधिक मदत असें-अंतःकरण कितीहि शुद्ध ठेवलें तरी-व्हावयाचेंच. यासाठीं बँकांतील चालक मंडळींत आपला हात अधिकाधिक शिरेल असें लोकांनीं केलें पाहिजे.