प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.
संस्थानिकांतून असा उच्च वर्ग निघेल काय? - हिंदुस्थानांतील राजेरजवाडे आणि संस्थानिक यांच्या मधून असा वर्ग आपणांस निर्माण करतां येईल काय? आमच्या मतें असा वर्ग उत्पन्न होणें शक्य आहे आणि त्या वर्गाचा हिंदुस्थानामध्यें ऐक्य उत्पन्न करण्याच्या कामीं उपयोगहि होईल. ब्राह्मणांपेक्षां राजेरजवाड्यांकडे सामाजिक श्रेष्ठत्व देणें हें अनेक कारणांमुळें सोइस्कर होईल. परंतु असें होण्यापूर्वीं राजेरजवाड्यांमध्यें शिक्षण, कर्तव्याची जाणीव आणि कार्यतत्परता या गोष्टींची बरीच वाढ झाली पाहिजे. या गोष्टी तर हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांमध्यें ठळकपणें केव्हांच दिसून आलेल्या नाहींत. त्यांच्यामध्यें स्वतःच्या घराण्याबद्दल फाजील अभिमान दिसून येतो, त्यांस उच्च सामाजिक ध्येय नाहीं, यामुळें त्यांच्याकडून सहकारितेनें प्रयत्न होणें शक्य दिसत नाहीं.
जर हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांनीं आपले जात व वंश या बाबतींतील भेद बाजूस ठेविले आणि एकमेकांत सररहा बेटीव्यवहार चालू केला आणि ब्राह्मणांवर आपलें वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांस करणें शक्य आहे. अशा तर्हेनें हिंदी राजेरजवाडे एक होऊन जर ते ब्राह्मणांचें वर्चस्व नाहींसें करण्याचा प्रयत्न करतील तर फार चांगली गोष्ट होईल. राजेलोकांनां त्यांच्या संपत्तीचें आणि सत्तेचें साहाय्य आहे. उलट, ब्राह्मणांनां फक्त बुद्धि, शिक्षण व पूर्वापार चालत आलेलें महत्त्व यांचेंच केवळ साहाय्य आहे. परंतु राजेलोकांनीं आपणांत ऐक्य उत्पन्न करण्याची बुद्धि अद्यापि दाखविलेली नाहीं. एका मोठ्या हिंदी संस्थानिकाच्या मुलीला योग्य व दुसर्या जातीशिवाय मिळण्यासारखा नव्हता यामुळें तिला आपल्याच जातींतील एका राजाची दुसरी बायको व्हावें लागणार होतें ही गोष्ट प्रसिद्ध आहे. जर हिंदी राजेरजवाड्यांत ऐक्य होईल तर ते असा एक वर्ग उत्पन्न करूं शकतील कीं, त्या वर्गाशीं लग्न करण्याची इच्छा सर्व जातींच्या व वर्गांच्या मनांत येईल. ब्राह्मणांनां आपल्या जातीचा कितीहि अभिमान असला तरी ते राजेलोकांशीं लग्नव्यवहार करणें सर्वस्वीं नाकारतील असें दिसत नाहीं. राजघराण्याशीं लग्न करण्यांत ज्यांनां भूषण वाटत असे अशा ब्राह्मणांचीं पूर्वकालांतील उदाहरणें देतां येतील. अशा तर्हेच्या गोष्टी अद्यापहि होतात. पूर्व हिंदुस्थानांतील एका राजाला बाकीचे राजे केवळ एका जंगली जातींतील समजत असत; परंतु त्याला त्याच्यापेक्षां उच्च समजल्या जाणार्या जातीच्या मुलीशीं लग्न लावतां आलें व पुढें त्याला आपल्या मुलीचें लग्न तिच्याबरोबर एक लक्ष रुपये वरदक्षिणा देऊन एका ब्राह्मणांशीं लावतां आलें.
आपणांस कांहीं ब्राह्मणांचीं अशीं देखील उदाहरणें सांपडतात कीं, त्यांच्या मतें ज्या जातींनां वैदिक संस्कारांचा अधिकार नाहीं त्या जातींचे संस्कार वैदिक पद्धतीनें करण्याचें त्यांनीं नाकारलें व यामुळें त्यांच्यावर वंशपरंपरागत जहगिरी सोडण्याचा प्रसंग आला तरी त्यांनीं मागें पुढें पाहिलें नाहीं. परंतु सुदैवानें अथवा दुर्दैवानें केवळ तत्त्वाकरितां ऐहिक वैभवाचा त्याग करणारे लोक नेहमींच फार थोडे आढळतात. बरेचसे ब्राह्मण केवळ ऐहिक गोष्टींचाच विचार करणारे असून त्यांच्यावर द्रव्याचा व सत्तेचा परिणाम झाल्यावांचून राहत नाहीं.
ब्राह्मणांची सत्ता नाहींशी करण्याच्या कामीं पुढाकार घेण्याच्या योग्यतेचा व कांहीं विधायक काम करून हिंदुस्थानामध्यें ऐक्य उत्पन्न करूं शकेल असा संस्थानिक दुर्दैवेंकरून अद्यापि उत्पन्न झाला नाहीं. बरेचसे हिंदू संस्थानिक ब्राह्मणांनां शिव्या देण्यापलीकडे कांहीं करीत नाहींत. गौतमबुद्धाच्या कालापासून किंबहुना त्याच्याहि पूर्वींपासून ज्या राजेलोकांस ब्राह्मणांच्या सत्तेविरुद्ध चळवळ करावयाची होती त्यांनीं देखील याच रीतीचा अवलंब केला आहे. हिंदुस्थानांतील राजेरजवाडे आणि दुसर्या ब्राह्मणेतर जाती यांनीं हिंदु समाजाचें ऐक्य करणारी जी एकटीच ब्राह्मण जात तिच्या विरुद्ध हा स्वस्ताईचा आणि बेजबाबदार द्रोह करण्यापलीकडे कांहीं केलेलें नाहीं. राजेरजवाड्यांनां कार्य केल्याशिवाय व जबाबदारी पत्करल्याशिवाय मोठेपणा मिळावा अशी इच्छा आहे. आणि जोंपर्यंत त्यांची अशी इच्छा आहे तोंपर्यंत त्यांच्या मार्फत हिंदुस्थानामध्यें ऐक्य उत्पन्न होण्याची आशा करावयास नको.