प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
शैशुनागांच्या इतिहासांतील वादग्रस्त भाग.- हे अनेक आहेत. त्यांत (१) बिंबिसाराचा खून, (२) प्रद्योतांची शैशुनागांहून प्राचीनता, (३) शैशुनाग राजांची संख्या (४) व राजांचा अनुक्रम हे महत्त्वाचे होत. बिंबिसार ह्याच्या कारकीर्दीच्या शेवटल्या कालासंबंधानें भिन्न दंतकथा आढळतात. बौद्ध आणि ब्रह्मी दंतकथेंत त्याला त्याचा पुत्र अजातशत्रु ह्यानें मारलें असा उल्लेख आहे. परंतु मगध देशाच्या जैन दंतकथेंत तसें नसून उलट त्यानें आपलें राज्य अजातशत्रूच्या स्वाधीन केलें अशी हकीकत आहे. म्हणून बिंबिसार हा ८० वर्षें जिवंत होता आणि त्यानें आपल्या मरणापूर्वीं कांहीं वर्षें आपलें राज्य अजातशत्रु ह्याच्या स्वाधीन केलें असें समजण्यास हरकत नाहीं.