प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

साम्राज्याचा विस्तार.- अजातशत्रूनंतरचा राजा उदय हा होय. त्यानें कुसुमपुर नांवाचें शहर बांधलें. ह्याला अवंतीचा चंडप्रद्योत आणि यौगंधरायण ह्यांसारखे प्रबळ शत्रू असल्यामुळें राज्याचा फारसा विस्तार होणें कठिण होतें. ह्याच्या कारकीर्दींत लिच्छवींवरील स्वा-या चालूच होत्या. तो पुढें ठार मारला गेला अशी दंतकथा आहे. ह्याच्या मरणानंतर पुन्हां राजदरबार राजगृह येथें गेला, आणि लिच्छवींवरील स्वा-या त्या वेळेपुरत्या बंद झाल्या.

वैशाली हा देखील मगध साम्राज्याचाच भाग होता असें पारायणबग्ग यामध्यें दिलें आहे. कोशल देशाचा देखील महानंदी ह्याच्या वेळीं मगध राज्यांतच समावेश होत होता.