प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.
सरकारनें निमकास जागलें पाहिजे.- साम्राज्यवाद भारतीयांनीं घ्यावा असें जर इंग्रजांनां वाटत असेल तर खुद्द इंग्रजांनीं भारतीयांच्या राष्ट्रधर्माचे आणि राष्ट्रीय भावनांचे पुरस्कर्ते बनलें पाहिजे. ते आमचें निमक खात आहेत. अर्थात् त्यांनीं आमच्या निमकास जागलें पाहिजे. भारतीयांच्या हितसंबंधांची परकीय राष्ट्रांशीं गुंतागुंत होईल त्या वेळेस भारतीयांचा पक्ष इंग्रजांनीं घेतला पाहिजे. पण एवढ्यानेंच इंग्रजांचें कर्तव्य संपावयाचें नाहीं. देशसंस्कृतीच्या संवर्धनाचें पुरस्कर्तृत्वहि त्यांनीं केलें पाहिजे. इकडे देशी भाषांस गळफांस लावावयाचा, देशी वाङ्मयास खच्ची करावयाचें, त्यास पोषक द्रव्यें मुळींच मिळूं द्यावयाचीं नाहींत, अर्थात् देशी भाषा दुर्बल करावयाची आणि इकडे ‘ओरिएंटल रिसर्च’ या नांवानें देशी भाषांतील देशासंबंधाचें ज्ञान इंग्रजी भाषेंत आणून तिला जोरदार करावयाचें व या कृतीबरोबर आम्ही देश्यसंस्कृतीचे उद्धारक असा टेंभा मिरवावयाचा ही कृति अट्टल लुच्च्यांसच फक्त योग्य आहे. देशी भाषांसंबंधीं सध्यां चालूं असलेल्या आपल्या धोरणामुळें सरकारनें आपलें वर्तन अत्यंत संशयास्पद करून घेतलें आहे. झाल्या चुका त्या झाल्या. आतां तरी निदान देशी भाषांच्या जोपासनेकडे सरकारनें लक्ष दिलें पाहिजे.
शास्ते म्हणजे राष्ट्राचे पुढारी होत. माणसें शासनसंस्थेखालीं राहतात आणि शासनसंस्थेच्या अधिकार्यांचें अनुचरत्व पत्करतात तें अशाकरितां कीं समाजाची प्रगती व्हावी आणि या प्रगतीच्या मार्गावर शास्त्यांनीं त्यांस पुढें पुढें न्यावें. ज्यांस आपण सामान्यतः पुढारी म्हणतों ते सर्व राष्ट्राचे पुढारी नसून एखाद्या विशिष्ट मताचे, चळवळीचे, किंवा वर्गाचे पुढारी असतात. परंतु सरकार हें सर्व राष्ट्राचें पुढारी असतें. सरकार राष्ट्राचें पुढारी असण्याचें हें ध्येय सर्व राष्ट्रांत स्वीकृत झालें आहे. हिंदुस्थानसरकार या ध्येयाच्या स्वीकाराच्या दृष्टीनें बरेंच मागसलेलें आहे, हें येथें सांगितलें पाहिजे.