प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
पुराणांतरीं वर्णिलेलीं कलियुगांतील राजघराणीं.- कलियुगांतील घराण्यांसंबंधीं हकीकत मत्स्य, वायु, ब्रह्माण्ड, विष्णु, भागवत, गरुड व भविष्य या पुराणांमध्यें सांपडते. यांपैकीं मत्स्य व भागवत यांखेरीज बाकी सर्व पुराणांमध्यें कौरवपांडवांमधील महायुद्धाच्या वेळेपर्यंत असलेल्या सर्व घराण्यांची हकीकत दिली आहे; व युद्धानंतर उत्तरहिंदुस्थानामध्यें जीं राजघराणीं झालीं तींहि दिलीं आहेत. मत्स्य पुराणामध्यें उत्तरकालीन पौरव घराणें पूर्वींच्या पौरव घराण्याला जोडून दाखविलें आहे, व कलियुगांतील इतर सर्व घराणीं निराळीं सांगितलीं आहेत. भागवतामध्यें पूर्व व उत्तरकालीन ऐक्वाकु एकत्र दाखविले असून उत्तरकालीन पौरव व बार्हद्रथ पूर्वींच्या पौरवांबरोबरच दाखविले आहेत; आणि पुढील सर्व घराणीं निराळीं दाखविलीं आहेत. पौरव, एैक्ष्वाकु, बार्हद्रथ, प्रद्योत, शैशुनाग उर्फ नंद, मौर्य, शुंग, काण्व, आंध्र इत्यादि घराण्यांच्या याद्या दिल्या असून स्थानिक घराण्यांचे उल्लेख केले आहेत.