प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.

उच्च देशी राहणीची आवश्यकता.- आतां आपण अर्थशास्त्रांतील व्यय आणि उत्पादन या दोन महत्त्वाच्या गोष्टींच्या भवितव्याकडे वळूं. हिंदुस्थानामध्यें निरनिराळ्या मालाचा खप यापुढें कोणत्या प्रमाणावर वाढत जाईल हें आपणांस पहावयाचें आहे. सध्यां हिंदुस्थानांतील लोकांच्या गरजा कमी, व त्यामुळें समाजामध्यें मालाच्या खपाचें प्रमाण फारच अल्प आहे. यावरून येथील संस्कृति विकास पावली नाहीं असें म्हणावें लागतें. ज्या मनुष्याच्या गरचा कमी तो काम करण्यासहि कमीच उत्सुक असतो. गरचा कमी असल्यामुळें एकंदर कामहि प्रमाणावर असतें. ज्याला तुलनात्मक अर्थशास्त्राचा अभ्यास करावयाचा आहे त्याला मनुष्यांच्या गरचा व देशांत होणार्‍या एकंदर मालाचा खप या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हिंदुस्थानांतील लोकांच्या गरजा यूरोपीय लोकांच्या गरजांपेक्षां कमी असण्याचें एक कारण या देशांतील उष्ण हवा होय. तथापि हिंदुस्थानांतील हवेच्या उष्णमानाखेरीज दुसरीं अनेक कारणें या देशांतील मनुष्यांच्या गरजा वाढविण्याच्या कामीं प्रतिबंधक होत असलेलीं दिसून येतात. बंगालसारख्या प्रांतांत केवळ देश्य लोकांचा असा उच्च प्रकारचा आयुष्टक्रमच नाहीं. हिंदु लोकांची अशी जी उच्च प्रकारची राहणी होती ती बर्‍याच वर्षांपूर्वीं नष्ट झाली आणि त्यानंतर महंमदी तर्‍हेची जी उच्च राहणी म्हणून कांहीं दिवस प्रचारांत होती तीहि हळू हळू दिसेनाशी झाली. कलकत्ता शहराची सध्यांची संस्कृति आपणांस हिंदूंच्या पूर्वींच्या ग्रामसंस्कृतीचें व इंग्रजांच्या नगरसंस्कृतीचें मिश्रण होऊन बनलेली दिसते. येथील म्हणजे देश्य लोकांची म्हणतां येईल अशी उच्च प्रकारची राहणी तेथें आढळत नाहीं. यामुळें एखाद्या मनुष्यानें जरा छानछोकीनें रहावयाचें म्हटल्यास त्याला इंग्रजांचें अनुकरण करावें लागतें. इंग्रजांच्या राहणीचें त्यांच्या अभिरुचीस अनुसरून अनुकरण करणें फार कठिण आहे, कारण त्यांची राहणी सर्वस्वीं विदेशीय आहे. कांहीं इंग्लंडांत जाऊन आलेले थोडेसे हिंदू जरी हें इंग्राजांचें अनुकरण करूं शकले तरी त्यांनां ती राहणी सार्वत्रिक करणें अशक्य आहे. केव्हां केव्हां तर आपणांस या अनुकरप्रवृत्तीमुळें फारच हास्यकारक परिणाम झालेले दिसून येतात. कारण अनुकरण हें केव्हांहि बिनचूक होत नाहीं. त्यामुळें अनेक प्रसंगीं असें अनुकरण करणारा मनुष्य विदेशीयांच्या व स्वदेशीयांच्या हास्यास मात्र पात्र होतो. आपल्या देशी मेमसाब ही चीज खरोखरच यूरोपीय लोकांस फार अजब वाटत असली पाहिजे. कलकत्त्यामध्यें एक ख्रिस्ती डाक्टरीणबाई आमच्या अवलोकनांत आली. तिच्या पोषाखाकडे पाहून अमेरिकेंतली संयुक्त संस्थानांपैकीं दक्षिणेकडील संस्थानांतील नीग्रो स्वयंपाकीण व धोबीण यांची आठवण  झाली. फरक एवढाच कीं, नीग्रो स्वयंपाकिणीचा पोषाख या डाक्टरणीपेक्षां जास्त नीटनेटका असतो.

अशा रीतीनें केवळ देश्य अशा उच्च राहणीच्या अभावाचा परिणाम असा होतो कीं, कांहीं कालपर्यंत समाजाची प्रगति बंद होते; एवढेंच नव्हे तर, पूर्वींच्या ज्या उच्च राहणीबद्दलच्या कल्पना असतात त्या देखील दूषित होऊं लागतात. परकीयांचें अनुकरण हास्यापद होत असलें तरी जित लोकांस त्यापासून कांहीं तरी फायदा होतो. एखादा मनुष्य जर कोट, पाटलोण, हॅट अशा तर्‍हेचा पोषाख करील तर तो जरी युरोपियन समजाला जाणार नाहीं तरी निदान हाफकास्ट समजला जाईल आणि रेल्वे वगैरे ठिकाणीं अडाणी लोकांचें वर्तन प्रतिष्ठित हिंदु मनुष्यापेक्षां हाफकास्टशीं जास्त अदबीचें व नम्रतेचें असतें. हिंदु संस्थानिक महाराजापेक्षां त्याच्या यूरोपीय स्वयंपाक्याला अथवा मोटारहांक्याला जास्त आदरानें वागविल्याचीं व त्याचवेळीं प्रत्यक्ष महाराजाकडे दुर्लक्ष केल्याची उदाहरणेंहि घडलेलीं आहेत. आतां महाराजे शहाणपणानें या गोष्टींचा फारसा बोभाटा करीत नाहींत हें निराळें. जोंपर्यंत परकीय तर्‍हेच्या पोषाखापासून प्रत्यक्ष फायदे दिसत आहेत तोंपर्यंत देशी पोषाखाकडे दुर्लक्ष होणारच व त्याचें स्वरूपहि थोडेंफार पालटणारच.

जरी या ठिकाणीं वरील गोष्टींनां कोणते उपाय योजले पाहिजेत याचें सविस्तर विवेचन करण्यास सवड नाहीं तरी कांहीं गोष्टी येथें सांगणें अवश्य आहे. वरील प्रकारची स्थिति येथें उत्पन्न होण्याचें मुख्य कारण म्हणजे येथें इंग्रजांच्या सत्तेचें धोरण आजपर्यंत इंग्रज जातीचें वर्चस्व हिंदुस्थानांत कायम ठेवून हिंदुस्थानचें राज्य केवळ लष्करी सामर्थ्यावर चालवावयाचें असें जें होतें त्याचा राजनीतीवर आणि सामाजिक आयुष्यक्रमावर परिणाम होत होता, हें होय. वरील धोरणामुळें ब्रिटिश जनतेमध्यें इंग्रजी राहणीला विशेष चिकटून राहण्याची वृत्ति उत्पन्न झाली. कांहीं अँग्लोइंडियनांची अशी कल्पना होती कीं येथें ब्रिटिश संस्कृतीचा प्रसार करून सर्व हिंदु संस्कृतीचें स्वरूप पालटून टाकून तिला ब्रिटिश संस्कृतीचें वळण द्यावें. परंतु या सर्व कल्पना आतां नष्ट होत चालल्या आहेत. आणि हिंदुस्थानची प्रगति हिंदी मनोवृत्तीच्या धोरणानेंच घडवून आणण्याची इच्छा उत्पन्न होत आहे.