प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
अजातशत्रु व प्रद्योत.- अजातशत्रूनें आपल्या राजधानीवर - राजगृहावर -प्रद्योताचा हल्ला येईल या भीतीनें तिजभोंवतीं तट घातला होता असें सांगतात. हा हल्ला खरोखरच झाला कीं नाहीं, व झाला असल्यास त्यांत यश कितपत आलें हें समजल्यास बराच बोध होण्यासारखा आहे. पुढें ख्रि. पू. ४ थ्या शतकांत मगधाच्या ताब्यांत उज्जयिनी गेली व अशोकास उज्जयिनीचा अधिकारी नेमण्यांत आलें. शूरसेनाचा राजा अवंतिपुत्त वगैरे अनेक राजांचे प्रसंगोपात्त केगलेले उल्लेख बौद्ध वाङ्मयांत सांपडतात; परंतु ज्यासंबंधाची माहिती विशेष विस्तारपूर्वक दिलेली आढळते असे एवढेच चार राजवंश होत.
वर सांगितलेल्या प्रद्योत आणि अजातशत्रु या राजांचें उल्लेखच केवळ करून बौद्ध वाङ्मय मोकळें होतें; पण तें वाङ्मय त्या राजांचें ऐतिहासिक स्थान स्पष्ट करीत नाहीं. तें स्थान स्पष्ट करण्यासाठीं मागें दिलेल्या याद्यांची म्हणजे ज्या वाङ्मयास र्हीस डेव्हिड्स भितो त्या संस्कृत उर्फ ब्राह्मणी वाङ्मयाची मदत घेतली पाहिजे. तशी वेंकटेश्वर अय्यर (इं. अँ. पु. ४४, ४५) यांनीं घेऊन खालीलप्रमाणें इतिहासाची मांडणी केली आहे.