प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ७ वें.
मूलगृहकालीन उर्फ इंडोयूरोपीय संस्कृति

आजचे मूलगृहकालीन अवशेष आणि त्यांचा उपयोग - तुल्य शब्द तपासून मूलगृहीं वायव्य, आरण्य, आणि ग्राम्य पशुपक्षी काय असावे, तत्कालीन शेतकी कशी असावी, कालमापन कसें होतें, भक्ष्यें काय होतीं यांची माहिती मिळतें. अंगावरचे दागिने, घरे व गृहांतर्गत साहित्य, व्यापार, दळणवळण, कुटुंब आणि राज्यव्यवस्था यांवरहि पुष्कळसा प्रकाश या तुल्य शब्दांनींच पडणार आहे. श्राडरनें तुल्यशब्द हेंच साहित्य विशेष वापरलें आहे आणि मध्यें फक्त प्राचीनकालचे सरोगृहात्मक अवशेष पूर्वकालबोधासाठीं उपयोगांत आणिलें आहेत. वेदकालीन दैवतें, वृत्तें इत्यादि गोष्टी श्राडरनें उपयोगांत आणल्या आहेत तथापि या विषयांवर भारतीय अभ्यासकहि आहेत. प्रथमतः शब्दमूलक माहिती देऊन नंतर इतर गोष्टींचा विचार करूं.

आतां प्रथम मूलगृहकालीन प्राण्यांचा म्हणजे तद्वाचक निरनिराळ्या भाषांतील शब्दांचा विचार करूं.

सस्तनमांसाहारीप्राणी.

कुत्राः- संस्कृत-श्वा, झेंद-स्या, आर्मीनियन-शुनू, लॅटिन-कॅनिस, गॉथिक-हुंडस्, ई.हाउंड.

लांडगा - संस्कृत-वृक, झेंद-वेहर्क, आर्मीनियन-गेल, लॅटिन-लुपुस, गॉथिक-व्हुल्फ्स.

अस्वल - संस्कृत-ॠक्ष, आर्मीनियन-अर्ज्, लॅटिन-उर्सुस.

उद्रा - एक जातीचा मांसाहारी प्राणी. संस्कृत-उदा, झेंद-उद्रा, प्राचान उच्च जर्मन ओठ्ठिर.

कोल्हा – संस्कृत-शृगाल;अर्वाचीन फारसी-शगाल तीक्ष्णदंती प्राणी.

उंदीर - संस्कृत-मूष, अर्वाचीन फारसी-मूस, आर्मीनियन-मुक्र, लॅटिन-मूस.

ससा - संस्कृत-शश, अर्वाचीन उच्च जर्मन-हसो.

ग्राम्यपशू

यांच्या खेरीज घोडा, गाढव, बैल, शेळी, मेंढी, उंट, डुकर या प्राण्यांनां निरनिराळया भाषांत ज्या संज्ञा आहेत त्यांच्यांतील ध्वनिसाद्दश्यावरून हेहि प्राणी पूर्वीच्या लोकांना माहीत होते असें म्हटलें पाहिजे. आर्यन् लोकांचें मूळ ठिकाण कोणतें या गोष्टीचा निर्णय होण्यासारखें यांत कांही नाही, वेदभाषा बोलणाऱ्या लोकांना भरतखंडांत सिंह, हत्ती, माकड, वगैरे जी चतुष्पाद जनावरें आढळलीं, त्यांचे तुल्य शब्द अजून सांपडले नाहींत आणि म्हणून संशोधकांनी ती मूलगृही नव्हती असें ठरविले आहे.

सिंह वाघ - आर्य लोकांनां सिंह हा प्राणी पंचनद्यांच्या प्रदेशांत आल्यावर व इराणी लोकांपासून फुटून निघाल्यावर आढळला असावा. ॠग्वेदाच्या अत्यंत जुन्या सूक्तांत सिंह हा मनुष्यें व जनावरें यांचा वैरी आहे अशीं वर्णने आहेत व त्याच्या गर्जनेची वायूच्या भरारीस उपमा दिलेली आहे.

सिंहविषयक ॠग्वेदांतील तीन अर्ध्या ॠचा येथें देतों.
सिंहा इव नानदति प्रचेतसः पिशाइव सुपिशो विश्ववेदसः
ॠ.१. ६४.८

ज्याप्रमाणें गिरिगव्हरा (गुहे) मध्यें सिंह गंभीर शब्द करतात त्याप्रमाणें ज्ञानसंपन्न मरुत अत्यंत गर्जना करितात.

रक्षा अग्निमकुषं तूर्वयाणं सिंहो न दमे अपांसि वस्तोः
ॠ. १. १७४.३

हे इंद्रा सिंह ज्याप्रमाणें स्वाश्रयभूत वनाचें उपद्रवकारी गजादिकांपासून रक्षण करतों. व निर्भय होऊन निरोधी पशूंनां मारावयास धांवतो त्याप्रमाणें तूं अग्नीचें रक्षण करण्याकरितां धांव

यदीं गृभीततातये सिंहमित्र बृहस्पदे
ॠ. ५. ७४, ४
 
हे अश्विनीकुमारांनों अरण्यामध्यें गर्जना करणाऱ्या प्रबल सिंहाला ज्याप्रमाणें शूर पुरुष च्युत करिता (हांकलून देतात) त्याप्रमाणें गर्जना करणाऱ्या मेघांनां वृष्टयर्थ च्युत करा (मेघांनां पाऊस पाडवावयास लावा).

सिंह हा प्राणी जरी पूर्वीच्या काळांत सर्व यूरोपभर आढळत असे (लबक प्री-हिस्टॉरिक टाइम्स पृ.२९४) आणि स्वित्झर्लंडमधील लोक ज्या वेळी तळ्यामध्ये लांकडी घरें करून रहात असत (महाराष्ट्रीय ज्ञानकोश सरोगृह शब्द पहा.) त्या काळीं सिंह हा प्राणी नव्हता, तरी पण सिंहाची एक जात थ्रेस व त्याच्या भोंवतालच्या प्रदेशांत होती (हिरोडोटस ७.१२५) इंडोयूरोपियन लोकांच्या यूरोपीय शाखेस सिंहाची माहिती यूरोपखंडांतच झाली असें एक अनुमान केलें आहे ते निर्दोष आहे अशी आमची खात्री नाही.

व्याघ्र हा शब्द प्रथम अथर्व वेदांत (४, ३, १) येतो.

सिंह आणि वाघ हे दोन प्राणी जरी आपण घटकाभर बाजूस ठेवलें तरी पूर्वीच्या काळांतील श्वापदांत बरीच चतुष्पाद जनावरें शिकार करण्यालायक आढळतात. परंतु 'शिकार करणें' 'पारध' 'पारधी' यांनां समर्पक शब्द इंडोजर्मानिक भाषांत अजून सांपडले नाहींत हें लक्षांत घेण्यासारखें आहे. सामान्यतः हिंस्त्र जनावरांच्या नांवांवरून बनविलेलीं रूपे वगैरे या कामी उपयोगांत आणीत. जसें संस्कृती-मृगया शब्द जरी ॠग्वेदांत आढळत नाही तरी ॠग्वेद १०.४०, ४ मध्यें युवां मृगेय वारणा मृगण्यवा दोषा वस्तो हविषा नि व्हयामहे असें वर्णन आहें. येथें 'मृगण्यवः याचा अर्थ सायणाचार्यांनी (मृगभक्षक) शार्दूल असा केला आहे. परंतु ग्रिफिथनें सरळ शिकारी म्हणजे मृगया करणारे असा अर्थ केला आहे. यावरून त्या वेळी शिकार करणें भारतीय लोकांस ठाऊक होतें असें दिसते.

परंतु शिकार करणें या गोष्टीला मनुष्याच्या आयुष्याचा प्रधान भाग समजत नसत. व शेतकी हा प्रधान धंदा मानून शिकार हें त्याचें गौण अंग समजलें जात असे. शिकार करून मिळालेलें मांस वगैरे देवादिकांनां देत नसत व खाल्लें तरी अडचणींच्याच प्रसंगी खात असें श्राडर म्हणतों (प्रीहिस्टॉरिक अँटिक्विटिज पृ.२५); पण त्याला भक्कम पुरावा नाही.

पक्षी - इंडोजर्मनिक लोकांनां कोणते पक्षी माहीत होते याचा विचार करतांनां पक्ष्यांच्या नांवांत त्यांच्या ध्वनीचें जें अनुकरण करण्यांत येतें त्यामुळें फार घोटाळा होतो जसे, संस्कृत-उलूक, कोकिला, कृकवाकू, तित्तिरी या पक्ष्यांनां लॅटिन, ग्रीक, आर्मीनियन वगैरे भाषांतून जी नांवें आहेत त्यांतील ध्वनिसादृश्य त्या त्या पक्ष्यांच्या ध्वनींशीं मिळतें. तरी पण श्येन, हंस वगैरे पक्षी आशिया व यूरोप या दोन्ही खंडांत सांपडतात. पक्ष्यांचे आगमन निर्गमन म्हणजे त्यांनी डावीकडून अगर उजवीकडून जाणें यावरून शुभाशुभ शकुन पहाण्याचा प्रघात पूर्वी होता. देवाची इच्छा काय आहे किंवा भवितव्यतेच्या पोटांत काय आहे हें असल्या शकुनांवरून जाणींत. दिवाभीत व कपोत या पक्ष्यांनां अनेक राष्ट्रें अशुभ मानीत. रोमन लोका पुढें त्यांनां शुभ मानूं लागलें असावे असें दिसतें. इंडोजर्मानिक लोकांची ही गोष्ट झाली, वेदांत सुद्धां अशा प्रकारच्या समजुती आढळतात. ॠग्वेदांतील दहाव्या मंडळांतील एकशें पांसष्टाव्या सूक्तांत कपोतास यमाचा दूत म्हटलें आहे.