प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ४ थें.
हिंदुसमाजबलवर्धन.
देशांतील राजकीय बल वाढलें पाहिजे हा आपल्या इतिकर्तव्यतेचा एक मोठा भाग होय हें वर सांगितलेंच आहे. देशांतील राजकीय बल जसें वाढवावयाचें तसें हिंदुसमाजाचेंहि बल वाढलें पाहिजे. तें वाढेल तरच हिंदूंत आपण मिळून जावें ही इच्छा इतरांत संभवेल व राष्ट्र तयार करण्याची इच्छा तृप्त करणें शक्य होईल. आतां हें बल वाढवावयाचें कसें या प्रश्नाकडे वळूं.
हिंदुसामाजांतील एक मोठा दोष म्हटला म्हणजे सर्व समाजाला एकत्र जोडणार्या शासनसंस्थेचा अभाव हा होय. आपल्या देशांत ज्या राजकीय चळवळी होत आहेत त्यांनीं हें कार्य पूर्णपणें साध्य होण्यासारखें नाहीं. सर्व हिंदी जनतेची पदवी वाढावी हा काँग्रेससारख्या संस्थांचा हेतु आहे. काँग्रेससारखी संस्था बलवान् होऊन हिंदी या तत्त्वावर निराळें आचारशास्त्र उत्पन्न करील तर हिंदु हा समाज नाहींसा होऊन हिंदी हा समाज वाढेल.
तसेंच, हिंदुसमाज एकसूत्रबद्ध होऊन कार्यकर्ता झाला तर तो अधिक व्यापक होईल व त्याच्या संस्कृतीचें हिंदु स्वरूप कायम राहून तो राष्ट्रस्वरूपी संघाचा साधक होईल.
या दोन क्रियांमध्यें कोणती क्रिया अधिक त्वरेनें कार्य करूं शकेल किंवा अधिक खोल कार्य करूं शकेल हें कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे.
हिंदुसमाजाचें संवर्धन करून त्यांतून राष्ट्रधर्म तयार करावयाचा या दृष्टीनें जर कार्य करावयाचें असेल तर जी कार्यपद्धति आचारावी लागेल ती येणेंप्रमाणें-
हिंदुसमाज बलवान् करावयाचें म्हणजे दोन गोष्टी करावयाच्या. एक, समाजांतली व्यक्ती जास्त सुसंपन्न होतील अशी खटपट करावयाची आणि दुसरी गोष्ट करावयाची ती ही कीं, निरनिराळ्या व्यक्तींचा संबंध ज्या योजनेनें एकंदर हिंदुसमाजास फायदेशीर होईल अशी योजना करावयाची. व्यक्तीचें महत्त्व वाढविण्यासाठीं शिक्षणादिक उपाय जे समाजास केले पाहिजेत ते सर्व या खटपटीमध्यें मोडतात. सामाजिक अंतर्घटना काय करावी यासंबंधानें आज कोणताहि प्रयत्न जरी सुरू केला तरी तो व्यर्थ जाईल अशी खास शंका वाटते. कां कीं कोणताहि विचार अंमलांत आणण्यास जें शिक्षण लोकांस दिलें पाहिजे तें द्यावयास फुरसत कोणास आहे? कोणत्याहि विचाराचा प्रसार निरक्षर जनतेंत करावयास किती अडचणी उत्पन्न होतात आणि यासंबंधानें प्रयत्न केल्यास उद्दिष्टाशीं विसदृश फल कसें प्राप्त होतें हें दिसतच आहे. जेव्हां सामान्य लोकांस लिहिलेलें वाचून सरळ वाक्यांचा अर्थ समजण्याइतकी व थोडासा विचार करण्याइतकी शक्ति आली असेल तेव्हांच कोणत्याहि सामाजिक प्रयत्नांत यश येणार. समाजांत सुधारणा करण्यापूर्वीं समाजाला उद्दिष्ट लागतें. समाजांतील अंतर्गत स्थिति अगर घटना समाजध्येयाचें करण होय. साध्य स्पष्ट असेल तर यंत्र कसें बनवावें हें स्पष्ट होईल. असें दिसून येतें कीं केवळ अंतर्घटनेंत फेरफार करण्याकरितां जे प्रयत्न झाले ते सर्व अप्रिय आणि अयशस्वी ठरले. उलट जेव्हां समाजास कांहीं विशिष्ट कार्य करावें असें वाटलें तेव्हां तो कृतीमध्यें उपदेशकांच्या पुढें गेला. अर्थात् अंतर्घटनेची सुधारणा करण्यापेक्षां समाजाची महत्त्वाकांक्षा अधिकाधिक व्यापक करण्याचा प्रयत्न अधिक उपयुक्त होईल आणि हि महत्त्वाकांक्षा पार पाडण्यासाठीं जर खटपट होऊं लागेल, तर समाजांत फरक कोणते करावें हें सांगणें अनवश्यक आहे. जातींतील पंचांस अधिकार कमी असावे अगर जास्त असावे, शंकराचार्यांसारख्या अधिकार्यांस मान्यता द्यावी अगर देऊं नये या दोन ऐच्छिक कार्यक्रमांपैकीं कोणत्या कार्यक्रमानें समाजाचें बल वाढेल इत्यादि विचार सर्व समाज जोंपर्यंत निरक्षर आहे तोंपर्यंत फोल आहे. जोपर्यंत सर्वसामान्य जनसमूह अज्ञान आहे तोंपर्यंत शंकराचार्यांसारख्या संस्था जिवंत राहिल्या काय किंवा मेल्या काय सारख्याच. सामान्य जनांवर त्यांचें वजन कांहींच नाहीं, सुशिक्षित वर्ग शोभेकरितां त्यांनां मान देतो, जो वर्ग त्यांच्या तंत्रानें वागण्याचा प्रयत्न करितो त्या वर्गास या प्रकारच्या संस्था पीडादायक होतात. ओरिसामध्यें मोठमोठ्या जमिनींचे मालक जे महंत आहेत ते आपल्या ताब्यांत असलेल्या लोखों रुपयांची आणि कित्येक सहस्त्र रूपये वार्षिक उत्पन्नाची काय बरें विल्हेवाट लावितात? तिरुपतीच्या महंतासारख्यांचे खेळ कोर्टांत, वर्तमानपत्रांत, गांवांतील वारयोषितांच्या वस्तींतील रस्त्यांत वर्णिले गेल्यामुळें सर्वविश्रुत झाले आहेत. जनता जर अज्ञानी आहे तर तिच्यावर ज्या वर्गास अधिकार गाजविण्याची संधि आहे अशा वर्गानें आपला तळीराम गार करण्याची संधि कां घालवावी? सामान्यतः थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे हिंदूंनां प्रथमतः आपल्या सामुच्चयिक उत्कर्षाची इच्छा पाहिजे आणि ती इच्छा कृतींत आणण्याकरितां संस्था व योजना तयार करण्याचें प्रत्येक प्रांतांत व जिल्ह्यांत त्यांनीं अंगावर घेतलें पाहिजे. हिंदुसमाजबलवर्धनाच्या दृष्टीनें करावयाचीं कार्यें कशीं करतां येतील आणि तत्संबद्ध साध्य जें एकराष्ट्रीयत्व तें कसें सिद्ध होईल याविषयींची विचारमालिका खालीं देत आहों.
१. हिंदुस्थान हें राष्ट्र होणें इष्ट आहे एवढेंच केवळ नाहीं, तर तें अपरिहार्य आहे. लोकांचा निश्चय असला आणि ज्या तत्त्वांवर आणि ज्या पद्धतीनें कार्य करावयाचें तीं तत्त्वें आणि ती पद्धती हीं निर्दोष असलीं तर हिंदुस्थानचें राष्ट्रीभवन शीघ्र होईल. परंतु कार्यतत्त्वें आणि कार्यपद्धति हीं जर सदोष असतील तर किंवा लोक निरिच्छ राहतील तर राष्ट्रीभवनाच्या कार्याला तात्पुरता विलंब होईल.
२. सादृश्य आणि सहानुभूति यांचा अन्योन्याश्रय आहे. ज्या मानानें लोकांमध्यें सादृश्य अधिक त्या मानानें त्यांजमध्यें सहानुभूति (ऐक्यभाव) अधिक. लोकांमध्यें ऐक्यभाव वृद्धिंगत करण्यासाठीं त्यांच्यामध्यें सादृश्यवर्धन करणें अवश्य आहे.
३. सादृश्य हें सहवासजन्य आहे. निरनिराळ्या लोकांचा एकमेकांशीं निकट संबंध झाला असतां जे लोक अधिक बलवान् असतील त्यांचें कमी बलवानांकडून अनुकरण झाल्यानें सादृश्य उत्पन्न होतें.
४. सादृश्य हें केवळ तडजोडीनें उत्पन्न होत नाहीं. तें दंडमूल आहे. देवघेवीच्या तत्त्वानेंच केवळ सादृश्य उत्पन्न होत नाहीं. देवघेवीच्या तत्त्वावर एखादी नवीन आचारपद्धति उत्पन्न होईल; तथापि त्या पद्धतीचा प्रसार आणि त्या प्रसारामुळें उत्पन्न होणारें समाजसादृश्य देखील ती पद्धति अंगिकारणार्या लोकांच्या शक्तीवर अवलंबून आहे. बलवानांची आचारपद्धति दुर्बलांच्या आचारपद्धतीवर परिणाम घडविते आणि तेणेंकरून समाजांत सादृश्य उत्पन्न होतें असा इतिहासचा अनुभव आहे.
५. राष्ट्रीकरण म्हणजे हिंदुस्थानांत सध्यां ज्या तीन हजार जाती आहेत त्या मोडून टाकून त्यांची एक जात होणें होय. निरनिराळ्या जातींत आणि लोकांत भेदभाव अनेक प्रकारचा आहे. भेद ज्या प्रमाणानें नष्ट होतील त्या प्रमाणानें एकजातित्व वृद्धिंगत होईल. सर्वच भेद पूर्णांशानें नष्ट होणें शक्य नाहीं. तथापि राष्ट्रीभवन साध्य होण्यास सर्व लोकांचें ऐक्य साधण्यापुरतें सादृश्य उत्पन्न झालें पाहिजे.
६. समाजाचे अनेक घटकावयव एकमेकांशीं संलग्न होऊन लोकांचें एकीकरण होणें शक्य नसेल तर ते सर्व एखाद्या समाजकेंद्राशीं संलग्न होतील अशी तजवीज करून समाजाचें एकीकरण करावें लागते. ऐक्य समाजकेंद्रामुळें उत्पन्न होतें. समाजशासनविषयक उच्च हेतु अगर ध्येय प्राप्त करून घेण्यासाठीं समाजाचे अनेक घटक अशा तर्हेनें रचले पाहिजेत आणि सुसंघटित केले पाहिजेत कीं आपल्या राष्ट्रास आपलें भवितव्य हातीं राखतां येईल.
७. आमची सामाजिक आणि राजकीय घटना अत्यंत दुर्बल आहे. कोणत्याहि समाजास जगांत यशःप्राप्ति होण्यासाठीं सरकार आणि लोक यांचें ऐक्य नसलें तरी निदान त्यांची सामाजिक, विचारविषयक आणि बुद्धिविषयक एकरूपता झाली असली पाहिजे. ही एकरूपता येथें उत्पन्न व्हावी यासाठीं शासनतंत्राच्या ठायीं भारतीयपणा आणला पाहिजे.
८. एकरूपता प्रस्थापित करण्यासाठीं खालील सुधारणात्रयी अनुक्रमानें घडवून आणली पाहिजे.
(अ) हिंदुस्थानचे राजकीय विभाग भाषेच्या तत्त्वानुसार घडवून आणले पाहिजेत.
(आ) या निरनिराळ्या विभागांची राज्यव्यवस्था त्या त्या प्रांतांतील देशी भाषांच्या द्वारें चालविली पाहिजे.
(इ) भाषानुसार पाडलेल्या या नवीन प्रांतांस प्रत्येकीं निदान एकतरी विद्यापीठ असले पाहिजे आणि त्यांतून सर्व शिक्षण त्या त्या प्रांतांतील देशी भाषेच्या द्वारेंच दिलें पाहिजे.
९. या सुधारणा झाल्या असतां प्रत्येक प्रांतांत समाजशासक शिष्टवर्ग अस्तित्वांत येईल आणि तो बलवान् होऊन ऐक्य घडवून आणील.
१०. समाजांत ऐक्य आणण्यासाठीं उच्च संस्कृतीचा लोकमान्य शिष्टवर्ग असणें अवश्य असतें. मग प्रश्न एवढाच उरतो कीं, हा उच्चवर्ग स्वदेशीय असावा कीं परका असावा.
११. समाजांतील उच्च शिष्टवर्ग असा असला पाहिजे कीं, तो आपल्या बौद्धिक सामर्थ्यानें समाजांत सुधारणा घडवून आणील. यासाठीं हा उच्चवर्ग रक्तानें स्वदेशीय असून स्वदेशीय संस्कृतीचा प्रतिनिधि असला पाहिजे असाच वर्ग समाजांत चिरकाल जनमान्य होऊं शकतो. दंडधारित्वामुळें उर्फ दडपेशाहीमुळें परक्या जातीस अगर संस्कृतीस जनमान्यता आलीच तर ती तात्पुरती येईल.
१२. समाजाचें अगर राष्ट्राचें भवितव्य ठरविण्याचें काम अशा वर्गाकडे अगर जातीकडे सोंपविलें पाहिजे कीं, तो वर्ग अगर ती जात स्वतः बलवान् असून आपलें वजन, निदानपक्षीं अस्तित्व, कोणत्याहि परिस्थितींत कायम राखूं शकेल आणि समाजसंस्काराचें काम अप्रतिहतपणें चालवूं शकेल.
१३. समाजांत फेरफार घडवून आणण्यासाठीं कार्यकर्त्या लोकयंत्राची आवश्यकता आहे. ब्राह्मण जर इतर जातींप्रमाणें स्वयंशासित जात बनतील तर त्यांस स्वाचारनिर्णय करतां येईल एवढेंच नाहीं, तर इतर जातींचा आचारनिर्णय देखील त्यांच्याकडून होईल. कां कीं, अनुकरणाची इच्छा (ईर्ष्या) समाजांत सदैव जागृत राहील.
१४. ज्या अर्थीं ईर्ष्या आणि श्रेष्ठांचें अनुकरण हे भाव प्रत्येक निरोगी समाजांत जागृत असतात त्या अर्थीं समाजांतील उच्च वर्णानें आपलें आचरण असें ठेविलें पाहिजे कीं, तेणेंकरून समाज अनिष्ट मार्गानें जाणार नाहीं.
१५. हिंदु समाजाचे कार्यकर्ते लोक ब्राह्मणच आहेत. आंग्लबुद्धी बनलेल्या उर्फ “सुशिक्षित” हिंदी लोकांचा वर्ग समाजांत फेरफार घडवून आणण्यास सर्वस्वीं असमर्थ आहे. विशिष्ट वर्ग समाजांत फेरफार करण्यास समर्थ व्हावयास त्या वर्गाच्या हातीं कांहीं तरी स्वयंसिद्ध सत्ता असली पाहिजे; आणि त्या वर्गाच्या ठायीं एकत्वभावना, एकजातित्व, स्वयंशासनाची व आत्मीयकरणाच्या नियमनाची शक्ति हीं पाहिजेत. “सुशिक्षित हिंदी” लोकांमध्यें यापैकीं कांहींहि नाहीं.
१६. आंग्लबुद्धी बनलेल्यांचा वर्ग, एतद्देशीय ख्रिस्ती लोक, आणि ब्रह्मसमाजासारखे संप्रदाय हे सर्व लोकसमूह पाखंडी आहेत. या पाखंडांचीहि थोडीफार उपयुक्तता आहे. परंपरागत संस्कृतीशीं या पाखंडांचें सारूप्य ज्या प्रमाणानें असेल अगर बाह्यांमध्यें किंवा चिनी लोकांसारख्या बाहेर देशच्या लोकांमध्यें हिंदीपणा उत्पन्न करण्यांत त्यांस ज्या प्रमाणानें यश आलें असेल त्या प्रमाणानें त्या पाखंडांची उपयुक्तता कमी अधिक आहे.
१७. सध्यां देशांत विविध संस्कृती परस्परांशीं झुंजत आहेत. या युद्धांत आर्यसंस्कृतीचा विजय जाहला पाहिजे. तो विजय संपादन करण्यास आपली चातुर्वर्ण्यविषयक समाजनीति पूर्ववत् व्यापक रीतीनें प्रस्थापित केली पाहिजे, व समाजघटना पहिल्यापेक्षांहि बलवत्तर केली पाहिजे.
१८. राष्ट्रीकरणासाठीं जो कार्यक्रम ठरवावयाचा तो ठरवितांना हें लक्षांत घेतलें पाहिजे कीं, देशांत कांहीं परिस्थितींत अस्वस्थता व अराजक उत्पन्न होण्याचा संभव असतो. ही गोष्ट लक्षांत घेऊन शिवाय देशांतील विशिष्ट संस्कृतींचें अगर त्यांच्या विशिष्ट अंगांचें बळाबळ आणि क्षराक्षरत्व ओळखिलें पाहिजे; आणि मग कार्यक्रम ठरविला पाहिजे.
१९. हिंदु समाजाचे अत्यंत श्रेष्ठ संस्कर्ते उर्फ सुधारक म्हटले म्हणजे प्राचीनकालीन ब्राह्मण होत. आर्यन्, द्रविडियन्, आणि मंगोलियन् इत्यादि निरनिराळ्या जातींमध्यें एकरूपता सामान्य संस्कृति आणि श्रौतस्मार्तपरंपरा उत्पन्न करून त्यांच्या ठायीं ऐक्यभावना उत्पन्न करण्याचें काम प्राचीन ब्राह्मणांनींच केलें आहे. त्या कामाची पूर्तता करणें हें आजच्या ब्राह्मणांचें काम आहे.
२०. हें काम ब्राह्मणांसच अधिक सोपें आहे. ब्राह्मणांस आपल्या पूर्वजांची कार्यपरंपरा चालविली पाहिजे.
२१. ब्राह्मण हे समाजाचे केंद्र आहेत हें प्राचीन तत्व आहे. ही ब्राह्मणकेंद्रत्वाची कल्पना प्राचीन ब्राह्मणांस सर्व वर्णांच्या स्त्रिया विवाह्य आहेत, क्षत्रियांस तीन वर्णांच्या विवाह्य आहेत इत्यादि नियम सांगून प्राचीन ऋषींनीं व्यक्त केली.
२२. समाजांत कोणता तरी वर्ग उच्च व शिष्ट असावा आणि तो केंद्ररूप असावा असें प्राचीनांनां वाटलें याचें कारण हें कीं, निरनिराळ्या जाती आणि वर्ग एकमेकांशीं लग्न करण्याची आकांक्षा करीत नाहींत, तर उच्च वर्णाशीं विवाहसंबंध जोडण्याची त्यांची इच्छा असते ही गोष्ट प्राचीनांनीं ओळखली होती.
२३. या देशांत समाजाचा केंद्र होणें हें जर ब्राह्मणाखेरीज दुसर्या कोणत्या जातीस शक्य असेल तर ती जात इंग्रजांची होय. त्यांखेरीज दुसर्या कोणासहि समाजकेंद्रत्व शक्य नाहीं.
२४. सिव्हिल् म्यारेजसारख्या साधनांनीं इंग्रज हे धर्मसंस्कारांचे कर्ते बनूं पाहत आहेत, ते ब्राह्मणांचें चातुर्वर्ण्यामधील स्थान लग्नव्यवहारांच्या बाबतीतं पटाकावूं पाहत आहेत. निरनिराळ्या जाती एकमेकांबरोबर लग्नें करीत नाहींत, तथापि इंग्रज व यूरेशियन यांच्याबरोबर सर्व जाती लग्नें करितात अशी आज ज्याप्रमाणें सिंहल देशांत स्थिति आहे, तशी स्थिति जर उद्यां हिंदुस्थानांतहि आली तर इंग्रज हा उच्च वर्ण या नात्यानें हिंदुस्थानचा ब्राह्मण होईल.
२५. हिंदूंच्या धर्मशास्त्राप्रमाणें राष्ट्राचें सर्व प्रकारें शासन होणें जरी आज शक्य नसलें तरी गृह्यन्यायशासन तरी धर्मशास्त्रानुसार झालें पाहिजे. तें देखील आज योग्य रीतीनें होत नाहीं. लोकांच्या प्रगतीला अत्यंत आवश्यक गोष्ट म्हटली म्हणजे जनतेंतील उच्च विचार आणि आचारनियम यांचा परस्परांवर एकसारखा परिणाम होत राहिला पाहिजे. आज ही गोष्ट शक्य नसल्यामुळें धर्मशास्त्राची यथाकाल वाढ व्हावयाची ती बंद जाहली.
२६. तथापि यांहूनहि महत्त्वाची एक गोष्ट म्हटली म्हणजे धर्म आणि तदनुरूप शासन हीं आंग्लबुद्धि बनलेल्या हिंदू कायदेपंडितांनीं बिघडविलीं आहेत. धर्मशासन बिघडण्याचीं मुख्य कारणें येणेंप्रमाणेः-
(अ) समाजघटनेच्या तत्त्वांवर म्हणजे कायद्यावर दत्तविधान, विवाह यांसारख्या इतर बाबतींतील धर्मशासन अवलंबून असते. तथापि इंग्रज हे हिंदूंचे आजचे धर्मनियामक बनले आहेत व त्यांस धर्मशास्त्रांतर्गत हिंदुसमाजघटनेचीं तत्त्वें (उर्फ कायदा) काय आहेत याची कल्पना देखील नाहीं.
(आ) समाजाच्या आचारव्यवहारादींचें नियमन करणारी जी विचारपद्धति असते त्या विचारपद्धतीशीं संलग्न असा अधिकारी वर्ग आणि धर्मनियमन यांची असंगति उत्पन्न होतां कामा नयें. हिंदूंच्या आचारव्यवहारादींचें नियमन करणारी विचारपद्धति म्हणजे त्यांचें धर्मशास्त्र होय. धर्मविधि उर्फ विचारपद्धति घालून देणार्या अधिकारी मंडळांशिवाय इतरांकडून आचारव्यवहारांचें शासन धर्मयुक्त होत नाहीं. जोंपर्यंत शासनतंत्रानें धर्मविशिष्ट अधिकारी मंडळांचा अधिकार मान्य केला नाहीं, तोंपर्यंत शासननियम दुर्बल राहतील. कारण जनतेवर त्या शासननियमांचा नैतिक परिणाम होणार नाहीं.
(इ) प्रत्येक विचारपद्धतीचें स्पष्टीकरण करतांना तें स्पष्टीकरण या विचारपद्धतीस विशिष्ट अशा तर्कशास्त्राच्या साहाय्यानें आणि ती विचारपद्धति ज्या लोकांत उत्पन्न झाली त्या लोकांच्या समजुतींप्रमाणेंच झालें पाहिजे. आज शासनप्रयोगार्थ धर्मनियमांचा अर्थ लावण्याचें काम हिंदूंच्या तर्कशास्त्राच्या आणि समजुतींच्या अनुसार होत नसून इंग्रज समजुतीनें भरलेल्या तर्कशास्त्राच्या (British Common Sense) अनुसार होत आहे.
(ई) धर्मशास्त्र आणि त्यास अनुसरणारे शासननियम हे कल्पवेदांगाच्या इतर अनेक भागांशीं संबद्ध आहेत. त्या कल्पशास्त्राचा अर्थ आयुष्याच्या एकंदर स्वरूपाचा अभ्यास न करतां लावण्याची जी पद्धत समजांत बोकळली आहे तिजमुळें शासननियमांची जनमान्यता कमी कमी होत चालली आहे.
(उ) विदेशी माणसें अगर विदेशी सत्तेचे प्रतिनिधी हिंदू अगर प्रत्यक्ष ब्राह्मण जरी असले तरी त्यांस धर्मनियमांचा अर्थ लावतांना धर्मग्रंथांतील शब्दांचें अगर जुन्या चालींचें फाजील दास्य करावें लागेल. उलट जे धर्मदृष्टीनें अधिकारी पुरुष आहेत त्यांस धर्मनियम सांगतांना बरेंच स्वांतंत्र्य असतें. यामुळें आणि दुसर्या अनेक कारणांमुळें समाजोपयोगी शासनियम उत्पन्न करण्यासाठीं धर्मनियमांचा अर्थ लावणें हें काम जे लोक जातीनें आणि बुद्धीनें विदेशी आहेत त्यांच्याकडून योग्य रीतीनें होणार नाहीं.
(ऊ) जोंपर्यंत न्यायखातें जनतेच्या भाषेंतून न्यायाचें काम करीत नाहीं तोंपर्यंत शासननियमपद्धति दिवसानुदिवस दूषितच होत जाणार. या कारणासाठीं हिंदूंचें धर्मानुसार शासन व्हावयाचें तर स्वतंत्र न्यायासनें निर्माण केलीं पाहिजेत.
२७. ब्राह्मणांच्या जातीची प्रगति व्हावी, आणि त्यांचें धर्मशास्त्रानुसार शासन व्हावें आणि तेंहि स्वायत्त असावें यासाठीं जातिपंचायती निर्माण झाल्या पाहिजेत. प्रत्येक जात हा आपआपल्या सामाजिक बाबींपुरता स्वयंशासक वर्ग आहे हें तत्त्व इंग्रजी शासनपद्धतीनें देखील मान्य केलें आहे.
२८. समाजाचें भवितव्य होईल तितकें करून समाजायत्त करण्यासाठीं लोकयंत्र बनविणें हें कार्य इतर सर्व कार्यांपेक्षां अधिक महत्त्वाचें आहे.
२९. ज्या ज्या जातींस पंचायती नसतील त्या त्या जातींच्या पंचायती निर्माण करण्याच्या कामीं आणि समाजशासन करण्याच्या कामीं ब्राह्मणांस साह्य करण्याविषयीं त्या त्या जातींनां उत्तेजन दिलें पाहिजे.
३०. गुणकर्मांच्या अगर परंपरेच्या तत्त्वानें क्षत्रिय वर्णाचा निश्चितपणें निर्णय करून क्षत्रियांचा सुसंघटित संघ बनविल्यास तें कार्य राष्ट्रीकरणास मदत करील. तथापि राजेरजवाडे आणि क्षत्रियत्वावर हक्क सांगणारे इतर लोक यांच्या हक्काची तपासणी करून त्यांस क्षत्रियत्व अधिकारानें देण्यासाठीं ब्राह्मणांची किंवा सर्व समजाची धर्मपरिषद् अस्तित्वांत आली पाहिजे.
३१. राष्ट्रीकरण होत असतां एक महत्त्वाचें कार्य होत असतें तें हें कीं, एका समाजांत दुसर्या समाजाचा अंतर्भाव होत जातो.
३२. आपल्या देशांत साधारणतः श्रुतिस्मृतिपुराणोक्त आचारव्यवहारानें युक्त अशा हिंदूंपासून दूर राहिलेले समाज म्हटले म्हणजे मुसुलमान आणि ख्रिस्ती हे होत. खरोखर पाहिलें असतां यांस हिंदूं न समजण्यास कोणतेंहि कारण नाहीं. कां कीं, ख्रिस्ती व मुसुलमान हे माध्व, रामानुज इत्यादिकांप्रमाणें परमार्थसाधक संप्रदाय आहेत; व माध्व, रामानुज इत्यादिकांनां पोटांत ठेवणारा हिंदुसमाज विशिष्टपरमार्थसाधनाच्या अवलंबामुळें उत्पन्न जाहलेला संप्रदाय नाहीं.
३३. मुसुलमान आणि ख्रिस्ती हे जातीरूप संप्रदाय बनल्याकारणानें आम्हांपासून विभक्त आहेत. त्यांचीं मतें आणि परमार्थसाधनें यांच्यामुळें हिंदुसमाजाचें नुकसान होत ना कां कीं, हिंदुसमाज म्हणचे विशिष्ट मतें अगर परमार्थसाधनें यांच्या पायावर निर्माण केलेला समाज नाहीं, तर सर्व प्रकारच्या मतांची आणि दैवतांची ग्राहकता हिंदूंमध्यें आहे. ही गोष्ट हिंदुसमाजास अनुकूल आहे.
३४. मुसुलमान आणि ख्रिस्ती लोकांनीं आपली जात वाढविण्याचा प्रयत्न न करितां आपला ईश्वरसाधनाचा मार्ग वाढविण्याचा प्रयत्न करणें हें त्यांचें कर्तव्य आहे ही गोष्ट त्यांस भासविली पाहिजे. हिंदुस्थानीय लोकांपैकीं प्रत्येकाची जात हिंदूच आहे, मग त्याचें ईश्वरविषयक मत कोणतेंहि कां असेना.
३५. हिंदुस्थान ही भावनात्मक (तात्त्विक) कल्पना आहे ती मूर्त केली पाहिजे. देशांत हिंदु संस्कृति आहे, पण तिला हिंदीपणा आलेला नाहीं.
३६. देशाभिमान प्रज्वलित केल्याशिवाय आणि राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जागृत केल्याशिवाय कर्में करण्यास भाग पाडणारी प्रवृत्ति आणि तीं पार पाडण्याची शक्ति उत्पन्न होणार नाहीं.
३७. इतिहासाकडे पाहतां आम्हां भारतीयांची जी सामाजिक महत्त्वाकाक्षां दिसते ती येणेंप्रमाणेः- आर्य (संस्कृतभाषाजन्य) संस्कृतीचें पुनरुज्जीवन करून तिचा प्रसार चहूंकडे करणें, इश्वरविषयक संप्रदायांच्या तडाक्यांतून राष्ट्रास सोडवून त्यास केवळ राष्ट्रधर्मानेंच शासित करणें, जगाच्या भवितव्याचें नियमन उच्च धर्मनियमांनीं करणें आणि राष्ट्रशासन आणि परस्पर राष्ट्रव्यवहारास साह्य करण्यासाठीं उच्च प्रतीचा राजधर्म निर्माण करणें.
३८. आपणांस देशांत जोराचा ऐक्यभाव निर्माण करावयाचा आहे. आपल्या राष्ट्राच्या भवितव्यावर आणि संस्कृतिस्वरूपावर आपला अधिकार पूर्णपणें स्थापित करणें हें आपलें राजकीय ध्येय आहे.
३९. आमचें साम्राज्यशासनाचें तत्त्व येणेंप्रमाणें आहेः- बादशहा हा केवळ इंग्रज नाहीं, कनेडियन नाहीं, अगर हिंदी नाहीं; तसेंच तो केवळ आर्यन नाहीं, अगर मंगोलियन नाहीं, अगर द्रविडी नाहीं; तो ख्रिस्ती नाहीं, अगर मुसुलमान नाहीं, अगर शैव नाहीं; तर तो सर्वात्मक आहे.
४०. कोणतें सामाजिक अगर शासनविषयक ध्येय आपल्या राष्ट्रास आणि त्याच्या स्वाभिमानास रुचेल तें शोधून काढण्यासाठीं निर्भयपणें, अप्रतिबंध रीतीनें विचार करणें आणि सरकारस तें ध्येय स्वीकारण्यास मदत करणें हें काम अत्यंत राजनिष्ठ आहे. तसेंच तें देशाभिमानाचें देखील आहे. जगद्विवर्तांत जें आपलें राष्ट्रकार्य असेल तें आपण आपल्या शासनतंत्राच्या साहाय्यानें करून दाखविणें हें हिंदुस्थान, इग्लंड आणि जग या सर्वांस श्रेयस्कर आहे.