प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण ७ वें.
मूलगृहकालीन उर्फ इंडोयूरोपीय संस्कृति
आजचे मूलगृहकालीन अवशेष आणि त्यांचा उपयोग - तुल्य शब्द तपासून मूलगृहीं वायव्य, आरण्य, आणि ग्राम्य पशुपक्षी काय असावे, तत्कालीन शेतकी कशी असावी, कालमापन कसें होतें, भक्ष्यें काय होतीं यांची माहिती मिळतें. अंगावरचे दागिने, घरे व गृहांतर्गत साहित्य, व्यापार, दळणवळण, कुटुंब आणि राज्यव्यवस्था यांवरहि पुष्कळसा प्रकाश या तुल्य शब्दांनींच पडणार आहे. श्राडरनें तुल्यशब्द हेंच साहित्य विशेष वापरलें आहे आणि मध्यें फक्त प्राचीनकालचे सरोगृहात्मक अवशेष पूर्वकालबोधासाठीं उपयोगांत आणिलें आहेत. वेदकालीन दैवतें, वृत्तें इत्यादि गोष्टी श्राडरनें उपयोगांत आणल्या आहेत तथापि या विषयांवर भारतीय अभ्यासकहि आहेत. प्रथमतः शब्दमूलक माहिती देऊन नंतर इतर गोष्टींचा विचार करूं.
आतां प्रथम मूलगृहकालीन प्राण्यांचा म्हणजे तद्वाचक निरनिराळ्या भाषांतील शब्दांचा विचार करूं.
सस्तनमांसाहारीप्राणी.
कुत्राः- संस्कृत-श्वा, झेंद-स्या, आर्मीनियन-शुनू, लॅटिन-कॅनिस, गॉथिक-हुंडस्, ई.हाउंड.
लांडगा - संस्कृत-वृक, झेंद-वेहर्क, आर्मीनियन-गेल, लॅटिन-लुपुस, गॉथिक-व्हुल्फ्स.
अस्वल - संस्कृत-ॠक्ष, आर्मीनियन-अर्ज्, लॅटिन-उर्सुस.
उद्रा - एक जातीचा मांसाहारी प्राणी. संस्कृत-उदा, झेंद-उद्रा, प्राचान उच्च जर्मन ओठ्ठिर.
कोल्हा – संस्कृत-शृगाल;अर्वाचीन फारसी-शगाल तीक्ष्णदंती प्राणी.
उंदीर - संस्कृत-मूष, अर्वाचीन फारसी-मूस, आर्मीनियन-मुक्र, लॅटिन-मूस.
ससा - संस्कृत-शश, अर्वाचीन उच्च जर्मन-हसो.
ग्राम्यपशू
यांच्या खेरीज घोडा, गाढव, बैल, शेळी, मेंढी, उंट, डुकर या प्राण्यांनां निरनिराळया भाषांत ज्या संज्ञा आहेत त्यांच्यांतील ध्वनिसाद्दश्यावरून हेहि प्राणी पूर्वीच्या लोकांना माहीत होते असें म्हटलें पाहिजे. आर्यन् लोकांचें मूळ ठिकाण कोणतें या गोष्टीचा निर्णय होण्यासारखें यांत कांही नाही, वेदभाषा बोलणाऱ्या लोकांना भरतखंडांत सिंह, हत्ती, माकड, वगैरे जी चतुष्पाद जनावरें आढळलीं, त्यांचे तुल्य शब्द अजून सांपडले नाहींत आणि म्हणून संशोधकांनी ती मूलगृही नव्हती असें ठरविले आहे.
सिंह वाघ - आर्य लोकांनां सिंह हा प्राणी पंचनद्यांच्या प्रदेशांत आल्यावर व इराणी लोकांपासून फुटून निघाल्यावर आढळला असावा. ॠग्वेदाच्या अत्यंत जुन्या सूक्तांत सिंह हा मनुष्यें व जनावरें यांचा वैरी आहे अशीं वर्णने आहेत व त्याच्या गर्जनेची वायूच्या भरारीस उपमा दिलेली आहे.
सिंहविषयक ॠग्वेदांतील तीन अर्ध्या ॠचा येथें देतों.
सिंहा इव नानदति प्रचेतसः पिशाइव सुपिशो विश्ववेदसः
ॠ.१. ६४.८
ज्याप्रमाणें गिरिगव्हरा (गुहे) मध्यें सिंह गंभीर शब्द करतात त्याप्रमाणें ज्ञानसंपन्न मरुत अत्यंत गर्जना करितात.
रक्षा अग्निमकुषं तूर्वयाणं सिंहो न दमे अपांसि वस्तोः
ॠ. १. १७४.३
हे इंद्रा सिंह ज्याप्रमाणें स्वाश्रयभूत वनाचें उपद्रवकारी गजादिकांपासून रक्षण करतों. व निर्भय होऊन निरोधी पशूंनां मारावयास धांवतो त्याप्रमाणें तूं अग्नीचें रक्षण करण्याकरितां धांव
यदीं गृभीततातये सिंहमित्र बृहस्पदे
ॠ. ५. ७४, ४
हे अश्विनीकुमारांनों अरण्यामध्यें गर्जना करणाऱ्या प्रबल सिंहाला ज्याप्रमाणें शूर पुरुष च्युत करिता (हांकलून देतात) त्याप्रमाणें गर्जना करणाऱ्या मेघांनां वृष्टयर्थ च्युत करा (मेघांनां पाऊस पाडवावयास लावा).
सिंह हा प्राणी जरी पूर्वीच्या काळांत सर्व यूरोपभर आढळत असे (लबक प्री-हिस्टॉरिक टाइम्स पृ.२९४) आणि स्वित्झर्लंडमधील लोक ज्या वेळी तळ्यामध्ये लांकडी घरें करून रहात असत (महाराष्ट्रीय ज्ञानकोश सरोगृह शब्द पहा.) त्या काळीं सिंह हा प्राणी नव्हता, तरी पण सिंहाची एक जात थ्रेस व त्याच्या भोंवतालच्या प्रदेशांत होती (हिरोडोटस ७.१२५) इंडोयूरोपियन लोकांच्या यूरोपीय शाखेस सिंहाची माहिती यूरोपखंडांतच झाली असें एक अनुमान केलें आहे ते निर्दोष आहे अशी आमची खात्री नाही.
व्याघ्र हा शब्द प्रथम अथर्व वेदांत (४, ३, १) येतो.
सिंह आणि वाघ हे दोन प्राणी जरी आपण घटकाभर बाजूस ठेवलें तरी पूर्वीच्या काळांतील श्वापदांत बरीच चतुष्पाद जनावरें शिकार करण्यालायक आढळतात. परंतु 'शिकार करणें' 'पारध' 'पारधी' यांनां समर्पक शब्द इंडोजर्मानिक भाषांत अजून सांपडले नाहींत हें लक्षांत घेण्यासारखें आहे. सामान्यतः हिंस्त्र जनावरांच्या नांवांवरून बनविलेलीं रूपे वगैरे या कामी उपयोगांत आणीत. जसें संस्कृती-मृगया शब्द जरी ॠग्वेदांत आढळत नाही तरी ॠग्वेद १०.४०, ४ मध्यें युवां मृगेय वारणा मृगण्यवा दोषा वस्तो हविषा नि व्हयामहे असें वर्णन आहें. येथें 'मृगण्यवः याचा अर्थ सायणाचार्यांनी (मृगभक्षक) शार्दूल असा केला आहे. परंतु ग्रिफिथनें सरळ शिकारी म्हणजे मृगया करणारे असा अर्थ केला आहे. यावरून त्या वेळी शिकार करणें भारतीय लोकांस ठाऊक होतें असें दिसते.
परंतु शिकार करणें या गोष्टीला मनुष्याच्या आयुष्याचा प्रधान भाग समजत नसत. व शेतकी हा प्रधान धंदा मानून शिकार हें त्याचें गौण अंग समजलें जात असे. शिकार करून मिळालेलें मांस वगैरे देवादिकांनां देत नसत व खाल्लें तरी अडचणींच्याच प्रसंगी खात असें श्राडर म्हणतों (प्रीहिस्टॉरिक अँटिक्विटिज पृ.२५); पण त्याला भक्कम पुरावा नाही.
पक्षी - इंडोजर्मनिक लोकांनां कोणते पक्षी माहीत होते याचा विचार करतांनां पक्ष्यांच्या नांवांत त्यांच्या ध्वनीचें जें अनुकरण करण्यांत येतें त्यामुळें फार घोटाळा होतो जसे, संस्कृत-उलूक, कोकिला, कृकवाकू, तित्तिरी या पक्ष्यांनां लॅटिन, ग्रीक, आर्मीनियन वगैरे भाषांतून जी नांवें आहेत त्यांतील ध्वनिसादृश्य त्या त्या पक्ष्यांच्या ध्वनींशीं मिळतें. तरी पण श्येन, हंस वगैरे पक्षी आशिया व यूरोप या दोन्ही खंडांत सांपडतात. पक्ष्यांचे आगमन निर्गमन म्हणजे त्यांनी डावीकडून अगर उजवीकडून जाणें यावरून शुभाशुभ शकुन पहाण्याचा प्रघात पूर्वी होता. देवाची इच्छा काय आहे किंवा भवितव्यतेच्या पोटांत काय आहे हें असल्या शकुनांवरून जाणींत. दिवाभीत व कपोत या पक्ष्यांनां अनेक राष्ट्रें अशुभ मानीत. रोमन लोका पुढें त्यांनां शुभ मानूं लागलें असावे असें दिसतें. इंडोजर्मानिक लोकांची ही गोष्ट झाली, वेदांत सुद्धां अशा प्रकारच्या समजुती आढळतात. ॠग्वेदांतील दहाव्या मंडळांतील एकशें पांसष्टाव्या सूक्तांत कपोतास यमाचा दूत म्हटलें आहे.
देवाः- कपोत इपितो यदिच्छन्दूतो निर्ॠत्या इदमाजगाम ।
तस्मा अर्चाम कृणवाम निष्कृतिं शस्न्नो अस्तु द्विपदें शं चतुसदे ।।१।।
हे देवानों, निर्ॠतीचा दूत कपोत प्राप्त झाला (आहे). (त्याला) धनाची इच्छा आहे. त्याची बाधा होऊं नये म्हणून आम्ही पूजा करितो व त्या बाधेचें निरसन करितों. यामुळें आमच्या पुत्रपौत्रांस व गवादि पशूंस कल्याण असो.
शिवः कपोत इषितो नो अस्त्वनागा देवाः शकुनो ग्रहेषु
हे देवांनों आमच्या घरी आलेला कपोत पक्षी सुखकर. अषापहेतु असो.
मानो हिंसीदिह देवाः कपोतः।३।
हे देवांनों या ठिकाणी कपोत आम्हांस बाधक न होवो.
यस्य दूतः प्रहित एप उतत्तस्मै यमाय नमो
अस्तु मृत्यवे।४।
ज्यांचा दूत येथें आला आहे त्या यमास-मृत्यूदेवतेस नमस्कार असों.
पक्ष्यांशीं परिचय त्या अतिप्राचीनांस होता असें दाखविण्यासाठीं आणि पक्षिमूलक कांहीं आचार अगर कल्पना प्राचीनांत प्रचलित असल्यास त्यांवर ऐतिहासिक प्रकाश पाडण्यासाठीं कांही वाद उत्पन्न झाले आहेत. त्या वादांत एक प्रश्न असा उत्पन्न झाला आहे की, पक्षिगमन शुभशकुनकारक होतें तें पक्षी ज्या दिशेनें जातो त्यावरून होतें की ज्या हाताकडून जातो त्यावरून होतें? या वादांत पुराणकथांचा अभ्यास करून त्यावरून इतिहास काढण्याचे परिश्रम करणारा प्रसिद्ध जर्मन पंडित याकोब ग्रिम (१७८५-१८६३) याचें मत श्राडर यानें देऊन तें खोडण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांच्या मतांत भेद बराच सूक्ष्म आहे. दिशांच्या शुभाशुभत्वावरून हातांचें शुभाशुभत्व निष्पन्न झालें आहे आणि नंतर हातावरून पक्ष्यांच्या गमनागमनाचे शकुन ठरले आहेत असें ग्रिमचें मत आहे असें श्राडर प्रतिपादितो आणि आपला अभिप्रायभेद दाखवितो तो असा कीं, हातांचे वामदक्षिणत्व हें गुणमूलक आणि त्यामुळेंच शकुनोत्पादक आहे. दक्षिण दिशा वाईट आहे अशी प्राचीन समजूत होती असें ग्रिम म्हणतो आणि श्राडर त्याच्याविरुद्ध खालील प्रमाणें आणतो.
अवकल्द दक्षिणतो ग्रहणां सुमंगलो भद्दवादी शकुन्ते ऋ. २.४२,३
हे कपिंजल, तूं सुमंगल आणि कल्याणवादी असा घराच्या दक्षिण दिशेला ओरड.
प्रदक्षिणिदभि ग्रणांत कारवो वयो वदंत ॠतुथा शकुंतयः.
ॠ २. ४३.१
कपिंजल पक्षी हेच स्तोते योग्य काळीं शुभं सुचवून दक्षिण दिशेला गात असतात.
''इंडोजर्मानिक भाषांमधून उजवा याला जो शब्द आहे त्याचा धात्वर्थ सर्व ठिकाणीं 'कुशल' असा सांपडतो. संस्कृत-दक्षिण, झेद-दाशिन्, लॅटिन-डेक्टेर. शुभ शकुन उजवीकडून येत असें मानण्याचें कारण दक्षिण म्हणजे कुशल हा अर्थ आहे. उजवा किंवा डावा याचा पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर यांच्याशीं कांहीं संबंध नाहीं असें श्राडरचें मत आहे. श्राडरचें मत आम्हांस ग्राह्य दिसते. दक्षिण आणि वाम हे शब्द शकुनमूलक नसून हातांचे गुणनिदर्शक आहेत, त्या अर्थी त्यांस आलेला अर्थ शकुनमूलक आहे असें धरण्याचे कांहीं कारण नाहीं. उलटपक्षीं शकुनच हस्तगुणमूलक असण्याचा संभव आहे.
ग्राम्य पशू - गाई मनुष्याला मुकाट्यानें दूध काढूं देतात, घोडे मुकाट्यानें लगाम घालूं देतात, मेंढरें कुत्र्याबरोबर नीट शिस्तीनें जातात, या व अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी मनुष्याच्या इतक्या अंगवळणीं पडल्या आहेत कीं, त्यांत अस्वाभाविक कांही असेल अशी शंका सुद्धां मनाला शिवत नाहीं. परंतु हें सारें जनावरें माणसाळवून टाकण्याचें फळ आहे आणि जनावरें माणसाळवण्यास सुरुवात केव्हां झाली याची आठवणहि मनुष्याला नाहीं इतका हा प्रकार जुना आहे. पशूंचे गृह्यीकरण म्हणजे माणसाळवणें सिद्ध होत असतां होत असलेल्या प्रयत्नांच्या परंपरेचा इतिहास लिहावयास आपणांस इंडोजर्मानिक काळाच्या पूर्वीच्या काळांत गेलें पाहिजे. गृह्यीकरणांतर्गतचा बोध करून घेण्यास या मूलग्रहविषयक संशोधनाचा उपयोग होत नाही. कळप राखणें, पाशांत पकडणें या जर गृह्यीकरण सिद्ध होण्यापूर्वीच्या क्रिया असतील तर त्यांचे मात्र शब्दाअवशेष सांपडतात. इंडोयूरोपीय लोक सुद्धां जनावरांचे कळप पाळीत ही गोष्ट संस्कृत-शर्ध, गॉथिक-हेर्ड, इंग्लिश-हर्ड्स या तुल्य शब्दावरून स्पष्ट होतें. पशूं माणसाळविण्यास सुरुवात झाली असावी असें पशु शब्दाच्या पाश (पाशयामि) या शब्दाशीं असलेल्या साद्दश्यावरून वाटतें. निरुक्तामध्यें पशु शब्दाची व्यत्पत्ति दिलेली नाही.
घोड्याविषयी श्राडर म्हणतो - घोडा या प्राण्याचे बोधक निरनिराळ्या भाषांतील शब्द तुल्य दिसतात. संस्कृत-अश्व, झेंद-अस्प, ग्रीक-इत्तोंस, लॅटिन-एक्कस, लिथुअॅनियन-अस्झव. यावरून हा प्राणी इंडोयूरोपीय लोकांस निःसंशय माहीत असून तो त्यांच्या पाळीव प्राण्यांत होता असें वाटतें. परंतु घोड्यावर बसणें या अर्थीं ग्रीक, झेंद इ. भाषांतील शब्द विसद्दश असून ते बरेच नंतरचे असावेत असा तर्क आहे. ॠग्वेदामध्यें लगाम (अभीशवः), खोगीर (सदः) इत्यादि शब्दांचे वाचक शब्द असून घोड्यावर बसण्याची कल्पनाहि आढळतें.
क्व.१. वाश्वा क्वा.३ भीशवः कर्थ शेक कथ यय पृष्ठे सदो सनोर्यमः जबने चोदएपाम्
ॠग्वेद ५.६१, २-३
परंतु घोड्यास कधीहि बैलाप्रमाणें खटारे अगर नांगर वगैरे ओढण्याच्या जड कामास लावलेले आढळत नाही. तर त्याचा रथ किंवा इतर हलकीं वाहनें ओढण्याच्या कामींच भारतीय आर्यांनी उपयोग केलेला आढळतो. अनेक पाश्चात्य पंडितांच्या हीच एक गोष्ट लक्षांत भरते व ही गोष्ट निर्देश करण्यासारखीं वाटतें. आपणांस त्यांत विशिष्टता वाटणार नाहीं.
होमरमध्येंहि रथांच्या घोड्यांविषयी वाटेल तितका पुरावा आहे. पण ओझी वाहणाऱ्या घोड्याचा उल्लेख नाहीं असें श्राडर दाखवितो. होमरच्या काळांत खेंचर हाच मुख्यतः ओझीं वाहणारा प्राणी होता. खेंचराची पैदास गाढव व घोडीं यांच्यापासून करण्याची कल्पना प्रथम मीसियन लोकांनीं काढली असें अनाकिऑन (फ्र. ३४ बर्गक) म्हणतो. होमरच्या काळांतील कवींच्या उल्लेखांवरून खेंचर हा प्राणी पॅफ्लागोनिया, एनेटि या प्रांतांत आढळत असे व त्याचें तेंच मूलस्थान असावेसे दिसतें. ॠग्वेदांमध्यें खेंचर या प्राण्याचा वाचक शब्द आढळत नाहीं. तो नंतरच्या संस्कृत भाषेंत (पंचतंत्रांत) अश्वतर असा सांपडतो. पण अमरकोशांत हा शब्द नाही.
इंडोजर्मानिक लोकांची जी शाखा यूरोपकडे गेली तीतील लोकांनां उंट प्राणी माहीत नव्हता व इराणी युद्धाच्या वेळेस हा प्राणी ग्रीक लोकांस माहीत झाला असें श्राडर म्हणतो.
पर्शुभरतीय लोकांमध्ये मात्र फार प्राचीन काळी खर व उष्ट्र हे प्राणी आढळतात. अश्विनौ यांचा रथ रासभ ओढतात असे ॠग्वेदांत वर्णन आहे (ॠग्वेद १.३४.९, ८.७४,७). परंतु उष्ट्र या शब्दानें वेदामध्यें रानम्हैस असा पशु निर्दिष्ट केला आहे असें श्राडर म्हणतो. परंतु हा शब्द ॠग्वेदामध्यें ५ ठिकाणी आला आहे व त्यांपैकीं एकहि ठिकाणी त्याचें वर्णन केलेले आढळत नाही. त्याचा भार वहाण्याचा गुण मात्र तुलनेकरितां घेतलेला आहे (ॠग्वेद १.१३८, २; ८.५, ३७; ६,४८; ४६, २२; ३१). श्राडरने उष्ट्र या शब्दाचा अर्थ उंट नसून रानम्हैस असा होतो हें कशावरून म्हटले तें कळत नाही.
आतांत होमरमध्यें गर्दभाचा उल्लेख फक्त एकदां आलेला आहे (इलि.११.५५८). ग्रीक आणि लॅटिन भाषांतील गर्दभवाचक शब्दांची व्युत्पत्ति अद्यापि नीट लागलेली नाही. व त्या शब्दांचे व पर्शुभारतीय तद्वाचक शब्दांचे साम्य आढळत नाहीं. यावरून पाश्चात्य पंडित असें अनुमान काढितात, कीं ज्या अर्थी घोडा हा प्राणी इंडोयूरोपीय पशूंत आढळतो आणि रासभ व उष्ट्र हे आढळत नाहींत त्या अर्थी या गोष्टीवरून इंडोयूरोपीय लोकांचे मूलस्थान निश्चित होण्यास बरीच मदत होईल. घोडा हा प्राणी मध्यआशियांतील वाळवंटांतून व कुराणांतून चोहोंकडे पसरला असावा. परंतु पाश्चात्यांच्या दृष्टीने व सृष्टिशास्त्रज्ञांच्या मतानें घोड्याच्या प्रसाराचे क्षेत्र यापेक्षा मोठें असावयास पाहिजे व तो प्राणी यूरोपमध्यें सांपडावयास पाहिजे. उलटपक्षी गाढव व उंट या प्राण्यांचे मूलस्थान मध्यआशियांतील सेमेटिक अरण्यांत होतें अशी एक कल्पना आहे. यावरून ज्या प्रदेशांत घोडा आढळत असे परंतु गाढव व उंट हीं जनावरें माहीत नव्हतीं अशा प्रदेशांत म्हणजे यूरोपखंडाच्या पूर्वभागांत किंवा आशियाखंडाच्या उत्तरेकडच्या भागांत इंडोयूरोपीय लोकांचें मूल वसतिस्थन असावें असा बऱ्याच पाश्चात्य पंडितांचा तर्क आहे. लो.बाळ गंगाधर टिळक यांचें पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्वीचें मत आपण कितपत ग्राह्य धरावें याविषयीं संशय आहे. टिळक यांच्या विचारांचें खंडन करणारी तथापि विचारांत घेण्याइतक्या किंमतीची कोणतीहि टीका आमच्या पाहाण्यांत नाहीं. आणि यासाठी पाश्चात्य पंडितांची एतद्विषयक मनःस्थिति काय आहे हें कळत नाही.
चतुष्पाद जनावरापैकी मांजर हा प्राणी यूरोपमध्यें अगदीं अलीकडील दिसतो. मार्जार अथवा तद्वाचक शब्द ॠग्वेदांत नाहीं व इतर वेदांतहि आढळत नाहीं. श्राडर यानें या ठिकाणीं असें विधान केलें आहे कीं मांजराचा उपयोग उंदीर पकडण्याकडे होतो ही गोष्ट भारतीयांनां ठाऊक नसावीसें दिसतें. कारण पाणिनीनें ज्या प्राण्यांमध्यें निसर्गतःच वैर आहे अशा प्राण्यांच्या नांवांचे समास करण्याबद्दल एक नियम दिला आहे त्यांत कुत्रा व मांजर किंवा मांजर व उंदीर यांचीं उदाहरणें नाहींत. परंतु पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्यें केवळ 'येषां च विरोधः शाश्वतिक' एवढेंच सूत्र आहे; त्यांत अर्थात् उदाहरणें कोणतींच दिलीं नाहींत. तेव्हा कुत्रा व मांजर किंवा मांजर व उंदीर यांचें उदाहरण नाहीं यांत विशेष कांहींच नाहीं. मांजराच्या पाणिनीयकालीन अस्तित्वाविषयी खात्रीचें विधान करतां येत नाही. पक्ष्यांसंबंधी वर जी थोडी माहिती दिली आहे तीवरून इंडोयूरोपीय लोकांत पक्षी माणसाळवण्याचा फारसा प्रघातहोतासें दिसत नाही. कारण या गोष्टीस वसाहत स्थाइक लागते व मूळच्या शेतकऱ्यांस पक्षिविषयक लालनविकार नसून पक्ष्यांपासून पिकांस त्रास होण्याची भीति वाटत असावी. इंडोजर्मानिक लोकांचा इतिहास ज्या कालापासून माहीत आहे त्या कालीं पक्ष्यांचें संवर्धन करण्याची कला फारच बाल्यावस्थेत होती असें दिसतें. ॠग्वेदामध्यें हंस याचा उल्लेख आहे (ॠ ८.३५,८), पण त्यास श्येन व दारिद्रय यांच्याच पंक्तीस बसविलें आहे. कपोताबद्दल मजकूर वर दिलाच आहे.