प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

राजांची संख्या.- आता शैशुनाग घराण्यांत राजे किती झालें तें पाहूं. वेंकटेश्वर यांनीं निरनिराळ्या पुराणांतील जीं राजांचीं नांवें व त्यांच्या कारकीर्दींचीं वर्षे दिलीं आहेत तीं पार्गिटेर साहेबांच्या पुराणांतील राजघराण्यांसंबंधाच्या माहितींत मागें आलीं असल्यानें तेवढीं वगळून फक्त जैन व बौद्ध ग्रंथांत आलेलीं शैशुनाग घराण्यांतील राजांचीं नांवें व त्यांच्या कारकीर्दीचीं वर्षेंच पुढें दिली आहेत. नांवांपुढें दिलेले आंकडे त्या त्या राजांच्या कारकीर्दींचीं वर्षे दर्शवितात. प्रत्येक यादीच्या डोक्यावर तीस आधार असलेल्या ग्रंथाचें नांव दिलें आहे.

 कल्पद्रुमकालिका  महावंश  दिव्यावदान
 श्रेणिक  बिम्बिसार  बिम्बिसार
 कूणिक  अजातशत्रु ३२  अजातशत्रु
 उदय  उदयभद्रक १६   उदयिभद्र
 अनिरुद्ध /  मुंड १८  पुण्ड /काकवर्णी
 नागदशक २४  सहली
 सुसनाग १८  तुलकुचि अथवा
 भुलेकुचि
 कालाशोक २८  महामंडल
 १० पुत्र २२  प्रसेनजित्
 ९ इतर २२  नन्द
 चंद्रगुप्त  चंद्रगुप्त  बिंदुसार
 सुसिम

शिशुनागानंतर बारा राजे झाले होते असें मत्स्यपुराणांत दिलें आहे, परंतु विष्णु आणि वायु पुराणांत फक्त दहा राजांचाच उल्लेख केला आहे. मत्स्य पुराणांत जास्त दिलेलीं दोन नांवें कण्वायन आणि भूमिमित्र हीं ह्या पुराणांत आढळत नाहींत. ज्या अर्थीं मत्स्य पुराणानें हीं जास्त दोन नांवें दिलेली आहेत, त्या अर्थीं असें वाटतें कीं, दंतकथेचा ह्या गोष्टीला बराच आधार असावा. सर्व पुराणांत असें सांपडतें कीं, राजांच्या दोन जास्त पिढ्या होत्या. ह्याप्रमाणें पहिल्या शिशुनागापासून शेवटल्या नंदापर्यंत (१०+२) बारा पिढ्या झाल्या.

बिंबिसार ह्याच्या नंतर सात पिढ्या झाल्या, असें दीपवंश आणि महावंश हे दोन्ही ग्रंथ सांगतात.

कल्पद्रुमकालिका ह्या जैन ग्रंथांत-बिंबिसार हा पहिला राजा धरिला तरी - चंद्रगुप्तापूर्वी बारा राजे झाले असें सापडतें.

ह्याप्रमाणें (१) चंद्रगुप्तापूर्वीं राजांच्या बारा पिढ्या होत्या; (२) ह्यांपैकीं सात बिंबिसारानंतर झाल्या; आणि (३) शेवटल्या सात राजांचा एक विशिष्ट वर्ग बनून त्याला पौराणिक आणि जैन दंतकथांत नंद असें म्हणूं लागले असें सिद्ध होतें.