प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

प्रसेनजित् व आजातशत्रु.- हीं राजघराणीं सोयरिकीच्या संबंधानें परस्परांशीं बद्ध झालेलीं होतीं. परंतु याच संबंधामुळें त्यांनां भांडणाचे प्रसंग अनेक वेळां येत. प्रसेनजित् म्हणून जो कोसलचा राजा वर सांगितला आहे त्याची बहीण कोसलदेवी बिंबिसाराला दिली होती. कोसलदेवीचा सावत्र मुलगा अजातशत्रु यानें आपल्या बापाला म्ह. बिंबिसाराला ठार मारिलें. [शेवटीं शेवटीं व्ही. स्मिथला ही पितृवधाची बौद्ध कथा बनावट असावी अशी शंका येऊं लागली होती !] तेव्हां प्रसेनजित् यानें काशी नगरी आपल्या ताब्यांत घेतली; कारण या नगरीचा सर्व वसूल कोसलदेवीच्या खासगी खर्चाकडे लावून दिलेला होता. यामुळें साहजिकच अजातशत्रु व प्रसेनजित यांच्यामध्यें लढाई जुंपली. प्रथमतः अजातशत्रूला जय मिळेलसें वाअत होतें, परंतु शेवटीं तो कैद केला गेला. अजातशत्रूनें त्या नगरीवरील आपला हक्क सोडल्याकारणानें संतुष्ट होऊन प्रसेनजित् यानें आपली मुलगी त्यास दिली, इतकेंच न्हे तर ज्या नगरीबद्दल तो इतका भांडला तीच काशी नगरी त्याला आंदण म्हणून दिली. पुढें तीन वर्षांनीं प्रसेनजिताचा मुलगा विदूदभ यानें बापाविरुद्ध बंड केलें. प्रसेनजित् या वेळीं शाक्य देशामध्यें उलुंब या गांवीं होता. तेथून पळून जाऊन त्यानें अजातशत्रूची मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथपर्यंत पोंचण्याच्या आधींच तो आजारी पडून मृत्यु पावला.