प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

कोसलाधिपाचें शाक्यांशीं युद्ध.- शाक्य कुळांपैकीं एका कुळाच्या अधिपतीच्या कन्येला प्रसेनजित् राजानें, बुद्धकुलाशीं सोयरीक करण्याच्या इच्छेनें मागणी घातली होती असें सांगतात. शाक्य लोकांनीं या सोयरिकीमुळें आपल्यास हलकेपणा येतो असें ठरविलें. परंतु पुढें त्यांनीं वासभखत्तिया नांवाची एका सरदाराच्या दासीची कन्या त्याला दिली. तिजपासून त्याला मागें सांगितलेला विदूदभ नांवाचा पुत्र झाला. या विदूदभानें पुढें राज्यावर बसल्यावर, आपल्या बापाशीं कपट केल्याबद्दल शाक्य लोकांचा सूड उगविला. या लढाईची सविस्तर हकीकत कोठेहि उपलब्ध झालेली नाहीं; परंतु ही लढाई हा खराखुरा झालेला इतिहास आहे यांत शंका नाहीं, असें र्‍हीस डेव्हिड्स समजतो. ही लढाई बुद्धाच्या मरणापूर्वीं एक दोन वर्षेंच झाली होती असें म्हणतात.

या लढाईचें कारण म्हणून जें सांगण्यांत आलें आहे त्यासंबंधानें थोडासा संशय वाटतो. कारण ज्या त-हेची सोयरीक व्हावयाचें ठरलें होतें, तशा सोयरिकी यापूर्वीं झालेल्या होत्या. मगध देशाच्या बिंबिसार राजाला अशाच एक कुळांतील मुलगी दिलेली होती.