प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.

समाजांत उच्च वर्गाचें कार्य. -  समाजांत लौकिक श्रेष्ठत्व संपादन केलेला एखादा उच्च वर्ग असला म्हणजे त्या वर्गाशीं संबंध ठेवण्याची इच्छा प्रत्येक जातींत उत्पन्न होते. प्रत्येक जातींतील लोकांस असें वाटतें कीं या उच्च वर्गाशीं लग्नसंबंध करण्याची संधि मिळणें ही एक मानाची गोष्ट आहे. अशा तर्‍हेचा उच्च वर्ग समाजांत नसेल तर निरनिराळ्या जातींनां आपल्या जातीबाहेर लग्न करण्याची इच्छा उत्पन्न होण्यास कांहींच कारण राहणार नाहीं. प्रत्येक जात सामान्यतः दुसर्‍या जातीचा द्वेष करीत असते आणि स्वतःच्याच जातीपुरता विचार करीत असल्यानें ती दुसर्‍या जातींतील लोकांशीं विवाह करण्याच्या भानगडींत पडत नाहीं.