प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.

ब्राह्मणमहत्त्वाचें ऐतिहासिक पर्यालोचन.- कोणतेंहि कार्य करण्याची जबाबदारी समजाचा जो उच्चवर्ग असतो त्यावर पडते. ही गोष्ट इतर लोकांची वृत्ति पाहिली असतां सहज दिसून येईल. जो जातिभेदावर किंवा हिंदुसमाजावर कोरजे ओढतो तो मुख्यतः ब्राह्मणावरच कोरडे ओढतो. जे ब्राह्मणेतर ब्राह्मणांस शिव्या देतात त्यांची अनुक्त भावना अशी दिसते कीं, कार्य करण्याची जबाबदारी ब्राह्मणांवर टाकावी, आपण असंतोष व्यक्त करावा आणि समाजास वळण कोणतें द्यावयाचें हें ब्राह्मणांवर सोंपवावें. या प्रकारची पद्धति फार पूर्वींपासून चालत आहे. आणि त्यामुळें सामाजिक व धर्मशास्त्रविषयक विचार करण्याची जबाबदारी ब्राह्मणांवरच पडल्यामुळें समाजनीति ब्राह्मणांनांच ठरवावी लागली.

समाज कोणत्या स्थितींत असावा यासंबंधानें तात्त्विक विचार सध्यां जसे चालतात तसे पूर्वकालींहि चालत होते. चातुर्वर्ण्य असावें कीं नसावें, विवाहसंबंधीं कोणते नियम अवलंबावे, याप्रकारचे प्रश्न अनेक प्रसंगीं वादविवादास कारण होत असत. महाभारत, पुराणें, धर्मशास्त्रें यांचें अवलोकन केलें असतां अनेक वादविवाद दृष्टीस पडतात. संस्थांच्या उत्पत्तिलयासंबंधानें देखील अनेक कल्पना पुढें येत असत.

ज्याप्रमाणें तात्त्विक तर्‍हेचे वादविवाद होत असत, त्याप्रमाणें “पॉलिसी” उर्फ व्यवहार्य नीतितत्त्वेंहि लोक विचारास घेत असत. राजेलोकांस ज्या प्रमाणें राज्य चालविण्यासाठीं नीति लागे, त्याप्रमाणें ब्राह्मणांस आपलें कर्तव्यकर्म बजावण्यासाठीं विशिष्ट प्रकारची नीति अवलंबावी लागे. ती नीति काय होती हें समजलें नाहीं तोंपर्यंत लोकांस प्राचीन इतिहासांतील पुष्कळ गोष्टी समजणार नाहींत, ब्राह्मणांच्या विशिष्ट कृत्यांचा अर्थ त्यांस समजणार नाहीं, व यायोगानें ब्राह्मणांविषयीं त्यांचा वाईट समज होण्याचा संभव आहे. तसेंच, समाजसुधारणा जर शिस्तवार करावयाची असेल तर ब्राह्मणांची परंपरागत समाजनीति समजून घेतली पाहिजे.

ब्राह्मणांच्या आवडीनिवडी, इच्छा, आकांक्षा, अंतःकरणें यांची ओळख त्यांची समाजनीति समजावून घेतली असतां होणार आहे. ज्या गोष्टी ब्राह्मणांच्या हातीं होत्या त्यांवरून त्यांची पूर्वींची समाजनीति समजते. आज आपणांस पुष्कळ अंशीं पूर्वीं घालून दिलेल्या समाजनीतीचाच अवलंब करावयाचा आहे हें पुढें दाखवून देऊं. ब्राह्मणांच्या नीतीचीं मुख्य अंगें कोणतीं अमुख्य अंगें कोणतीं यांचीं निवडानिवड करून मुख्यांगांचें प्रवर्तन करावयाचें आहे. आजच्या अत्यंत उच्च अशा राष्ट्रीय आकांक्षा पाहिल्या, आणि प्राचीन ब्राह्मणांची नीति व सामाजिक ध्येयें यांचें अवलोकन केलें, तर आपणांस दिसून येईल कीं हीं दोन्हीं एकच आहेत. प्राचीनांच्या कृत्यांचें सहृदयतेनें अवलोकन मात्र केलें पाहिजे.

पूर्वकालीन ब्राह्मणांच्या समाजनीतीचीं अंगें अनेक आहेत. ब्राह्माणांकडून जीं कार्यें घडून आलीं व त्यांचा जो अधिकार होता तो त्यांनीं ज्या रीतीनें वापरला त्यांत त्यांची समाजनीति नजरेस येते.

प्राचीन ब्राह्मणांच्या या समाजनीतीचीं मुख्य अंगें सिद्धसिद्धांतरूपानें अगोदर देऊन नंतर त्यांच्या विवेचनास लागूं.

(१) ब्राह्मणांचें पहिलें तत्व हें होतें कीं चातुर्वर्ण्याच्या कल्पनेचा प्रसार सर्वत्र करणें, व चोहोंकडे ब्राह्मणांचें महत्त्व प्रस्थापित करणें.
(२) ब्राह्मणांचें महत्त्व कमी करण्यासाठीं कोणी प्रयत्‍न केला तर त्याच्या विरुद्ध खटपट करणें.
(३) वेद हा धर्मशास्त्राचा आणि समाजशासनपद्धतीचा मूळपाया करणें, आणि वेदांत व स्मृतिपुराणादि ग्रंथांत व्यक्त झालेल्या कल्पना व लोकप्रचार यांचें एकीकरण करून स्वतंत्र संस्कृति तयार करणें. ज्या जातींचे वेद हे परंपरागत ग्रंथ नसतील त्या जातींत देखील वेद हे शासनाचे व धर्मशास्त्राचे प्रमाणग्रंथ बनविणें.
(४) देशांमध्यें वेदांचें व ब्राह्मणांचें महत्त्व कमी करणारे जे संप्रदाय उत्पन्न होतील त्या संप्रदायांचें महत्त्व कमी करणें. हें कार्य करण्यासाठीं त्या संप्रदायांस एकतर आपलीं तत्त्वें कबूल करण्यास भाग पाडणें अगर त्या संप्रदायांचें वजन सामान्य जनांवर न पडूं देणें.
(५) देशांमध्यें बाह्य लोकांच्या येण्यामुळें, अगर परदेशीं ब्राह्मणांच्या गमनामुळें चातुर्वर्ण्ययुक्त आर्य व आर्यसंस्कृतिहीन बाह्य यांचा संबंध आला असतां बाह्यांचा चातुर्वर्ण्ययुक्त समाजांत अंतर्भाव करणें व आर्यसंस्कृतीचा पगडा बाह्यांवर बसविणें.
(६) वरील ध्येयांस अनुसरून भाषाविषयक व संस्कारविषयक नीति उत्पन्न करणें.

ब्राह्मणांनीं मोठमोठीं सामाजिक कार्यें कशीं घडवून आणलीं यांचा सविस्तर वृत्तांत येथें देणें शक्य नाहीं. त्यांचा सविस्तर इतिहास द्यावयास निदान पांचशें पांचशें पृष्ठांचे सात आठ ग्रंथ लिहावे लागतील. त्यांनीं काय केलें याची कल्पना येण्यास त्यांच्या कार्यांतील मुख्य विशेष गोष्टी येथें देतों.

ब्राह्मणांचें एक मुख्य कार्य म्हटलें म्हणजे त्यांनीं समाजाचें नियमन करणारें धर्मशास्त्र वेदांसारख्या महत्त्वाच्या पैतृक वाङ्मयाच्या साहाय्यानें निर्माण केलें.

त्यांनीं निरनिराळ्या ठिकाणीं जाऊन त्या देशांतील आचारांची आणि वेदविहित धर्मशास्त्राची सांगड घातली.

आर्य, द्रविड, मंगोलियन आणि मलायी इत्यादि अत्यंत भिन्न अशा मोठ्या मोठ्या मानववंशांतील लोकांत त्यांनीं एकत्वाची भावना उत्पन्न केली आणि ती देखील इतक्या तीव्रतेनें उत्पन्न केली कीं वेदांसारखें ग्रंथ सर्वांसच पैतृक वाटूं लागले.

निरनिराळ्या ठिकाणचीं निरनिराळीं दैवतें होतीं, त्या सर्व दैवतांचें त्यांनीं एकीकरण केलें.

संस्कृत विद्या आणि शास्त्रें यांचा प्रसार चोहोंकडे केला आणि ब्राह्मणांच्या दृष्टीनें जें आचरण योग्य त्या आचरणाचा प्रसार केला.

निरनिराळे देश जे पूर्वीं लोकांस जाण्यास अयोग्य वाटत ते ब्राह्मणांनीं जाऊन रहाण्यास योग्य असे केले. उदाहरणार्थ, मनुस्मृतीच्या कालीं म्हणजे इसवी शकानंतर तीनशें वर्षेंपर्यंत जो दक्षिण देश शूद्रांसच वसतीस योग्य होता, तेथें कित्येक क्षेत्रें उत्पन्न करून दक्षिणेंत प्रवास करणें हें ब्राह्मणांनीं सर्वांचे कर्तव्य करून ठेविलें.

कित्येक ठिकाणीं त्यांनीं उच्च तर्‍हेचा कायदा लोकांस दिला, आणि राजनीतीचा बोध केला.

ज्या ज्या नवीन कल्पना निघतील त्यांची ग्राह्याग्राह्यता युक्तीच्या दृष्टीनें आणि परंपरागत शास्त्रांच्या दृष्टीनें तपासून परंपरागत ज्ञानसंचयांत एकसारखी सुधारणा केली.

आर्य संस्कृतीचा परिणाम शक, यवन, पल्हव इत्यादि बाह्यांवर करून त्यांस हिंदू बनविलें.

याप्रमाणें समाजाचा विस्तार करणार्‍या, इतरांस आपल्या समाजांत ओढणार्‍या, समाजास एकस्वरूपता आणणार्‍या, स्वसंस्कृतीचा विस्तार परदेशांत करणार्‍या आणि इष्ट आचारविचारांचें (मद्यमांसनिषेधादि) अवलंबन जनतेकडून करविणार्‍या व विटाळ असलेल्या देशांचा विटाळ घालवून तेथें प्रवास करणें हें कर्तव्यकर्म करणार्‍या सामाजिक सुधारणा आपल्या पूर्वजांनीं केल्या. त्यांच्या कार्याचा अभ्यास आणि मनन करणें हें अर्वाचीन सुधारकांचें कर्तव्यकर्म होय.