प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.

हिंदुस्थानचा कारागीर.- आतां आपण हस्तकौशल्याचे धंदे घेऊं. हिंदुस्थानामध्यें मोठमोठीं शहरें वगळलीं तर चांगले कारागील मिळण्याची फार मुष्कील पडते. हिंदुस्थानांतील कारागिरांमध्यें अद्यापि सौंदर्य आणि डौलदारपणा यासंबंधींच्या कल्पना नीटशा रुजलेल्या नाहींत. लहान लहान गांवांतील कारागिरांनां त्यांच्या कलेचें अथवा त्या कलेंतील तत्त्वांचें शिक्षण फारच दुर्मिळ असतें. डॉक्टर कुमारस्वामी आणि मिस्टर हॅवेल् यांनीं हिंदुस्थानी कला व कारागीर ह्यांविषयीं आपल्या एतद्विषयक ग्रंथांत बराच ऊहापोह केला आहे. त्यांनीं केलेल्या विधानांत बरेंचसें सत्य आहे, तथापि त्यांनां देखील कबूल करावें लागेल कीं, हिंदी अथवा यूरोपीय कोणत्याहि कलेमध्यें प्रावीण्य संपादन केलेले कारागीर आपणांला येथें फारसे आढळत नाहींत; आणि सामान्य कारागिरांची कामें ओबडधोबड आणि गचाळ अशींच दिसतात. प्राचीन हिंदी कलेची जी कांहीं थोडीफार परंपरा शिल्लक आहे ती अगदींच अल्प असून मोठमोठ्या शहरतां अथवा बरींच देवळें असलेल्या गांवांतच ती आढळून येते. इंग्रज किंवा अमेरिकन लांकुडकाम करणारा कारागीर हिंदी कारागिरापेक्षां पुष्कळच कुशल असतो. हिंदुस्थानांतील पुस्तकें बांधणारास पुस्तक सुंदर दिसेल अशा रीतीनें कसें बांधावें ही गोष्ट त्याच्या पाश्चात्त्य व्यवसायबंधूइतकी माहीत नसते. हा फरक होण्यास अनेक कारणें आहेत. सामान्य लोकांकडून अधिकाधिक चांगल्या वस्तूंकरितां जशी मागणी यावयास पाहिजे तशी येत नाहीं. जनतेमध्यें सुंदर वस्तूंबद्दल फारशी हौस दिसून येत नाहीं यामुळें अशा वस्तूंच्या उत्पदनास उत्तेजन मिळत नाहीं. याखेरीज आमच्या देशी भाषांची गळेचेपी वगैरे कारणें आहेतच. असो.