प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.

ब्राह्मणांनीं लौकिक समाजधुरीणत्व पत्करलें पाहिजे.- जर राजेजरवाड्यांस समाजधुरीण होणें अशक्य असेल तर तें काम ब्राह्मणांनीं केलें पाहिजे. या बाबतींत त्यांनां कांहीं विशेष गोष्टींची मदत आहे. हिंदुस्थानामध्यें नेहमीं सर्वांत श्रेष्ठ मानली जाणारी अशी ही एवढीच जात आहे. अनेक राजघराणीं उत्पन्न झालीं व नष्ट झालीं. परंतु ब्राह्मणांचें स्थान कायम आहे. तथापि आहे या स्थितींत ब्राह्मण विशेषसें कार्य करूं शकणार नाहींत. त्यांनीं आपली संघटना केली पाहिजे. प्रत्येक ब्राह्मणजातीची संघटना होऊन त्या सर्व जातीचें एकीकरण झालें पाहिजे. ब्राह्मण संघटित झाले म्हणजे त्यांनां आपल्या समाजाचे घटक कोणास बनवावें हें ठरवितां येईल; सध्यां त्यांच्या समाजांत असलेल्या कांहीं लोकांस त्यांनां बाहेर काढून टाकतां येईल व योग्य वाटतील त्या बाहेरच्या जातींतील लोकांस त्यांनां आपल्या पवित्र समाजाचे घटक बनवितां येईल. ब्राह्मणत्वामध्येंहि कांहीं दोष आहेत. त्यांतील मोठा दोष म्हणजे जातिवैशिष्ट्य हा होय. ब्राह्मणांच्या निरनिराळ्या आठशें जाती असून त्यांचा परस्परांत लग्नव्यवहार होत नाहीं. यांतील कांहीं जाती प्रथम केवळ प्रदेशावरून पडल्या असून आतां त्या पृथक् जाती बनल्या आहेत. एखादा कान्यकुब्ज ब्राह्मण दक्षिणेंत आला तर त्याला कोणीहि दाक्षिणात्य ब्राह्मण समजणार नाहीं या कान्यकुब्ज ब्राह्मणाला लग्न करावयाचें झाल्यास कनोजला गेलें पाहिजे व त्याच्या मुलांसहि बायका मिळविण्याकरितां तिकडेच जावें लागेल. पंचगौड ब्राह्मण आणि पंचद्रविड ब्राह्मण हे जे पूर्वीं केवळ प्रदेशविशिष्ट भेद होते त्यांच्या आतां जाती बनल्या आहेत.

ब्राह्मणांमध्यें हे निरनिराळे भेद कसे उत्पन्न झाले हें शोधीत बसण्याचें हें स्थल नव्हे. परंतु प्रादेशिक भेदांचें रूपांतर जातिभेदामध्यें जें होतें त्याचीं कांहीं कारणें येथें विचारांत घेऊं. पहिलें आणि मुख्य कारण म्हटलें म्हणजे परस्पराबद्दल संशय हें होय. जेव्हां एखादा उत्तर हिंदुस्थानांतील मनुष्य दक्षिण हिंदुस्थानांत येतो आणि आपणास ब्राह्मण म्हणवितो, तेव्हां दक्षिणेंतील पुष्कळ ब्राह्मणांनां त्याच्या ब्राह्मणत्वाचा संशय येऊन ते त्याच्याशीं संबंध ठेवीत नाहींत. अशा संशयाला कारणेंहि असतात. कारण अशा तर्‍हेनें फसविल्याचीं पुष्कळ उदाहरणें ऐकींव गोष्टींतून आढळतात. दुसरें, उत्तरेकडील ब्राह्मणांच्या आणि दक्षिणेकडील ब्राह्मणांच्या आचारांत फरक असतो; आणि हा फरक विशेषतः सोंवळ्याओंवळ्याच्या बाबतींत जास्त आढळतो. उदाहरणार्थ, एखादा गुजराथी ब्राह्मण दक्षिणेंत आला आणि त्याच्या समजुतीप्रमाणें शूद्राच्या हातचें पाणी पिण्यास हरकत नसल्यामुळें शूद्राच्या हातचें पाणी प्याला तर एखादा महाराष्ट्रीय ब्राह्मण म्हणेल, “काय हो! हा कोणत्या जातीचा ब्राह्मण आहे? हा शूद्राच्या हातचें पाणी पितो.” या प्रमाणें तो त्या गुजराथी ब्राह्मणास आपणापेक्षां हलका समजूं लागेल. अशा स्थितींत त्यांच्यामध्यें लग्नव्यवहार होणें अशक्य आहे.

जादिभेदाची तीव्रता कमी करण्यास योजावयाच्या उपायांची विस्तृत चर्चा येथें करण्याचें प्रयोजन नाहीं. राष्ट्रीकरणाच्या बाबतींत महत्त्वाचे अडथळे कोणते आणि जातिभेद कायम टिकविणारीं कारणें कोणतीं यांचेंच दिग्दर्शन येथवर केलें आहे. त्यावरून आजच्या हिंदुसमाजाकडे एका निराळ्याच दृष्टीनें आपणांस पाहतां येईल. संप्रदायसंस्था या राष्ट्रीकरणाच्या मार्गांत आज विघ्नरूप आहेत. हे संप्रदाय भविष्यत् काळीं नष्ट होण्याचा पुष्कळ संभव आहे. तें कसेंहि असो. संप्रदायांच्या नाशानें एकीकरणाच्या कार्याला मदत होईल यांत संशय नाहीं.

समाजाचें पारमार्थिक धुरीणत्व विशिष्ट जातीच्या हातीं राहील हें आतां शक्य नाहीं. पारमार्थिक धुरीणत्व म्हणजे देव कसा आहे, आत्मा कसा आहे, मोक्ष म्हणजे काय आणि मनुष्य मेल्यावर त्याचें काय होतें हें सांगण्याचा धंदा. या धंद्यामध्यें जो जास्त लबाड त्यास प्रामुख्य मिळणार. जो अधिक विद्वत्तेनें लोकांस भुरळ घालूं पाहील तो जाडा आध्यात्मिक पुढारी बनणार. असल्या धंद्यांत ब्राह्मणाच्या सबंध जातीनें वर्णकार्य म्हणून पडावें हें अयोग्य होईल. ब्राह्मणांचे महत्त्व होतें ते देवाचा पत्ता लावून देण्याच्या कौशल्यामुळें नसूल विद्वत्तेमुळें होतें हें कोणीहि इतिहासज्ञ कबूल करील. आज महाराष्ट्रांत पारमार्थिक उद्यमांत जितके ब्राह्मण आहेत त्यांहून अधिक ब्राह्मणेतर आहेत, आणि या प्रकारच्या उद्यमांत स्पर्धा करण्यास एखादी इंग्रज बाई देखील येऊन बरेंचसें यश संपादूं शकते हें आपणांस दिसतच आहे. तर आपण येथें असा प्रश्न उपस्थित कराव कीं, पारमार्थिक उद्यम सोडून दिला तर ब्राह्मणाचें महत्त्व कसें राहील आणि ब्राह्मणाच्या महत्त्वाची आवश्यकता तरी काय?

एखाद्या जातीचें महत्त्व कायम ठेवणें हा समाजाचा अंतिम हेतु नाहीं. आणि यासाठीं अज्ञानावर जें महत्त्व स्थापन झालें असेल तें जिवंत ठेवण्याची जबाबदारी कोणींच घेऊं नये. ब्राह्मणाच्या महत्त्वाची अंतिमविकासकालीं आवश्यकता नाहीं. तथापि महत्त्व आहे तें सोडून देण्याचा प्रयत्‍न यशस्वी होणार नाहीं. ब्राह्मणांचें अनुकरण करण्याची इच्छा सर्व जातींत आहे आणि ब्राह्मणांशीं विवाह व्हावेत असें अनेक जातींतील सुशिक्षितांस वाटतें. या इच्छा जोंपर्यंत आहेत तोंपर्यंत ब्राह्मणप्रामुख्य सहजच राहणार आहे. या दोन्ही इच्छा स्तुत्य व राष्ट्रसाधक आहेत. समाजास एकरूपता कोणत्यातरी श्रेष्ठवर्गाच्या अनुकरणानें येते आणि समजाची आकांक्षा एका विशिष्ट वर्गाशीं लग्न करण्याची असली म्हणजे ती आकांक्षा जातिभेद नष्ट करण्यास उपयोगी पडते. जातिभेद नष्ट करण्याला समाजांत एक शिष्टवर्ग असल्यानें फार मदत होते. दोन सदृश जाती एकमेकांशीं लग्नव्यवहार करणार नाहींत पण उच्च म्हणून समजल्या जाणार्‍या वर्गाशीं करतील. सर्व हिंदुस्थानाचें ऐक्य व्हावयाचें तर तें अशा एका जातीमार्फत किंवा वर्गामार्फत होईल कीं, जो वर्ग सर्वदेशव्यापी आहे. आणि ज्याचें महत्त्व सर्व लोकांच्या मनावर ठसलेलें आहे. असा वर्ग हिंदुसमाजांत ब्राह्मणाशिवाय दुसरा नाहीं. या प्रकारचे विचार मागें व्यक्त केलेच आहेत. आतां आपणांस हें पहावयाचें कीं समाजाचा केंद्रभूत जो वर्ग व्हावयाचा तो केवळ ‘वातांबुपर्णाशनाः’ या वृत्तीचा असावा कीं सर्व प्रकारच्या ऐहिक श्रेष्ठतेचें तो माहेरघर असावा?  वातांबुपर्णाशनाः या वृत्तीनें सर्व हिंदूंचें वैवाहिक नीतींतील केंद्र होण्याचें कार्य ब्राह्मणांकडून होणार नाहीं. लोकांची प्रवृत्ती भिक्षुकाच्या किंवा संन्याश्याच्या पायां पडण्याकडे असेल पण दरिद्रयास मुलगी देण्याकडे खास नाहीं. आज भिक्षुकाच्या लग्नापेक्षां ब्राह्मण शिंप्याच्या लग्नास कमी अडचण पडते. भिक्षुक देखील आपली मुलगी भिक्षुकास देऊं चाहत नाहीं. या परिस्थितीशीं झगडत असतां भिक्षुकसमाज जिवंत राखण्याकरितां तैलंगी ब्राह्मणांत वैदिकी व नियोगी असे भेद उत्पन्न होऊन दोन निराळ्या जाती पडल्या. समाजाचे धुरीण आणि समाजांतील श्रेष्ठवर्ग या नात्यानें ब्राह्मणावर जी जबाबदारी पडते ती ही कीं, आपल्या जातीस विद्याधनसंपन्नता आणली पाहिजे आणि सर्व निरनिराळ्या जातींतील निवडक मंडळीशीं लग्नव्यवहार करून सर्व राष्ट्रास एकरूपता आणली पाहिजे. अर्थात् आज आपणांस जातिभेद मोडावयाचा असेल तर तो मोडण्यास आज उपलब्ध असलेल्या ब्राह्मणगौरवाशिवाय दुसरें साधन आपल्या हातीं नाहीं. येथें ब्राह्मणद्वेषाचीहि थोडीशी मीमांसा करणें इष्ट आहे.