प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

प्रसेनजितासंबंधीं आणखी माहिती.- प्रसेनजित् हा फार निराळ्या प्रकारचा मनुष्य होता. संयुक्त निकायांपैकी तिसरें संयुक्त सगळें याच्या संबंधाचें आहे. या संयुक्तांत २५ कथा असून, त्यांपैकीं प्रत्येकींत नीति शिकविलेली आहे. बौद्ध वाङ्‌मयाच्या इतर भागांतहि प्रसेनजितासंबंधाचें बरेंच उल्लेख सांपडतात. याचें शिक्षण तक्षशिला येथील विद्यापीठांत झालें होतें. राजा ह्या नात्यानें त्यानें राज्यकारभारांत बरीच कळकळ दाखविली. भल्यांची संगति धरून राहणें त्याला आवडत असे. हाच त्याच्या आचारविचारातील थोरपणा त्यानें पुढें बौद्ध संप्रदायाचा एका विशिष्ट अर्थानें अनुयायी बनून जास्त व्यक्त केला. या राजाचा आणि बुद्धाचा प्रत्यक्ष संवाद होण्याचा प्रंसग आला होता. प्रसेनजितू राजाची आत्या सुमना हीहि या संवादाच्या वेळीं हजर होती. तिनें बौद्ध संप्रदायाची दीक्षा घेण्याचें ठरविलें, परंतु एका वुद्ध नातेवाइकाची सेवाशुश्रुषा करण्याच्या कामामुळें तिचा निश्चय लांबणीवर पडला. थेरगाथा या ग्रंथांमध्यें ज्या बौद्धसंप्रदायी स्त्रियांच्या कथा संकलित केलेल्या आहेत. त्यांपैकीं सुमना ही एक आहे.