प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
बुद्धकालीन राष्ट्रें.- ख्रि. पू. सातव्या शतकांत हिंदुस्थानांत निरनिराळीं प्रसिद्ध राज्यें होती. पुराणांत काशी, कोशल, कौशांबी, अवन्ती आणि मगध येथील घराण्यांची नांवें आढळतात. जातकांत आलेलीं काशीच्या राजांची बरीचशीं नांवें पुराणांत सांपडतात. हीं नांवें म्हटलीं म्हणजे ब्रह्मदत्त, विश्वक्सेन, उदक्सेन आणि बल्लत ही होत. म्हणून काशी हें ख्रि. पू. ७ व्या शतकांतील हिंदुस्थानच्या राज्यांपैकीं ब्रह्मदत्त आणि त्याचे वंशज ह्यांच्या ताब्यांतील एक मोठें राज्य होतें असें वाटतें. तसेंच तक्षशिला येथें मोठें राज्य होतें. ह्यानंतर मगध देशाचें नांव येतें. येथें त्या वेळीं बहुतकरून पौराणिक बृहद्रथ घराण्यांतील शेवटला राजा राज्य करीत होता. ह्याशिवाय इतर राज्यांची देखील बौद्ध ग्रंथांतून अस्पष्ट माहिती दिली आहे. ख्रि. पू. ७ व्या शतकाच्या शेवटीं हिंदुस्थानच्या पश्चिमेकडील राज्यांचें महत्त्व कमी होत जाऊन पूर्वेकडील राज्यें उदयास येऊं लागलीं. काशीचें वर्णन पच्चुपन्नवत्तु जातकामध्यें एका जागीं दिलें आहे. कोशल देशाचें वर्णन पुष्कळ ठिकाणीं आढळतें. येथें महाकोशल नांवाचा एक नामांकित राजपुरुष होऊन गेला. काशीचा कांहीं भाग कोशल देश भरभराटीत असतांना त्याच्या ताब्यांत होता असें बौद्ध ग्रंथांवरून स्पष्ट दिसतें. गोपथ ब्राह्मणांत त्याला काशिकौशल असें म्हटलें आहे. काशीचा दुसरा भाग मगधघराण्याच्या शिशुनागानंतरच्या शेवटल्या राजांच्या ताब्यांत होता.