प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.
शासनसत्ताधिष्ठित ब्राह्मणांची समाजनीति - ब्राह्माणांस शासनाधिकार असतां त्यांची सामाजिक नीति कशी काय होती हें आतां पाहूं.
पेशवाई बुडाल्याला आज जवळजवळ एक शतक उलटून गेलें आहे. पेशवाई कायम असतां आम्हां महाराष्ट्रीयांपैकीं कांहींजणांच्या डोक्यांत एक तर्हेची शासननीति होती. देशासंबंधीं काय करावें या संबंधानें कांहीं तरी विचार लोकांच्या डोक्यांत घोळत होते; कारण जे विचार डोक्यांत घोळतील, त्या विचारांस कर्तृत्वाचें स्वरूप द्यावयास तेव्हां अवकाश होता. देशाचें राज्य कसें चालवावें यासंबंधानें कल्पना चालत होत्या, व देशांतील निरनिराळ्या वर्णांस कसें काय वागवावें, देशांतील एका वर्गाचा दुसर्या वर्गाशीं संबंध कोणत्या तर्हेचा असाव यासंबंधीं विचार व्यक्त होत असत, व या कल्पनांनां आणि विचारांनां कार्यरूपहि येत असे. उदाहरणार्थ, नारायणराव पेशव्याच्या कारकीर्दींत प्रभूंसंबंधानें दाखविलेली सामाजिक नीति लक्षांत घ्यावी व त्याच्या पलीकडे जावयाचें तर मुंबईंतील सोनारांनीं एकमेकांत नमस्कार करूं नयेत तर रामराम करावा असा निर्बंध घालण्यास बाळाजी बाजीरावानें इंग्रजांस भाग पाडलें ही गोष्ट लक्षांत घ्यावी. ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यामध्यें तीक्ष्ण रेषा ओढण्याच्या समाजनीतीबद्दल आपलें आजचें कांहींहि मत असो, पण पेशव्यांस एक विशिष्ट प्रकारची सामाजिक नीति होती, हें खास. पेशवाईंतील सामाजिक नीतीचीं मुख्य मुख्य तत्त्वें म्हटली म्हणजे येणेंप्रमाणें:- दाक्षिणात्य म्हणजे निवृत्तमांस ब्राह्मणांमध्यें एकीकरण उप्तन्न करून चोंहोकडे त्यांचें प्राबल्य वाढवावयाचें व ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हे दोनच वर्ग देशांत ठेवावयाचे. ब्राह्मणांमध्यें परस्पर लग्नव्यवहार वाढवावयाचा, व ब्राह्मणांच्या साह्यानें देशावर राज्य करावयाचें. बुद्धिमान् लोकांचा वर्ग व राज्य करणारांचा वर्ग हा एकच करावयाचा.
बाळाजी बाजीरावानें स्वतः एका देशस्थ मुलीबरोबर लग्न केलें होतें, आणि तेलंग कर्नाटक व द्रविड या देशांतील विद्वान् ब्राह्मण पुण्यास आणून व त्यांस देशस्थांबरोबर लग्न करण्यास उत्तेजन देऊन महाराष्ट्रीय बनविलें होतें. आज जीं ब्राह्मण घराणीं महाराष्ट्रीय म्हणवितात, त्यांत तेलगु, द्रविड आणि कानडी लोक पुष्कळ आहेत. बरेचसे कानडी ब्राह्मण आपणांस देशस्थ म्हणवितात. व त्यांचीं महाराष्ट्रीय देशस्थांबरोबर लग्नें तर दर घटकेस होतात. तेलगु ब्राह्मणांत वैदिक आणि नियोगी या दोन मुख्य मोठ्या जाती आहेत व या दोन जातींच्या पोटजाती पुष्कळच आहेत. त्यांच्यामध्यें आपापसांत लग्नें होत नाहींत, परंतु या सर्वांचीं महाराष्ट्रीय ब्राह्मणांबरोबर लग्नें होतात. नागपूरची घरतपासणी केली, तर आज महाराष्ट्रीय म्हणून मान्य झालेले पुष्कळ ब्राह्मण मूळचे तेलगु आहेत असें नजरेस येईल हें पूर्वीं सांगितलेंच आहे.
हिंदुस्थानांत सामाजिक सुधारणा घडवून आणण्याकरितां ज्या अनेक खटपटी सध्यां चालू आहेत त्यांसंबंधाचें, महाराष्ट्रीय ब्राह्मणांस पंचद्रविड ब्राह्मण विवाह्य करण्याचें म्हणजे इतर द्रविड ब्राह्मणांच्या जाती महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजास चिटकवण्याचें भलेंथोंरलें काम पेशव्यांनीं व तत्कालीन महाराष्ट्रीय ब्राह्मणांनीं करून ठेविलें आहे. आजकाळच्या सुधाराकांस जर कांहीं करावयाचें असेल, तर पेशव्यांनीं घालून दिलेल्या समाजनीतीचा अधिक विस्तार करावयाचा आहे एवढेंच. समाजनीतीचीं मुख्य तत्त्वें पूर्वींच घालून दिलीं गेलीं आहेत, परंतु तीं तत्त्वें प्रचारांत आणणारें कार्यकारी मंडळ (म्हणजे पेशवे व त्यांच्या भोंवतालची मंडळी) हें मात्र नष्ट झालें आहे.
पेशव्यांच्या समाजनीतीवर ज्याच्या योगानें प्रकाश पडणार आहे अशी आणखी एक गोष्ट म्हटली म्हणजे समशेर बहाद्दरची “मुंज” करण्याचा बाजीराव साहेबांनीं केलेला विचार होय. ही जी सुधारणा त्यांनीं मनांत योजिली होती ती तत्कालीन लोकमत त्यावेळेस तयार नसल्यामुळें पार पडली नाहीं. तथापि त्यांत अंतर्भूत झालेलें तत्त्व आदरणीय होतें, यांत शंका नाहीं. एका पुरुषानें दोन बायका कराव्या अगर करूं नयेत या प्रश्नास व त्याचप्रमाणें एखादी रखेली ठेवावी अगर ठेवूं नये या प्रश्नास येथें महत्त्व देण्याचें कारण नाहीं. कां कीं बहुतेक सर्वच राजे रखेल्या ठेवितात, व सध्यां इंग्रज रखेल्या ठेवणारे देखील संस्थानिक लागतील तितके आहेत. येथें लक्षांत घ्यावयाचें तें हें कीं, स्वतांच्या औरस संततीस-मग ती मुसुलमानणीपासून झालेली असो किंवा रखेलीपासून झालेली असो-मान्यता द्यावयाची व हिंदु समाजांत त्या संततीला स्थान द्यावयाचें हा जो विचार बाजीरावाच्या मनांत आला, तो कांहीं एक विशिष्ट समाजनीति त्याच्या मनांत वागत असल्यामुळेंच आला हें उघड दिसतें, आणि ती समाजनीति म्हटली म्हणजे ब्राह्मण व ब्राह्मणेतर हिंदू आणि अहिंदू यांचा संबंध उत्पन्न झाला असतां त्यापासून उत्पन्न होणारें अपत्य हिंदू समाजामध्येंच अंतर्भूत व्हावें ही होय.
बाजीरावानें हिंदु समाजास जो घास गिळावयास दिला, तो फारच मोठ असल्याकारणानें तत्कालीन ब्राह्मणांस तो गिळवला नाहीं; व त्यामुळें त्याच्या मनांतील समाजनीति प्रस्थापित झाली नाहीं. त्यानें मनांत योजलेल्या सुधारणेस योग्य असा काळ तेव्हां उत्पन्न झालेला नव्हता. पेशव्यांच्या सामाजिक धोरणांचा साकल्यानें विचार केला असतां तदंतर्गत खालील तत्त्वें नजरेस येतात.
पहिलें तत्त्व म्हटलें म्हणजे ब्राह्मणांचें एकीकरण करणें म्हणजे सर्व दाक्षिणात्य ब्राह्मणांची एक जात बनविणें.
दुसरें तत्त्व-ब्राह्मण ज्या वेळेस ब्राह्मणेतर स्त्रीशीं-मग ती हिंदु स्त्री असो अगर यवन स्त्री असो-समागम करील व प्रजोत्पत्ति करील, तेव्हां त्या प्रजेचा अंतर्भाव केवळ हिंदु समाजांतच नव्हे तर द्विजवर्गांत व्हावा, यासाठीं खटपट करणें.
तिसरें तत्त्व-सर्व ब्राह्मणेतरांस एका वर्गांत लोटणें.
चौथें तत्त्व-ब्राह्मण व ब्राह्मणेतरांत तीक्ष्ण भेद उत्पन्न करून ब्राह्मणांची थोर पदवी इतर जातींच्या मनावर ठसविणें.
आणि पांचवें तत्त्व-ब्राह्मण या पदवीस जितक्या जातींचा हक्क पोहोंचत असेल, तितक्या जातींची चौकशी करून तो हक्क मान्य करणें, आणि त्या जातींनीं ब्राह्मणांशीं मिळून जाण्यास पूर्णपणें संधि देणें.
खरोखर पाहतां ही सामाजिक सुधारणेचीं तत्त्वें जातिभेद मोडावा, जातिभेद मोडावा, अशी जी अलीकडील सुधारकांची अनिश्चित ओरड आहे त्या ओरडीप्रमाणें मुळींच अनिश्चित नाहींत. जातिभेदासंबंधानें एक तर्हेची नीति निश्चित झाली होती असेंच या तत्त्वांवरून दिसून येतें.
एकोणिसाव्या शतकांतील सुधारकांची जातिभेदासंबंधाची ओरड ही या तत्त्वांच्या पुढें मागासलेली दिसते. जातिभेद मोडण्यासंबंधानें आपला काय कार्यक्रम असावा यासंबंधानें फारसा विचार या सुधारकांनीं केलेला नाहीं, असेंच त्यांची ओरड दाखविते.
पेशव्यांची समाजनीति ही कमींतकमी शंभर वर्षानीं अर्वाचीन सुधारकांच्या पुढें होती असें म्हणतां येईल. कारण पेशव्यानीं जातिभेदासंबंधानें जी समाजनीति अठराव्या शतकाच्या मध्यभागीं दाखविली, तितकी प्रगमनशील समाजनीति तितक्या स्पष्टपणानें अर्वाचीन सुधारकांच्या मनांत अद्यापि सुद्धां जागृत झालेली नाहीं. समाजांतील उच्च वर्गाचें एकीकरण करावयाचें, समाजांतील खालच्या वर्गांच्या मनांत उच्च वर्गाविषयीं उच्चपणा ठसवावयाचा, व खालच्या वरच्या वर्गांच्या मिश्रणानें जी संतति होईल तिला उच्च वर्गांत समाविष्ट करावयाचें व हिंदू आणि बाह्य यांचा शरीरसंबंध झाला असतां संततीस हिंदूंमध्यें स्थान द्यावयाचें हि त्यांची-थोडक्या शब्दांत-जातिभेदमय देशाचें एकराष्ट्र बनविण्याची पद्धति होती. पेशव्यांच्या लेखांमधून अगर तत्कालीन लेखांमधून जातिभेद मोडावा असे शब्द नाहींत. परंतु येथें हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, जातिभेद हा शब्दच पेशवाईनंतरचा आहे. पेशव्यांचें धोरण पूर्णपणें मुत्सद्दयांसारखें होतें, तत्त्ववेत्त्यांसारखें नव्हतें. मुत्सद्दी त्याला प्रस्तुत असणार्या प्रसंगीं काय करावें एवढेंच ठरवितो. तत्त्ववेत्ता अंतिम ध्येय काय असावें हें सांगतो. पेशवे हे सामाजिक मुत्सद्दी होते, व हा मुत्सद्दीपणा अनिश्चितपणें वाक्यें वदणार्या सुधारकांपेक्षां कितीतरी उच्च प्रतीचा होता.
पेशवाई गेल्यामुळें जें एक मोठें नुकसान झालें तें हें कीं, सामाजिक सुधारणा करणारें कार्यकारी मंडळ नष्ट झालें, व सामाजिक सुधारणा करण्यास जें राजकीय प्रयोजन लागतें तें राजकीय प्रयोजन उरलें नाहीं. सध्यां आपणांस हिंदुस्थानचें राज्य चालवावयाचें नाहीं, किंवा नवीन देश काबीज करावयाचे नाहींत. इंग्रजांचें राज्य आल्यामुळें देशाच्या सुखदुःखासाठीं ज्या कांहीं गोष्टी करावयाच्या, त्यांचा मक्ता इंग्रजांकडे गेला, आणि त्यांचा हुकूम पाळणें एवढेंच काय तें आपलें कर्तव्य राहिलें. इंग्रजी राज्यांत कालांतरानें इंग्रजी शिक्षण मिळाल्यामुळें इंग्रजानें शासनव्यवस्थेंत आपणांस भागीदार करावें अशी इच्छा लोकांत उत्पन्न झाली व राजकीय चळवळी सुरुं झाल्या. त्या राजकीय चळवळींस थोडेंसें यश देखील आलें. तें यश म्हटलें म्हणजे मांटेग्यू-चेल्म्सफर्ड सुधारणा होत. तथपापि सामाजिक सुधारणा करण्यास इंग्रज सरकार पूर्वींपासूनच असमर्थ होतें. याचें कारण इंग्रज सरकार हें आमच्या समाजाचें केंद्र नाहीं. इंग्रज सरकार फार तर शहराचें आरोग्य वाढविणें, शेतकर्यांची स्थिति सुधारणें, गिरण्यांतील कामकरी वर्गाची स्थिति सुधारणें, देशांत इस्पितळें वगैरे काढणें, आंधळे वगैरे लोकांसाठीं शाळा काढणें, गुन्हेगार लोकांस सुधारण्याचा प्रयत्न करणें, यांसारख्या सुधारणा करूं शकेल. या सुधारणा देखील उत्तम तर्हेनें त्यांस पार पाडतां येणें शक्य नाहीं. उदाहरणार्थ, कामकरी वर्गाची राहणी सुधारण्याचा प्रयत्न करण्याची गोष्ट घ्या. समाजांतील संस्कृतिदृष्ट्या अत्यंत कनिष्ठ अशा वर्गाची राहणी जी सुधारावयाची ती रहावें कसें यासंबंधाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यापेक्षां चांगल्या तर्हेनें राहणार्या लोकांच्या वर्गाशीं त्या वर्गाचा संबंध आल्यानेंच सुधारेल. या कामांत समाजांतील उच्च जाती कनिष्ठ जातींवर जो परिणाम घडवूं शकतील तो परिणाम टोपीवाला घडवूं शकणार नाहीं, हें उघड आहे. तसेंच सुधारणा बहुधा अनुकरणानेंच होते, आणि अनुकरण करण्यास लायक अशा वर्गास जर राजकीय प्रमुखत्व नसेल तर त्याचें अनुकरण करण्यास कनिष्ठ वर्ग फारसा उत्सुक होत नाहीं हेंहि स्पष्ट आहे. अर्थात् ब्राह्मणांचें अनुकरण करण्याची इच्छा ब्राह्मणांच्या हातची सत्ता आज गेल्यामुळें इतरांमध्यें फारच कमी झाली असल्यानें आणि टोपीवाल्याचें अनुकरण करणें हें हिंदु मजूर वर्गास शक्यच नसल्यानें या वर्गाची राहणी सुधारणें अत्यंत अवघड होऊन बसलें आहे.
इंग्रज हा हिंदु समाजाचा केंद्र नसल्यामुळें त्याच्या हातून वर सांगितलेल्या सुधारणांपैकीं सामाजिक सुधारणा देखील फारच अल्प होईल.
सामाजिक सुधारणेचे आपण विवेचनाच्या सोईसाठीं दोन ओबडधोबड भाग करूं; एक भाग म्हटला म्हणजे समाजाची घटनात्मक सुधारणा आणि दुसरा भाग म्हटला म्हणजे बाह्यस्वरूपी सुधारणा.
वर सरकार ज्या सुधारणा करण्यास योग्य आहे असें सांगितलें त्या सुधारणांस आपण बाह्यस्वरूपी म्हणूं व समाजाच्या घटनेंतच फेरफार जेणें करून होईल त्यांस घटनात्मक सुधारणा म्हणूं. समाजाच्या घटनेमध्यें सुधारणा जेणें करून होईल, अशा सुधारणा दोन तीन प्रकारच्या आहेत. (१) विवाहविषयक सुधारणा म्हणजे लोकांनीं आपल्या जातीबाहेर लग्नें करावींत अगर करूं नयेत या प्रश्नांसंबंधाची सुधारणा. (२) हिंदुसमाजानें बाहेरील लोकांस आपल्या समाजांत घ्यावें या दृष्टीनें केलेली सुधारणा. (३) एका जातीनें दुसर्या जातींतील मनुष्यास आपल्या जातींत घ्यावें व एका जातींतील कुलानें अन्यजातीय व्यक्तीस दत्तक घ्यावें या दिशेची सुधारणा.
या तीन प्रकारच्या सुधारणा समाजाच्या घटनेंत महत्त्वाचे हितकर फेरफार करूं शकतील. पण या प्रकारच्या कोणत्याहि घटनात्मक सुधारणा करण्यास इंग्रज सरकार पूर्णपणें असमर्थ आहे एवढेंच नव्हे तर सरकारपाशीं वजन एवढेंच ज्यांचें भांडवल आहे असे लोकहि असमर्थ आहेत. हिंदुसमाजाचें बलवर्धन हें ज्यांचें ध्येय आहे त्यांनीं या गोष्टी नीट लक्षांत वागवून आपला कार्यक्रम आंखला पाहिजे एवढी सूचना देऊन आतां समाजघटनाविषयक विचारांचा थोडा विस्तृत परामर्श घेऊं.