प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

पाठांची भिन्नता व अशुद्धता यांवरून लिपीवर प्रकाश.- निरनिराळे पाठ व नांवांतील अशुद्धता यांवरूनहि बरीच माहिती मिळण्याजोगी आहे. हे जे निरनिराळे पाठ झाले आहेत, ते बहुतेक वाचण्याच्या व लिहिण्याच्या चुकांमुळेंच झाले असावेत. चुकांच्या सारखेपणावरून मूळ ग्रंथ कोणत्या लिपींत लिहिलेला असावा हें काढतां येतें, व त्या लिपीच्या कालावरून त्या ग्रंथाचा काल कोणता असावा म्हणजे कोणता ग्रंथ जुना आहे व कोणता नंतरचा आहे याचा निर्णय करतां येतो.

असल्या चुका मत्स्य, वायु व विष्णु यांच्यामध्यें आढळतात. पार्गिटेर साहेबांच्या मतें या चुका खरोष्टी लिपींतील अक्षरसादृशामुळें वाचनाच्या चुका होऊन उद्भवलेल्या आहेत; व त्यावरून त्यांनीं पुढें दिल्याप्रमाणें अनुमानें काढलीं आहेतः ''हा इतिहास प्रथम खरोष्टीमध्यें लिहिलेला असला पाहिजे, व खरोष्टी ज्या अर्थीं फक्त उत्तर हिंदुस्थानांतच प्रचलित होती, त्या अर्थीं तो तेथेंच लिहिला गेला असला पाहिजे. सर्व पुराणांचा मूळ आधार भविष्यपुराण हा असल्यामुळें तेंच प्रथम खरोष्टीमध्यें लिहिलें गेलें असावें; आणि ज्या अर्थी इ. स. ३३० च्यापुढें खरोष्टी लिपि हिंदुस्थानांत प्रचलित राहिली नव्हती, त्या अर्थीं तें पुराण त्याच्या पूर्वींच लिहिलेलें असलें पाहिजे.''

पुराणें आरंभीं खरोष्टी लिपींत लिहिलेली होतीं हें पार्गिटेर साहेबांचें अनुमान स्वीकारण्यास काय अडचणी आहेत तें पुढें विज्ञानेतिहासांत खरोष्टी लिपीसंबंधीं माहिती देतांना दाखविलें आहे.