प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.

देशांतील राजकीय बल वाढलें पाहिजे हा आपल्या इतिकर्तव्यतेचा एक मोठा भाग होय हें वर सांगितलेंच आहे. देशांतील राजकीय बल जसें वाढवावयाचें तसें हिंदुसमाजाचेंहि बल वाढलें पाहिजे. तें वाढेल तरच हिंदूंत आपण मिळून जावें ही इच्छा इतरांत संभवेल व राष्ट्र तयार करण्याची इच्छा तृप्त करणें शक्य होईल. आतां हें बल वाढवावयाचें कसें या प्रश्नाकडे वळूं.

हिंदुसामाजांतील एक मोठा दोष म्हटला म्हणजे सर्व समाजाला एकत्र जोडणार्‍या शासनसंस्थेचा अभाव हा होय. आपल्या देशांत ज्या राजकीय चळवळी होत आहेत त्यांनीं हें कार्य पूर्णपणें साध्य होण्यासारखें नाहीं. सर्व हिंदी जनतेची पदवी वाढावी हा काँग्रेससारख्या संस्थांचा हेतु आहे. काँग्रेससारखी संस्था बलवान् होऊन हिंदी या तत्त्वावर निराळें आचारशास्त्र उत्पन्न करील तर हिंदु हा समाज नाहींसा होऊन हिंदी हा समाज वाढेल.

तसेंच, हिंदुसमाज एकसूत्रबद्ध होऊन कार्यकर्ता झाला तर तो अधिक व्यापक होईल व त्याच्या संस्कृतीचें हिंदु स्वरूप कायम राहून तो राष्ट्रस्वरूपी संघाचा साधक होईल.

या दोन क्रियांमध्यें कोणती क्रिया अधिक त्वरेनें कार्य करूं शकेल किंवा अधिक खोल कार्य करूं शकेल हें कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे.

हिंदुसमाजाचें संवर्धन करून त्यांतून राष्ट्रधर्म तयार करावयाचा या दृष्टीनें जर कार्य करावयाचें असेल तर जी कार्यपद्धति आचारावी लागेल ती येणेंप्रमाणें-

हिंदुसमाज बलवान् करावयाचें म्हणजे दोन गोष्टी करावयाच्या. एक, समाजांतली व्यक्ती जास्त सुसंपन्न होतील अशी खटपट करावयाची आणि दुसरी गोष्ट करावयाची ती ही कीं, निरनिराळ्या व्यक्तींचा संबंध ज्या योजनेनें एकंदर हिंदुसमाजास फायदेशीर होईल अशी योजना करावयाची. व्यक्तीचें महत्त्व वाढविण्यासाठीं शिक्षणादिक उपाय जे समाजास केले पाहिजेत ते सर्व या खटपटीमध्यें मोडतात. सामाजिक अंतर्घटना काय करावी यासंबंधानें आज कोणताहि प्रयत्‍न जरी सुरू केला तरी तो व्यर्थ जाईल अशी खास शंका वाटते. कां कीं कोणताहि विचार अंमलांत आणण्यास जें शिक्षण लोकांस दिलें पाहिजे तें द्यावयास फुरसत कोणास आहे? कोणत्याहि विचाराचा प्रसार निरक्षर जनतेंत करावयास किती अडचणी उत्पन्न होतात आणि यासंबंधानें प्रयत्‍न केल्यास उद्दिष्टाशीं विसदृश फल कसें प्राप्त होतें हें दिसतच आहे. जेव्हां सामान्य लोकांस लिहिलेलें वाचून सरळ वाक्यांचा अर्थ समजण्याइतकी व थोडासा विचार करण्याइतकी शक्ति आली असेल तेव्हांच कोणत्याहि सामाजिक प्रयत्‍नांत यश येणार. समाजांत सुधारणा करण्यापूर्वीं समाजाला उद्दिष्ट लागतें. समाजांतील अंतर्गत स्थिति अगर घटना समाजध्येयाचें करण होय. साध्य स्पष्ट असेल तर यंत्र कसें बनवावें हें स्पष्ट होईल. असें दिसून येतें कीं केवळ अंतर्घटनेंत फेरफार करण्याकरितां जे प्रयत्‍न झाले ते सर्व अप्रिय आणि अयशस्वी ठरले. उलट जेव्हां समाजास कांहीं विशिष्ट कार्य करावें असें वाटलें तेव्हां तो कृतीमध्यें उपदेशकांच्या पुढें गेला. अर्थात् अंतर्घटनेची सुधारणा करण्यापेक्षां समाजाची महत्त्वाकांक्षा अधिकाधिक व्यापक करण्याचा प्रयत्‍न अधिक उपयुक्त होईल आणि हि महत्त्वाकांक्षा पार पाडण्यासाठीं जर खटपट होऊं लागेल, तर समाजांत फरक कोणते करावें हें सांगणें अनवश्यक आहे. जातींतील पंचांस अधिकार कमी असावे अगर जास्त असावे, शंकराचार्यांसारख्या अधिकार्‍यांस मान्यता द्यावी अगर देऊं नये या दोन ऐच्छिक कार्यक्रमांपैकीं कोणत्या कार्यक्रमानें समाजाचें बल वाढेल इत्यादि विचार सर्व समाज जोंपर्यंत निरक्षर आहे तोंपर्यंत फोल आहे. जोपर्यंत सर्वसामान्य जनसमूह अज्ञान आहे तोंपर्यंत शंकराचार्यांसारख्या संस्था जिवंत राहिल्या काय किंवा मेल्या काय सारख्याच. सामान्य जनांवर त्यांचें वजन कांहींच नाहीं, सुशिक्षित वर्ग शोभेकरितां त्यांनां मान देतो, जो वर्ग त्यांच्या तंत्रानें वागण्याचा प्रयत्‍न करितो त्या वर्गास या प्रकारच्या संस्था पीडादायक होतात. ओरिसामध्यें मोठमोठ्या जमिनींचे मालक जे महंत आहेत ते आपल्या ताब्यांत असलेल्या लोखों रुपयांची आणि कित्येक सहस्त्र रूपये वार्षिक उत्पन्नाची काय बरें विल्हेवाट लावितात? तिरुपतीच्या महंतासारख्यांचे खेळ कोर्टांत, वर्तमानपत्रांत, गांवांतील वारयोषितांच्या वस्तींतील रस्त्यांत वर्णिले गेल्यामुळें सर्वविश्रुत झाले आहेत. जनता जर अज्ञानी आहे तर तिच्यावर ज्या वर्गास अधिकार गाजविण्याची संधि आहे अशा वर्गानें आपला तळीराम गार करण्याची संधि कां घालवावी? सामान्यतः थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे हिंदूंनां प्रथमतः आपल्या सामुच्चयिक उत्कर्षाची इच्छा पाहिजे आणि ती इच्छा कृतींत आणण्याकरितां संस्था व योजना तयार करण्याचें प्रत्येक प्रांतांत व जिल्ह्यांत त्यांनीं अंगावर घेतलें पाहिजे. हिंदुसमाजबलवर्धनाच्या दृष्टीनें करावयाचीं कार्यें कशीं करतां येतील आणि तत्संबद्ध साध्य जें एकराष्ट्रीयत्व तें कसें सिद्ध होईल याविषयींची विचारमालिका खालीं देत आहों.