प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.

मनुष्याची उत्पादनशक्ति कशी वाढेल?-  मनुष्याची देशाच्या संपत्तीमध्यें भर टाकण्याची शक्ति त्याला संपत्ति मिळविण्याच्या कामांत आपल्या आयुष्याची किती वर्षें घालवितां येतील या गोष्टीवर, तसेंच त्याच्या कर्तृत्वशक्तीवर आणि भोंवतालच्या परिस्थितीमध्यें त्याच्या कर्तबगारीला किती वांव सांपडेल यावर अवलंबून असते.

मृत्युसंख्येचें प्रमाण कमी होत जाणें अथवा आयुर्मानाची वाढ होत जाणें या गोष्टीचा समजाच्या सांपत्तिक स्थितीवर बराच महत्त्वाचा परिणाम होतो. कारण अशी वाढ झाली म्हणजे मनुष्याला आपल्या आयुष्यामध्यें जास्त उत्पादन करतां येतें व त्यायोगें समाजाच्या प्रत्येक घटकापासून समाजाला अधिक लाभ होतो.

आपल्या समाजांत अल्पवयांतील मृत्यूंचें प्रंमाण कमी करण्याची कांहींच खटपट झालेली नाहीं. सरकरा या गोष्टीला कांहीं उपाय शोधून काढीत आहे. परंतु या गोष्टीच्या मुळाशीं हात घालून प्रतिबंधक उपाय योजण्याची सरकारकडून कांहींच तजवीज होत नाहीं. औषधोपचार वगैरे पुरविण्याची तजवीज सरकार करतें, परंतु आरोग्यनाशाचीं कारणें समूळ नाहींशीं करण्याचा प्रयत्‍न तें करीत नाहीं. मद्यपान वगैरेसंबंधींचें सरकारी धोरण फारच सदोष आहे. सरकारनें लोकांनां दारू पिण्याचा हक्क पूर्णपणें दिला आहे. परंतु दारूपासून होणार्‍या अनिष्ट परिणामांचें ज्ञान लोकांस सरकारनें करून दिलेलें नाहीं. लोकांनां हें स्वातंत्र्य मिळालें नसतें तर फार मेहरबानी झाली असती. आपणांस सुधारलेलें म्हणवून घेण्यासाठीं दारूबाजीचें पुरस्कर्तृत्व सराकरनें करणें अवश्य नाहीं. दारू न प्याल्यानें रानटीपणा खास पदरीं येत नाहीं. दारूपासून होणारें उत्पन्न मोठें असतें ही गोष्ट खरी. परंतु उत्पन्नाच्या दृष्टीनेंहि विचार केला असतां मद्यविक्रय कमी करणें हेंच एकंदरीनें अधिक फायदेशीर आहे असें दिसून येईल. मद्यविक्रयास बंदी केली असतां लोकांची आयुर्मर्यादा वाढेल आणि त्यांस इतर बाबतींत अधिक खर्च करावयास सवड मिळेल. व अशा तर्‍हेनें निरनिराळ्या गोष्टींत खर्च करावयास सांपडल्यामुळें लोकांचा जीवितक्रम सुधारेल.

रोगांचा प्रतिकार करणें अथवा लोकांची आयुर्मर्यादा वाढविणें या गोष्टी सरकारला एकट्यालाच पूर्णपणें करतां येणें अशक्य आहे. यासाठीं लोकांमध्यें स्वच्छतेच्या कल्पना वाढल्या पाहिजेत. त्यांस आपली राहणी सुधारण्याचें शिक्षण मिळालें पाहिजे. येथील देश्य राहणीमध्यें सुधारणा करून तिचा एक उच्च प्रकारचा नमुना लोकांसमोर ठेवला गेला पाहिजे असें जें आम्ही म्हणतों त्याला हेंहि एक कारण आहे कीं, असा देशी नमुना समोर असल्याखेरीज सामान्य लोकांची राहणी सुधारणार नाहीं. जोंपर्यंत आरोग्यासंबंधीं व स्वच्छतेसंबंधीं घ्यावयाची खबरदारी फक्त यूरोपीय राहणीशींच संबद्ध असेल तोंपर्यंत हिंदू लोकांची राहणी सुधारावयाची तर नाहींच पण अधिक बिघडत मात्र जाईल. हें विधान प्रथमदर्शनीं जरा चमत्कारिक दिसतें, म्हणून त्याचें थोडें स्पष्टीकरण केलें पाहिजें. केवळ आरोग्यशास्त्रीय कल्पनांच्या प्रसारामुळेंच स्वच्छ राहणीची संवय लागते असें नव्हें. अमुक गोष्ट शुद्ध अथवा अशुद्ध आहे हें आपण पृथक्करण करून न ठरवितां सामान्यतः केवळ दृष्टीनें ठरवितों. जें दृष्टीला नीटनेटकें व सुंदर दिसेल तें शुद्ध आहे असें आपण ठरवितों. कांहीं गोष्टींमध्यें ही आपली समजूत चुकीची ठरेल, परंतु एकंदरींत जें दृष्टीला स्वच्छ दिसेल तेंच करण्याची काळजी घेणें श्रेयस्कर असतें. पुष्कळ स्त्रिया त्यांनां जर एखादी गोष्ट आरोग्यास अपायकारक आहे म्हणून करूं नका असें सांगितलें तर ऐकणार नाहींत. परंतु ती गोष्ट केल्यानें त्यांचें सौंदर्य कमी होईल, असें जर त्यांस सांगितलें तर त्याचा परिणाम त्यांच्या मनावर मुळींच होणार नाहीं असें नाहीं. आपलें सौंदर्य कायम ठेवण्याची इच्छा कोणत्याहि स्त्रीस सामान्यतः स्वच्छ राहणी ठेवण्यास प्रवृत्त करते. त्याप्रमाणेंच घराला एक तर्‍हेची शोभा असावी ही इच्छा तें आरोग्यकारक ठेवण्याची प्रवृत्ति उत्पन्न करते. लोकांनीं अनुकरण करण्याला लायक अशी चांगली राहणी त्यांच्या डोळ्यापुढें असावी लागते. कोणत्याहि राहणीचें अनुकरण करण्याची इच्छा सामान्य लोकांमध्यें उत्पन्न होण्याकरीतां ती राहणी त्यांच्या राहणींतच सुधारणा होऊन निघालेली असली पाहिजे. जर अशा तर्‍हेची सामान्य राहणींतूनच उत्पन्न झालेली उच्च प्रकारची राहणी तयार होईल आणि तिला स्वच्छता व आरोग्य यांच्या कल्पनांची जोड मिळेल तर लोकांनां ती आपल्यापुढें उदाहरणादाखल ठेवून आपली राहणी सुधारण्याची प्रवृत्ति होईल.

कामकरी वर्गाची आर्थिक दृष्ट्या किंमत वाढविणारी आणखी एक गोष्ट म्हटली म्हणजे कामकर्‍याची वैयक्तिक कार्यक्षमता ही होय. या कार्यक्षमतेमध्यें मुख्यतः चार गोष्टी अंतर्भूत होतात.

(१) कसब.
(२) परिश्रम करण्याची शक्ति.
(३) परिस्थितीचें ज्ञान करून घेण्याची पात्रता.
(४) परिस्थित्यनुरूप काम करण्याची तयारी.

यांपैकीं स्वतःचें कौशल्य अथवा परिश्रम करण्याची ताकद वाढविणें या गोष्टी व्यक्तिशः कामकर्‍यावर अवलंबून असतात. तसेंच आपल्या सभोंवतींच्या परिस्थितीचें ज्ञान करून घेणें व तदनुरूप आपली तयारी करणें हेंहि प्रत्येक व्यक्तीचें कर्तव्य आहे. त्याला परिस्थितीप्रमाणें आपणा स्वतःमध्यें बदल केला पाहिजे. परिस्थित्यनुरूप वर्तन ठेवण्याचें सामर्थ्य असल्यानें विवक्षित लोकांस आपलें अस्तित्व कायम राखतां येतें. परंतु ही परिस्थितीप्रमाणें आपणांत बदल करण्याची शक्ति मनुष्याच्या अंगांत कांहीं मर्यादेपर्यंतच असूं शकते. या बाबतींत आपणांला एक नियम घालतां येईल तो असाः ज्या वेळीं अशा एक तर्‍हेची परिस्थिति उत्पन्न होते कीं, व्यक्तीस त्या परिस्थितींत आपलें हित साधण्यासाठीं आपल्या राहणींत मूलतः बदल करणें जरूर होतें, त्या वेळीं, स्वतःमध्यें असा मूलतः बदल करणें व्यक्तीस अशक्य असल्यानें, ती परिस्थिति तशीच कायम ठेवणें अगर न ठेवणें हें समाजाच्या इच्छेवर अवलंबून असल्यास तिच्यांत बदल करण्याचा समाजानें प्रयत्‍न केला पाहिजे. वर येथील देश्य संस्कृतींत सुधारणा करण्यासंबंधीं आणि परकीय भाषा, पोषाख वगैरेंचें महत्त्व कमी करण्यासंबंधीं जें विवेचन केलें आहे तें, प्रस्तुत नवीन परिस्थिति कायम ठेवावी किंवा नाहीं हें आपल्याच इच्छेवर अवलंबून आहे व या आमच्या समाजामध्यें नवीन परिस्थितीनुसार सर्वांगीण क्रांति करणें शक्य नाहीं या दोन गोष्टी स्पष्ट असल्यामुळेंच केलें आहे.