प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
गिरिव्रज येथील राजे.- आपल्या मुलाला काशीच्या गादीवर ठेवून शिशुनाग हा गिरिव्रज येथें राहिला. शिशुनाग ह्यानें प्रद्योतांचा नाश केला ही पुराणांतील माहिती चुकीची आहे. शिशुनाग हा गिरिव्रजचा राजा होण्यापूर्वीं काशी येथे राज्य करीत असावा. पण त्याच्या पूर्वीं काशीचा राजा कोण होता हें सांगणें कठिण आहे. बहुतकरून तो ब्रह्मदत्त ह्याच्या वंशजांपैकीं एक असावा. ह्यांतील शेवटला वंशज बल्लत हा होय. गौतम ह्याच्या ब्रह्मी दंतकथेवरून असें वाटतें कीं, काशीचा पूर्वींचा राजा नागकुलांतील असावा. शिशुनागवंशांतील राजांनां पुराणांत 'क्षत्रबंधवः' असें म्हटलें आहे. ह्या शब्दाचा खरा अर्थ क्षत्रियाधम असा होतो.
येथील दुसरा राजा काकवर्ण हा होय. ह्याच्याविषयीं बाणभट्ट असें म्हणतो कीं, एका दोषी ठरविलेल्या माणसानें ह्याला पकडून एका अज्ञात जागीं विमानांत बसवून नेलें; आणि त्याच्या मानेंत खंजीर खुपसून त्याचा प्राण घेतला. ह्याचें कारण असें असावें कीं, हा राजा नव्या मतांचा आणि नवे नवे शोध लावणारा असल्यामुळें ह्याचा जुन्या मतांच्या लोकांनीं खून केला असावा. तिसरा राजा क्षेमधर्मा व चवथा क्षत्रजित् हे फार शूर असावे असें त्यांच्या नांवांवरून दिसतें ह्यांनांच बौद्ध आणि जैन हे प्रसेनजित् आणि महापद्म असें म्हणत.