प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.

ब्राह्मणद्वेषाची मीमांसा.- ब्राह्मणद्वेषाविषयीं विचार केला असतां आपणांस असें दिसून येईल कीं, आज जो ब्राह्मणद्वेष दिसत आहे त्याला बर्‍याच अंशीं ब्राह्मणांची ऐहिक सुस्थितीच कारण आहे. जेथें ब्राह्मण निरक्षर तेथें ब्राह्मणद्वेष नाहीं जेथें तो पुजानिमग्र तेथें तो पुज्य आणि जेथें तो ऐहिक चढओढीमध्यें यशस्वी तेथें तो द्वेषपात्र अशी स्थिति आहे. मद्रास इलाख्यांत ब्राह्मण सुशिक्षित, तेथें ब्राह्मणद्वेष ब्राह्मणेतरांत फार. आणि उत्तरसिलोनमध्यें ब्राह्मण पूजानिमग्न व अडाणी, तेथें ब्राह्मणद्वेषच नाहीं. उत्तरहिंदुस्थानांतील ब्राह्मण कमी सुशिक्षित, तर तेथें ब्राह्मणांविषयीं आदर. या परिस्थितीवरून असें दिसून येईल कीं, जर स्पर्धामय जगांत ब्राह्मणांस शिरावयाचें असेल तर त्यांस इतरांचा द्वेषहि पतकरलाच पाहिजे. ब्राह्मणांचें कर्तव्य ऐहिक श्रेष्ठपणा मिळविण्याचें होय हें सांगणें म्हणजे अधिक द्वेषाचें स्थान ब्राह्मणांनीं व्हावें अशाच तर्‍हेचा उपदेश करणें नव्हे काय ? आणि हा विचार जातिद्वेष वाढविण्याचा नव्हे काय ? आणि अशी जर परिस्थिति आहे तर आपण एकत्वाची अपेक्षा कशी करावी? असे प्रश्न येथें उपस्थित होतात.

या प्रश्नांचा विचार करतांनां प्रथम द्वेषाची मीमांसा करूं आणि पुढें एखाद्या समूहाविषयीं द्वेष कां जागृत होतो हें पाहून नंतर ब्राह्मण जातीविषयीं विचार करूं. द्वेष म्हणजे विरुद्धभाव होय. हा उत्कटतेला गेला म्हणजे याला आपण द्वेष म्हणतों. विरुद्धता व आकर्षण हे दोन भाव कोणत्याहि समजांत आहेतच. जगांत आजातशत्रु कोणीच नाहीं. अठरा अक्षौहिणी सैन्याचा नाश करणार्‍या धर्मराजास “अजातशत्रु” म्हणणें म्हणजे या शब्दांचा उपहास होय. समाजामध्यें जी विरुद्धता दिसते ती सर्व आत्महितविषयक आहे. “न कश्चित् कस्यचिन्मित्रं न कश्चित् कस्यचिद्रिपुः। कारणेन हि जानीयाद् मित्राणि च रिपूंस्तथा॥” कोणा मनुष्याचा दुसर्‍या मनुष्याशीं संबंध जडला म्हणजे त्या संबंधांत आपलें हित साधावयाचा त्यांपैकीं प्रत्येकजण प्रयत्‍न करितो. प्रसंगीं त्यांचीं भांडणें होतात, प्रसंगीं त्यांस पुन्हां एक व्हावें लागतें. कोणाशीं स्नेह केला म्हणजे तो स्नेह देखील अनेक अपेक्षा उत्पन्न करितो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहींत म्हणजे स्नेहांत व्यत्यय येतो. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे विरुद्धता ही सार्वत्रिक आहे, तिचें हिंदुसमाजांतच अस्तित्व आहे असें नाहीं; द्वेषाच्या मुळाशीं स्वहितविषयक जागरूकता असते आणि ती सर्व समाजांस अवश्य आहे. प्रत्येक जातीनें आत्महिताविषयीं जागरूक असावें कीं नसावें हा प्रश्न प्रथम उपस्थित होतो. आणि या बाबतींत जागरूक नसावें असें जर कोणी म्हणणार नाहीं तर आपल्या जातीच्या हितासाठीं इतरांशीं विरोध करूं नये असें तरी कोण म्हणूं शकेल?

आत्महिताविषयक जागरूकता समाजांत कोणतीं कोणतीं स्वरूपें धारण करिते व कोणतीं कोणतीं कार्यें करिते हें आतां आपण पाहूं.

आत्महिताची कल्पना जितकी व्यापक असेल तितकी जागरूकता अधिक राहील. ती जितकी अल्पक्षेत्री असेल तितकें व्यक्तीचें आचरण अनुदारपणाचें आहे असें लोकांस भासेल.

हिंदुसमाजांतून विरोधबुद्धीच काढून टाकावीं असें कोणी म्हणेल तर त्यास उत्तर हें कीं, तो प्रकार अत्यंत घातुक होईल.

समाजशास्त्रीय मुत्सद्दीगिरीचें एक कर्तव्य हें आहे कीं, व्यक्तींची अगर समूहांची स्वार्थविषयक जागरूकता नष्ट होऊं न देतां तिचें उलटें संवर्धन करावयाचें व व्यक्तींची अगर समूहांची आत्महितभावना ज्य समाजाची मुत्सद्दीगिरी आपण करीत असूं त्या समाजाच्या हितसंवर्धनाशीं बद्ध करावयाची. जर ब्राह्मणद्वेष समाजांत नको असेल तर या प्रकारचा द्वेष नको एवढें म्हणून चालावयाचें नाहीं. कारण, द्वेष म्हणजे उत्कट स्पर्धा व विरोध, आणि राष्ट्राचें नुकसान होत नसेल व जें कांहीं राष्ट्रांत असेल तें घेण्यासाठींच स्पर्धा असेल तर एखाद्या समूहानें आपल्या हितासाठीं ब्राह्मणांशीं स्पर्धा केली आणि त्यांशीं विरोध केला तर त्यांत विरोध करणाराचा दोष नाहीं. तेव्हां समाजशास्त्रीय मुत्सद्दयानें ब्राह्मणद्वेषाच्या मुळाशीं जी इतर समूहांची आत्महितभावना आहे ती लक्षांत ठेवून या द्वेषाच्या आत्यंतिक नाशाच्या भानगडींत न पडतां त्याला फक्त नीट वळण देण्याचा यत्‍न करावा.

आत्महिताविषयींच्या जागरूकतेमुळें आणि स्वाभाविक मत्सरामुळें जो द्वेष उत्पन्न होतो तो  परस्परविवाहास घातुक होत नाहीं हें थोड्याच विचाराअंतीं कळून येईल. पैसेवाल्यांचा गरीब लोक द्वेष व मत्सर करितात हा अनुभव सर्वत्र आहे. तथापि तेच गरिब लोक पैसेवाल्यांच्या समाजांत मिसळूं पाहण्याची आकांक्षा करितात आणि त्यांच्याशीं विवाह जुळवून आणण्यास धडपडतात. लोकांच्या पोकळ आदराचें किंवा दयेचें स्थान न होतां जे स्पृहा व असूया यांचें स्थान होतात तेच समाजाच्या अग्रेसरत्वास पात्र झालेले असतात.