प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.
हिंदुस्थानचा मजूर.- भांडवलाची चर्चा सोडून आतां मजुरांकडे वळूं. हिंदुस्थानांतील मजूर फारच अडाणी असतात. घरकाम करणार्या इंग्रज आणि हिंदू नोकरांमध्येंहि आपणांस अनेक वेळां किती तरी अंतर दिसून येतें. हिंदुस्थानांतील मजुरी स्वस्त असूनहि तिचा मजुरांच्या अडणीपणामुळें आपणांस पुष्कळ प्रसंगीं कांहीं उपयोग होत नाहीं. शिक्षणाची वाढ झाली म्हणजे आपल्या मजूरवर्गाची सुधारणा होईल अशी आशा आहे. मजुराला लिहितां वाचतां येत असलें म्हणजे बराच फायदा होतो. परंतु याहिपेक्षां त्याला चांगल्या शिस्तवार मनुष्याकडून जें शिक्षण मिळतें त्याचा उपयोग अनेक पटींनीं अधिक आहे.
आमच्यामध्यें आमच्या अडाणी लोकांची निरक्षरता घालविण्याची इच्छा वाढत आहे. आपापल्या जातिबांधवांमध्यें शिक्षणाचा प्रसार करण्याची तजवीज पुष्कळ जातींतून होत आहे. नामदार गोखल्यांनीं कौन्सिलामध्यें या बाबतींत पुष्कळ खटपट करून स्थानिक संस्थांस आपल्या हद्दींतील निरक्षरता घालविण्याची परवानगी मिळवून दिली. याप्रमाणें मजूरवर्गाला लिहिणें वाचणें शिकविण्यासंबंधानें थोडीशी व्यवस्था झालेली आहे. परंतु या मजुरवर्गास शिस्त लावण्याच्या बाबतींत आपणांस अजूनहि परकियांवरच अवलंबून राहिलें पाहिजे.