प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.
जमिनीचें वैभव म्हणजे लोकांचें वैभव नव्हें.- आतां आपण उत्पदनांतील निरनिराळ्या बाबींकडे वळूं. उत्पादनासाठीं देशांतील निरनिराळ्या भौतिक संपत्तीचा आपणांस उपयोग करून घ्यावायचा आहे. हा उपयोग करण्याचें काम भारतीय लोकांनीं केलें पाहिजे व सरकारनें त्यांस मदत केली पाहिजे. हिंदुस्थानची सुबत्ता म्हणजे या देशांत राहणार्या परकीय लोकांची श्रीमंती नव्हे तर देशांतील लोकांचीच श्रीमंती होय. ती वाढली पाहिजे. केवळ हिंदुस्थानाची वृद्धि आपणांस नको आहे. केवळ देशाचें म्हणजे जमिनीचें वैभव वाढविणें म्हणजे देशाभिमान अशी जो देशाभिमानाची व्याख्या करील त्याला देशांतील लोकांस मारून टाकून तो जोरदार लोकांनीं वसवावा असा पक्ष घ्यावयासहि हरकत नाहीं. अर्थात् आपणांस केवळ जमिनीचा अभिमान नको आहे. हिंदुस्थानच्या व्यापारासंबंधींचे आंकडे पाहिले असतां असें दिसून येईल कीं, हिंदुस्थानचा व्यापार झपाट्यानें वाढत आहे, पण त्यावरून हिंदू लोक श्रीमंत होत आहेत असें मात्र सिद्ध होत नाहीं. आपणांला हिंदुस्थानच्या द्रव्योत्पादक भौतिक शक्ती शिस्तवार उपयोगिल्या जात आहेत किंवा नाहींत, अथवा हिंदुस्थानच्या भूमीवर कांहीं श्रींमतीचीं चिन्हें दिसत आहेत किंवा नाहींत याच गोष्टीची केवळ काळची बाळगून चालणार नाहीं. कर वसूल करणारें व तो पैसा भक्षून चैनीनें रहाणारें सरकारच काय तें अशी दृष्टी ठेवील आणि संपादणी करील कीं, देशाची भरभराट होत आहे. आपणांला या देशांतील लोकांनां कांहीं फायदा होत आहे कीं नाहीं याचा प्रामुख्यानें विचार केला पाहिजे. भौतिक शक्तींचा उपयोग करून घेतला पाहिजे ही गोष्ट आम्हांस कबूल आहे, पण तें काम आमच्या देशी लोकांनीं केलें पाहिजे. हें काम देशांत शिक्षण व ज्ञान यांची वाढ झाल्याशिवाय नीटपणें होणार नाहीं व देशी भाषांची जोपासना करण्याचा जोंपर्यंत प्रयत्न झाला नाहीं तोंपर्यंत शिक्षण आणि ज्ञान यांची वाढ चांगलीशी कशी होणार?