प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.

हिंदुस्थानचा शेतकरी.- आतां आपण हिंदु समाजाच्या आर्थिक अंगांपैकीं औद्योगिक अंग सोडून त्याच्या जीवनास अत्यंत महत्त्वाचें अंग जें शेतकी त्याकडे वळूं. सरकारनें शेतकर्‍यांकरितां करावयाच्या गोष्टींपैकीं पुष्कळच गोष्टी अद्याप केलेल्या नाहींत. सरकारास आपल्या कर्तव्याची जाणीव होऊं लागली आहे असे उद्गार ऐकूं येतात, परंतु त्या उद्गारांनुरूप कृति मात्र दिसत नाहीं. आपणांस येथें हें नमूद करून ठेवलें पाहिजे कीं, हिंदी शेतकर्‍यांवर जो उत्कट पुराणप्रियत्वाचा आरोप करण्यांत येतो तो वास्तविक खरा नाहीं. आपणांस खेड्यांतून हिंदी शेतकर्‍यांजवळ पेंढ्या बांधण्याचें यंत्र अथवा वाफेनें चालणारा नागंर किंवा मळणी करण्याचें अवजड यंत्र दृष्टीस पडत नाहीं एवढ्यावरून हिंदी शेतकरी वर्ग पुराणप्रिय आहे असें आपणांस म्हणतां यावयाचें नाहीं. एवढेंच म्हणतां येईल कीं, अमेरिकेमधील मिझूरींतील शेतकर्‍याप्रमाणेंच हिंदुस्थानांतील शेतकरी देखील संशयी आहे. त्याला प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे असतें. हिंदी शेतकरी नवीन गोष्टींचा स्वीकार किती खुषीनें करतो याबद्दल थोडीं उदाहरणें दाखविलीं असतां त्याच्या पुराणप्रियत्वाबद्दलचीं सर्व विधानें खोटीं ठरतील. बटाटा, रताळीं, भुइमूग, मका, तंबाखू, मिरच्या इत्यादि पिकें घ्या. हीं सर्व पिकें परकीय असून त्यांचा देशाच्या कोनाकोपर्‍यांतूनहि प्रवेश झाला आहे. वर्‍हाड प्रांतांत वरवर चवकशी केल्यासहि आपणांस असें दिसून येईल कीं इतर पिकांच्या ऐवजीं तागाच्या पिकाची वाढ होत आहे. या गोष्टींवरून हिंदी शेतकरी नव्या उपयुक्त सुधारणा घेण्यास उत्सुक असतो हें दिसून येईल. हिंदुस्थानांतील शेतकरी आणि इंग्लंड अथवा अमेरिका देशांतील लहान शेतकरी यांच्यांत विशेषसा फरक दिसत नाहीं. अमेरिकेंतील शेतकर्‍याला जरी वर्तमानपत्रें वाचतां येत असलीं तरी त्यांचा उपयोग त्याला स्वतःचें उत्पन्न वाढविण्याच्या कामीं मुळींच करून घेतां येत नाहीं. या विधानास अर्थातच व्यापारी वर्गांतून जे लोक शेतकीच्या धंद्यांत शिरले असतील अथवा जे पदवीधर शेतकीमध्येंच आयुष्य घालविण्याच्या इराद्यानें त्या धंद्यांत पडले असतील ते अपवाद आहेत. सुशिक्षित शेतकर्‍यांचा जो एकंदर शेतकरी वर्गावर परिणाम होतो तो फार महत्त्वाचा असतो. अशा तर्‍हेचा परिणाम आपणांस हिंदुस्थानांत दिसत नाहीं. अमेरिकेमध्यें शाळा आणि कॉलेजें उन्हाळ्यांत बंद असतात व तो काळ शेतकर्‍यास फार महत्त्वाचा असतो. शाळा व कॉलेजें हिंवाळ्यांत उघडीं असतात आणि तो काळ शेतकर्‍यांनां मंदीचा असतो. यामुळें जो शेतकर्‍याचा मुलगा शहरामध्यें अथवा युनिव्हर्सिटीमध्यें शाळेचें अथवा कॉलेजचें शिक्षण घेण्यास जातो त्याला आपलें शेतकीपासून होणारें उत्पन्न बुडविण्याचें कारण नसतें; तसेंच त्याला शेतकीचा अनुभव आणि स्वतः हातांनीं परिश्रम करण्याची संधि यांसहि मुकावें लागत नाहीं.