प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

शैशुनाग घराण्याच्या कारकीर्दीचा काल.- बुद्धकालीन व त्याच्या निकटनंतरच्या काळांतील राज्यांचा एकमेकांशीं कसा संबंध होता या संबंधानें र्‍हीस डेव्हिड्स आपल्या बुद्धिस्ट इंडियांत पुराणेतर साहित्याच्या आधारें येणेंप्रमाणें लिहितो. हिंदुस्थानांत बुद्धाचा जन्म झाला त्या वेळीं येथें बलाढ्य असा एकहि राजा नव्हता. बौद्ध संप्रदायाचा उदय होण्याच्या अगोदर कित्येक शतकें गंगा नदीच्या खो-यांत अनेक राजांनीं राज्य केलें होतें, व राजसत्तात्मक राज्यपद्धतीचें जाळें सर्व हिंदुस्थानभर पसरलें जाण्याचा काळ जवळ येत चालला होता. अगदीं आरंभीं या संप्रदायाचा पगडा हिंदुस्थानच्या ज्या भागांत बसला होता, तेथें बल व विस्तार या दोन्हीहि दृष्टींनीं बरींच मोठीं अशीं चार राज्यें होतीं. आज आपणांस उपलब्ध असणारा पुरावा निरनिराळ्या राज्यपद्धती, प्रचलित असलेल्या सर्व प्रदेशांतील लोकसंख्या, त्यांच्या राज्यांचा विस्तार, वगैरेंसंबंधानें निश्चयात्मक विधानें करतां येण्याइतका पुरेसा नाहीं. तेव्हां आजच्या स्थितींत तरी, उपलब्ध असलेल्या बौद्ध वाङ्‌मयांवरून आपणांस एवढेंच म्हणतां येईल कीं, राजसत्ताक राज्याबरोबरच कमी अधिक प्रमाणांत पंचायतीसारख्या लोकतंत्राचा अनुभव घेणारींहि कांहीं राज्यें त्या काळीं अस्तित्वांत होतीं.