प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ६ वें.
आर्थिक भवितव्य.

वन्यसंस्करण.- समाजापुढील एक मोठें आर्थिक व सामाजिक कार्य वन्यांस नागरिकांसारखें रहावयास शिकविणें हें आहे. प्रत्येक भागांत असे अनेक लोक आहेत कीं, त्यांचा एकंदर समाजाशीं संबंध थोडका येतो. त्यांच्या गरजा अगदीं अल्प आहेत आणि त्यांनां सुधारलेल्या लोकांच्या श्रमविभागांत आज भाग घेतां येत नाहीं. या लोकांमध्यें भिल्ल, गोंड, ठाकूर, कोळी, कोर्कू, निहाल इत्यादि लोकांचा समावेश होतो. या लोकांपैकीं बरेच लोक अजून डोंगरांत रहातात आणि त्यांस आगगाडीसारख्या सुधारणांचा फायदा झाला नाहीं. अशा लोकांचें संस्करण कसें करावें हा प्रश्न समाजापुढें आहे. वन्यांच्या संस्करणाविषयीं समाजांत कोणींच विचार केला नाहीं असें मात्र नव्हे. प्रत्येक वन्य जातींत जाऊन त्या लोकांस ख्रिस्ती संप्रदायांत सामील करण्यासाठीं आणि त्यांस अधिक उच्च दर्जाचा चरितार्थ चालविण्याचें शिक्षण देण्यासाठीं पाश्चात्त्यांचीं मिशनें खटपट करीत आहेत. त्यांच्या वन्य भाषांतून आज रामायण महाभारतादि ग्रंथांचें भाषांतर नसेल, पण बायबलाचें भाषांतर झालें आहे. या सर्व गोष्टीकडे आम्हीं लक्ष दिलें पाहिजे. वन्यसंस्करणाचें कार्य परदेशी लोकांपेक्षां आपणांसच चांगलें करतां येईल. संस्करणाचें बरेंच कार्य अनुकरणेच्छा घडविते. अनुकरण करण्यास योग्य असा उच्च प्रतीचा समाज जवळ असला तरी त्या उच्च समाजाचे अवयव म्हणून मोडले जाण्याची शक्यता असली तरच अनुकरण अधिक चांगलें होतें हें उघड आहे. वन्य लोकांनां ख्रिस्ती जरी केलें तरी त्यांस परकीय लोकांचे आचार उचलणें शक्य नाहीं असें आढळून आलें आहे. देश्यांचे आचार त्यांनीं उचलावयाचे तर देश्यांचे आचार शिकविण्यासाठीं शिक्षक मिळणार ते परके किंवा परक्यांच्या हाताखालीं तयार झालेले देशी ख्रिस्ती! वन्यांनां उच्च प्रकारचे आचार शिकविणें किंवा भाषा शिकविणें हें अर्थातच या शिक्षकांस कठिण जातें. वन्यांस आपल्यासारखें करणें हें आपलें कर्तव्य आहे आणि तें आपणांस केलेंच पाहिजे.

या वन्यांची संख्या लहानसहान नाहीं. हिंदुस्थानांत वन्यसंस्करणाचें काम मोठेंच आहे. चारपांच कोट लोकांस सुदारावयाचें हें कार्य आहे. हें कार्य करण्यासाठीं आपली कार्यपद्धति तरी काय असणार? ख्रिस्ती मिशनर्‍यांस विशिष्ट उपास्यांविषयीं वाटणारी श्रद्धा आपलें कार्य करण्यास आवेश उत्पन्न करिते, तसें आपणांस कोणतें तत्त्व चोदना उत्पन्न करील? आपणांस त्या लोकांस जाऊन काय शिकवावयाचें आहे? आपणांस शंकराच्या पूजेचा प्रसार करावयाचा कीं विष्णूच्या पूजेचा प्रसार करावयाचा?

यासंबंधाचें एक मुख्य तत्त्व येथें मांडलें पाहिजे तें हें कीं, वन्यसंस्करणाचा प्रश्न वन्यांच्य हिताच्या दृष्टीनेंच सोडविला पाहिजे. वन्यांस आपल्यासारखें करावें म्हणून हिंदूंस वाटणार, ख्रिस्त्यांस वाटणार व मुसुलमानांसहि वाटणार. वन्यांस संस्कार हिंदूंचा करावा असें ध्येय ठेवण्यांतच वन्यांचा फायदा आहे, कारण संस्कार्य व्यक्ति ख्रिस्ती अगर मुसुलमान झाली तर स्वजातीपासून तुटेल व रक्तानेंहि ख्रिस्त्यांत अगर मुसुलमानांत मिसळून जाईल आणि यामुळें तिच्या सन्निकर्षानें तज्जातीय इतर लोक सुधारणार नाहींत. पुष्कळदां असें झालें आहे कीं गोंड किंवा भिल्ल मुसुलमान किंवा ख्रिस्ती झाले म्हणजे ग्राम्यांस अगर नागरिकांस शोभतील असे धंदे करूं लागतात आणि वन्यांचे धंदे टाकून देतात; परंतु येवढ्यापुरती जरी त्यांची सुधारणा होते तरी ते परसमाजप्रविष्ट झाल्यामुळें त्यांच्या आचाराचा व जें थोडेंसें पुढारीपण त्यांस मिळतें त्या पुढारीपणाचा फायदा इतर गोंडांस किंवा भिल्लास मिळत नाहीं. वन्य व्यक्तीस हिंदूंचा संस्कार केल्यास सदरील अडचण उत्पन्न होणार नाहीं व तिच्या सुधारणेचा फायदा तिच्या जातींतील इतर लोकांस पूर्णपणें मिळेल.

वन्यांच्या उन्नतीसाठीं जे उपाय योजावयाचे ते साधारणतः येणेंप्रमाणें.

(१) त्यांच्यामधील निरक्षरता काढून त्यांस साक्षर करणें आणि त्यांच्या अत्यंत शेजारीं जे सग्रंथ लोक असतील त्यांची भाषा त्यांस शिकविणें.
(२) देशाचा सर्वमान्य इतिहास त्यासं अवगत करून देणें आणि ग्राम्य अगर नागरिक जनतेमध्यें त्यांस स्थान मिळवितां यावें म्हणून त्यांस धंद्यांचें शिक्षण देणें.

एवढ्या क्रिया झाल्या असतां इतर बाबतींत त्यांचें संस्करण इरत लोकांच्या बरोबर होऊं शकेल.

वरील विवेचनावरून वाचकांनां आपली सांपत्तिक वाढ राजकीय परिस्थितीवर किती अवलंबून आहे हें कळून येईल. आपणांला थोड्या फार राजकीय स्वरूपाच्याच सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. अशा तर्‍हेच्या सुधारणा प्रस्तुत शासनकर्त्यांस वरील गोष्टी पटवून देऊन व त्यांच्यावर लोकमताचा दाब टाकून घडवून आणल्या पाहिजेत. प्रत्यक्ष राजकीय सुधारणा म्हणजे शासनशक्तीची निराळ्या तर्‍हेनें वांटणी घडवून आणण्यानें सर्व कार्य व्हावयाचें नाहीं. आपणांस सध्यां कांहीं प्रातिनिधित सत्ता मिळाली आहे. आपल्या प्रतिनिधींनां व सरकारला दिशा दाखविण्याचें काम आपणांस करावयाचें आहे. आपणांपैकीं बर्‍याचशा प्रतिनिधींसमोर निश्चित असा कांहीं कार्यक्रम नसतो. त्यांनां वरील विवेचनावरून आपल्या कार्याची दिशा थोडीतरी कळूं लागेल अशी आशा आहे.