प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.

हिंदुस्थानांत सर्वमान्य उच्च वर्गाचा अभाव.- हिंदुस्थानामध्यें जातिव्यवस्थेचें इतकें प्रस्थ माजूनहि अशा तर्‍हेचा सर्वमान्य उच्च वर्ग केव्हांच निर्माण झाला नाहीं. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या राज्यांतील राजे हे निरनिराळ्या दर्जाच्या जातींचे लोक होते. क्षत्रिय ही जात अशी केव्हांच झाली नाहीं. या निरनिराळ्या राज्यकर्त्या जातींमध्यें रजपूत ही जात सर्वांत उच्च समजली जाते. मराठ्यांच्या जातीलाहि बरेंच महत्त्व आहे. कांहीं राजे आपणांस रजपूत म्हणवितात, परंतु त्यांची जात रजपूत आहे ही गोष्ट सर्वमान्य झालेली नाहीं. कांहीं लोकांनां केवळ जंगली राजे समण्यांत येतें. कांहीं लहान संस्थानांवर अगदीं हलक्या जांतींतील लोकांचें राज्य आहे.

हिंदुस्थानामध्यें कित्येक वर्गांस थोडेंबहुत उच्चत्व प्राप्त झालें होतें व आजहि कित्येक वर्गांस उच्चत्व आहे. परंतु ही त्यांची उच्चता केवळ स्थानिक अगर जातिविशिष्ट असे व आहे. उदाहरणार्थ, मराठा ही जात घेऊं. या जातींत मराठे आणि कुणबी असे दोन वर्ग आहेत. या दोन वर्गांनां निराळ्या जाती समजण्याइतका त्यांजमध्यें भेद नाहीं. या दोन वर्गांच्या रोटीव्यवहार सररहा होतो व केव्हां केव्हां बेटीव्यवहारहि होतो. एखादा कुणबी सुशिक्षित झाला आणि चांगला पोषाख करूं लागला म्हणजे तो आपणास मराठा म्हणवूं लागतो; आणि या त्याच्या म्हणण्यास त्याच्यामध्यें कांहीं विशेष दोष असल्याशिवाय, उदाहरणार्थ त्याच्या घराण्याची उत्पत्ति व्यभिचारापासून वगैरे झाली नसल्यास, कोणीहि हरकत घेत नाहीं. बंगाली ब्राह्मणांमध्यें आणि कायस्थांमध्यें कांहीं घराण्यांनां कुलीन असें म्हणतात. उत्तर हिंदुस्थांनांत खत्री आणि रजपूत यांसारख्या कांहीं जाती आहेत त्या आपणांस क्षत्रिय असें म्हणवितात. परंतु हिंदुस्थानांतील क्षत्रियवर्गामध्यें ज्याला आपल्या जातीबाहेर अथवा प्रदेशाबाहेर सर्व हिंदुस्थानांत महत्त्व मिळालें आहे अशा एकहि वर्ग अथवा जात उत्पन्न झाली नाहीं. वास्वविक क्षत्रियत्व हें जात अथवा वर्ग या रूपानें केव्हांच अस्तित्वांत नव्हतें. क्षत्रियत्व ही केवळ एक कल्पना होती. अशा तर्‍हेचा एक वर्ण आहे ही एक ब्राह्मणी कल्पना होती. सर्व समाजाची रचना चातुर्वर्ण्यपद्धतीस अनुसरून असली पाहिजे ही ब्राह्मणांची कल्पना, परंतु हिंदुस्थानांतील लढाऊ जातींमध्यें ऐक्य उत्पन्न झालें नाहीं आणि त्यामुळें सर्वमान्य असा वर्ण अथवा जात त्यांच्याकडून तयार झाली नाहीं. अशा तर्‍हेचा सर्वमान्य वर्ण अथवा जात उत्पन्न होण्यास फक्त दोनच मार्ग आहेत आणि ते राजकीय सत्ता आणि सामाजिक संस्कार हे होत. हिंदुस्थानामध्यें राजकीय सत्तेनें या बाबतींत हात टेंकले आहेत. हिंदू राजांच्या सत्तेचा मुसुलमानांकडून नाश झाल्यानंतर हिंदू राजांची व सरदारांची इभ्रत बरीच कमी झाली. परंतु हिंदुसमाजाचें धुरीणत्व या नवीन राजकीय सत्ताधारी लोकांकडे-मुसुलमानांकडे-न जातां, तें पूर्णपणें ब्राह्मणांच्या हातीं गेलें. हिंदूंनीं मुसुलमानांनां केव्हांहि समाजांतील श्रेष्ठ वर्ग म्हणून मान्य केलें नाहीं. ते मुसुलमानांनां समाजबाह्य समजत असत व त्यांनीं केवळ जुलुमानें राजकीय सत्ता हस्तगत केली अशी त्यांची कल्पना असे. हिंदूंनां मुसुलमान राजांशीं लग्नव्यवहार करण्यांत मोठेपणा वाटत नसून या आचारभ्रष्ट जातीशीं जुलुमानें लग्न करण्याचा प्रसंग आल्यास त्यांत आपण पतित व भ्रष्ट झालों असेंच त्यांस वाटे. इंग्रजांबद्दलहि असेंच म्हणतां येईल. जोंपर्यंत इंग्रज लोकांस हिंदू लोक भ्रष्ट मानतात व मुसुलमान लोक नास्तिक मानतात तोंपर्यंत त्यांच्याकडे सामाजिक श्रेष्ठत्व केव्हांच येणार नाहीं.