प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.

ब्राह्मणकर्तव्य.- समाजाजी वैवाहिक नीति मनुष्याच्या वैवाहिक प्रवृत्तीच्या पुढें कांहीं अंशानें फिक्की पडेल असें दिसतें. समाजांत प्रौढविवाह रूढ झाले म्हणजे प्रीतिविवाह समजांत शिरण्यासाठीं धडपडणार आणि आईबापांचे विचार बाजूस राहून तरुणतरुणींचे विचार व भावना विवाहनीतीच्या निर्णायक होणार अशा प्रसंगी भिक्षापात्र धरणार ब्राह्मण तरुणीचें चित्त आकर्षू शकणार नाहीं, तर सुखवस्तू तरुणच आकर्षूं शकेल. तेव्हां सर्व वर्णांच्या स्त्रियांनीं ब्राह्मणांशी विवाह करावा ही आकांक्षा बाळगावी असें जर राष्ट्रीकरणाच्या प्रवर्तकांस वाटत असेल तर ब्राह्मण तरुणांनीं सुदृढ शरीर, देखणेपणा व उत्कृष्ट नीतिमत्ता यांच्या जोडीला संपत्तीहि साध्य करून घेतली पाहिजे.

आतां समाजांतील श्रेष्ठवर्ग अनुकरणाचें स्थान बनतो ही गोष्ट लक्षांत घेऊन ब्राह्मणकर्तव्याकडे पाहूं. मद्रासकडील ब्राह्मणेतर ब्राह्मणांचा द्वेष करितो पण त्यांचें अनुकरणहि करितो. तिनवेल्लीचे शैव वेल्लाल यांनीं मांसाहाराचा त्याग केला आहे आणि मद्रासेंतील पुष्कळ वेल्लाल ब्राह्मणाच्या सोंवळ्यांची देखील नक्कल करितात. दरिद्री ब्राह्मण पुष्कळ प्रसंगीं आपलें दारिद्र्य लपविण्याकरितां “पिण्डेष्वनास्था खलुभौतिकेषु” म्हणत सुटतो आणि हें पाहून ब्राह्मणेतर देखील निरिच्छतेचा आणि त्यागाचा गुण आपल्या अंगीं आणण्याचा प्रयत्‍न करितो. सिंहलद्वीपांत वेल्लाल आणि सिंध देशांत आमिल या दोन ब्राह्मणेतर जातींस सामाजिक प्रामुख्य असल्यानें ते लौकिकाचारांत ब्राह्मणांचें अनुकरण करण्याच्या भानगडींत मुळींच पडत नाहींत; ते अनुकरण करावयाचेंच झालें तर पाश्चात्त्यांचें अनुकरण करितात. ब्राह्मणांस समाजांतील शिष्टवर्ग रहावयाचें असल्यास त्यांनीं लौकिकाचाराच्या बाबतींत देखील त्यांचेंच प्राधान्य राहील असें वागलें पाहिजे. पोषाखाच्या नवीन सुंदर टुमा आपल्यापासून प्रसृत व्हाव्यात म्हणून आपले पोषाख अधिक सुंदर आणि अधिक अभिरुचियुक्त करण्याची त्यांनीं खटपट केली पाहिजे. तसेंच समाजांतील माणासांनीं आपआपसांत पाळावयाचे शिष्टसंप्रदाय उर्फ ‘एटिकेट’ आपल्यापासूनच प्रसृत होतील अशी त्यांनीं काळजी घेतली पाहिजे. वरील कारणासाठीं पोषाख व शिष्टसंप्रदाय इकडे ब्राह्मणांनीं वारंवार लक्ष दिलें पाहिजे. त्यांनीं जर आधिभौतिक मोठेपणा सोडून देऊन आध्यात्मिक मोठेपणा मिळवावा अगर राखावा एवढेंच आपलें ध्येय आहे अशा बाणा बाळगण्यास सुरुवात केली तर सर्व लोकांस आर्थिक दुर्गतीस नेण्यास दोष त्यांच्याकडे येईल. दौर्बल्य आणि दारिद्र्य या गोष्टी सर्व प्रकारच्या दुर्गतीच्या जनक होतात ही गोष्ट त्यांनीं लक्षांत ठेवली पाहिजे.