प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.

या बाबतींत लोकांचें व सराकरचें कर्तव्य.- परकीय सांस्कृतिक वर्चस्वाचे दोष काढून टाकण्यास एक उपाय म्हटला म्हणजे त्यांचें मूळ काढून टाकणें हा होय. ज्या गोष्टी उच्च वर्गांत होतात त्याच खालच्या वर्गांतहि घडून येतात असा नियम सर्व समाजांमध्यें दिसून येतो. तेव्हां ज्यांनां सुधारणा घडवून आणावयाची असेल त्यांनीं उच्च वर्गांत म्हणजे सामाजिक परंपरेमध्यें ज्यांनां श्रेष्ठ स्थान आहे अशा लोकांत सुधारणा केली पाहिजे. हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांतील लोक दिल्लीस जाऊन तेथें उच्च व सर्वमान्य राहणीचा असा एखादा शिष्ट वर्ग तयार होईल असा काल अद्याप यावयाचा आहे. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सभेला सर्वसामान्य आचार विचारपरंपरा प्रसृत करणें हें आपलें एक कर्तव्य आहे अशी जाणीव अद्यापि झालेली नाहीं. राष्ट्रीयसभा ही थोड्या कालापूर्वींपर्यंत केवळ ह्यूम साहेबाच्या उपासकवर्गानें भरलेली होती. हे लोक कांहीं स्वंतत्र विचार करून देशाची सुधारणा करण्याचे नवीन मार्ग शोधून काढतील हें शक्य नव्हतें. ते फक्त पूर्वीं होऊन गेलेल्या (त्यांच्या दृष्टीनें) महात्म्यांच्या पावलांवर पावलें टाकून जात होते. पुढें कांहीं नवीन दमाचे लोक काँग्रेसमध्यें शिरूं लागले त्या वेळीं तींत दुफळी झाली. या दुफळीमुळें १९१३ च्या काँग्रेसला इतकी थोडी मंडळी आली होती कीं त्या वेळीं काँग्रेस पुढें चालेल किंवा नाहीं अशी शंका वाटूं लागली होती. सध्यां राष्ट्रीयसभेस मोठ्या प्रमाणावर लोकशिक्षणाची चळवण करणार्‍या संस्थेचें स्वरूप येतें कीं नाहीं हा प्रश्न एकदोन वर्षांत सुटेलसें दिसतें. तरी पण सर्व राष्ट्राला सामान्य अशी एक संस्कृति उत्पन्न करण्याचें काम केवळ लोकांच्या सहकार्याच्या भावनेवर विसंबून चालावयाचें नाहीं असें वाटतें. हें कार्य घडवून आणण्याचें काम करावयास आपण सरकारचाहि उपयोग केला पाहिजे, किंवा सरकार हें यंत्र लावलें पाहिजे.

देशांत उच्च प्रकारची देश्य रहाणी उत्पन्न करणें हें काम सरकारला करतां येणें शक्य आहे काय? असा प्रश्न विचारल्यास सरकारला हें काम करणें शक्य आहे असें उत्तर आपणांस देतां येईल.

या देशांत येणार्‍या यूरोपीय अधिकार्‍यांनीं लोकांशीं ज्या ज्या प्रसंगीं संबंध येईल त्या त्या प्रसंगीं हिंदी तर्‍हेचा पोषाख वापरावा अशी सरकारनें त्यांस शिफारस करावी. व्हॉइसराय, गव्हर्नर, वगैरे मुख्य अधिकार्‍यांनीं हिंदी तर्‍हेचा पोषाख वापरला पाहिजे. त्यांनीं अशा तर्‍हेचा पोषाख वापरावा असें त्यांस सांगण्याचा हिंदी जनतेचा अधिकार आहे. राज्यकर्ते परकीय जातीचे आहेत या गोष्टीस इलाज नाहीं, परंतु सरकारी अधिकार्‍यांनीं शक्य तितकें कमी परकीय दिसलें पाहिजे. त्यांनीं आपण इंग्रज आहों ही गोष्ट विसरली पाहिजे आणि आपण हिंदी आहों-आंग्लहिंदी सुद्धां नव्हे-अशी भावना ठेवण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. सरकारी अधिकारी जेव्हां आपापल्या घरीं असतील तेव्हां त्यांनीं आपल्या सरावाचा पोषाख वापरूं नये असें आमचें म्हणणें नाहीं. त्यांनीं लोकांमध्यें येतांना तरी निदान हिंदी पोषाख वापरावा. इंग्रज लोकांची-पुरुष व स्त्रिया दोघांचीहि पोषाखाच्या बाबतींतील अभिरुचि सामान्यतः चांगली असते आणि त्यांनीं जर हिंदी पोषाख करावयाचें मनांत आणलें तर ते चांगला पोषाख करतील यांत शंका नाहीं. इंग्रज लोकांनां हिंदी पोषाख आवडत नाहीं या गोष्टीवर आमचा बिलकुल विश्वास नाहीं. साडी नेसणें ज्यांनां खरोखर मनापासून आवडतें अशा कितीतरी इंग्रज स्त्रिया आढळून येतात. इंग्रज स्त्रियांनीं हिंदी पोषाख वापरला तर त्यांच्या पोषाखाविषयींच्या सभ्यतेच्या कल्पनांस धक्का पोहोंचेल असें आम्हांस वाटत नाहीं.

सरकारी अधिकार्‍यांनीं अमुकच एका विशिष्ट जातीचा पोषाख करावा असें आमचें म्हणणें नाहीं. ह्या बाबतींत त्यांनीं आपल्या आवडीप्रमाणें पोषाख पसंत करावा. व्हॉइसरायनीं निदान हिंदी लोकांत मिसळतांनां कोणत्यातरी पद्धतीचें हिंदी पागोटें घातलें पाहिजे. व्हॉइसरायच्या या कृत्यामुळें कोणत्याहि जातीस कमीपणा येतो असा अर्थ मुळींच होऊं शकत नाहीं. असा पोषाख करणें म्हणजे उलट इंग्रजांची जी उदारमतवादाची परंपरा आहे तिला अनुसरण्यासारखें आहे. आमचे बादशहा जेव्हां रशियामध्यें जातात तेव्हां ते एखाद्या कोसॅकसारखा पोषाख करितात. आपले बादशहा जेव्हां गेल्या संस्मरणीय दिल्ली दरबारला आले होते त्या वेळीं त्यांचा पंजाबी शीख सैनिकाच्या वेषांत घेतलेला फोटो हिंदुस्थानांत आपणांस सर्वत्र आढळतो. परस्परांच्या चालीरीती व पोषाख यांबद्दल आदर दाखविणें हें खरें विश्वबंधुत्व होय. आपण ज्याप्रमाणें इंग्लडांत गेलों म्हणजे त्यांच्यासारखा पोषाख वगैरे करतो, त्याप्रमाणें इंग्रजांनीं या देशांत आल्याबरोबर आपणांसारखें झालें पाहिजे.